kolhapur news : भादोलेच्या सरपंचासह सर्व 18 सदस्य अपात्र होणार : कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीच्या सर्व म्हणजे सरपंचासह 18 सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39 नुसार अपात्र ठरवण्याची कार्यवाही करण्यात यावी असा अभिप्राय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिला आहे. हा अभिप्राय त्यांनी विभागीय आयुक्तांना पाठवला असून त्यांच्याकडूनच आता याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सौरऊर्जा उपकरणे खरेदीप्रकरणी 9 लाख 84 हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे सिद्ध झाल्यानंतर हा अभिप्राय देण्यात आला आहे.
kolhapur news : भादोलेच्या सरपंचासह सर्व 18 सदस्य अपात्र होणार
सौरउर्जा उपकरण खरेदीत घोटाळा
ग्रामस्थ व तक्रारदार कृष्णात भीमराव पाटील यांनी याबाबत 26 जुलै 2024 रोजी तक्रार केली होती. त्यानंतर पंचायत समिती पन्हाळ्याचे विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे यांनी चौकशी केली त्यात तथ्य आढळले. सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ काढून त्यांचा खुलासा घेण्यात आला परंतु तो अमान्य करण्यात आला. कारण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यानुसार जो अहवाल दिला त्यात गंभीर कारभाराचा उल्लेख करण्यात आला आहे. सोलर पॅनेलची जोडणी पूर्ण नसणे, पॅनेल कनेक्ट पीन व्यवस्थित जोडण्यात आल्या नाहीत, अर्थिंग केलेले नाही, लाईटनिंग कंडक्टर बसवण्यात आलेला नाही. हे सर्व साहित्य 5 लाख 95 हजार 793 रुपयांचे असून प्रत्यक्ष ग्रामपंचायतीने 15 लाख 80 हजार रूपये अदा करून मूल्यांकनापेक्षा 9 लाख 84 हजार 207 रुपये जादा अदा केले आहेत. हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनीही या प्रकरणी अहवाल दिला होता.
kolhapur-news-all-18-members-including-the-sarpanch-of-bhadole-will-be
आर्थिक व्यवहारात कसूर झाल्याने तत्कालिन ग्रामसेवक राजेंद्र मगदूम यांच्या विभागीय खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार आणि सरपंच, सदस्य यांना म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर कार्तिकेयन यांनी 18 सदस्यांच्या अपात्रतेचा अभिप्राय पाठवला आहे.
जनसुराज्यचे 13 तर काँग्रेसचे 5 सदस्य
त्यातील सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील या जनसुराज्यच्या सरपंच असून गीतांजली अवघडे, दिलीप पाटील, गणपती पाटील, राहुल पाटील, भगवान घोलप, तोफिक सनदे, सुनील काटकर, धोंडिराम पाटील, अमोल कोळी, संगीत पाटील, अलका पाटील, मयुली पाटील, मालूबाई कोळी, सुवर्णा धनवडे, भारती माने, रुपाली कोळी, नीकिता कांबळे या ‘जनसुराज्य’च्या 13 आणि काँग्रेसच्या पाच सदस्यांना अपात्र करण्याचा हा प्रस्ताव आहे

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.