rajkiyalive

72 वर्षात 28 वर्षेच दादा घराण्यात आमदारकी

दिनेशकुमार ऐतवडे
सध्या सर्वच पक्ष 2024 मध्ये येणार्‍या लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच होतील.  असे संकेत मिळत आहेत. काँग्रेसने मुंबईमध्ये राज्यातील सर्वच लोकसभा उमेदवारीसाठी आढावा बैठक घेतली. सांगलीची बैठक सुरू असतानाच जयश्री पाटील यांनी आपण सांगलीतून विधानसभेसाठी इच्छुक आहोत, असे सांगितले.  गेल्या वेळी मी इच्छुक होता, मला डावलले असे त्या म्हणाल्या, दादा घराण्यावर अन्याय नको, असेही त्या म्हणाल्या. त्यातून वेगवेगळ्या चर्चेला उत आला.  भारत स्वतंत्र झाल्यापासून आजअखेर दादा घराण्याची विधानसभेतील कामगिरी काय आहे, याचा घेतलेला हा आढावा….

सांगलीच्या डॉ. वसंतदादा पाटील यांनी राज्यात मोठी झेप घेतली होती

महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, राजस्थानचे राज्यपाल आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस राहिलेल्या सांगलीच्या डॉ. वसंतदादा पाटील यांनी राज्यात मोठी झेप घेतली होती. वसंतदादा पाटील यांचे दिल्लीत मोठे वजन होते. इंदिरा गांधी यांच्या खुनानंतर राजीव गांधींना पंतप्रधान करण्यात वसंतदादांचा मोठा वाटा होता.  दादांच्या पश्चात दादा घराण्याने म्हणावी तशी कात टाकली नाही. दादांच्या नावावर त्यांच्या वारसांना खासदार होता आले परंतु आमदारी मात्र दादा घराण्याच्या नशिबात कमीच राहिली. गेल्या 72 वर्षात केवळ 28 वर्षेत दादा घराण्यात आमदारकी राहिली आहे. 1985 नंतर तर केवळ 2004 मध्ये एकदाच मदन पाटील यांच्या रूपाने आमदारकी दादा घराण्यात राहिली आहे.  आता पुन्हा एकदा दादा घराण्यातील जयश्र्रीताई पाटील यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यांनी मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत विधानसभेची उमेदवारी मागितली आहे.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

1952 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लागली.

1947 मध्ये देश स्वातंत्र्य झाला. अजून प्रांत रचना झाली नव्हती. जिल्ह्यांची निर्मितीही झाली नव्हती. त्यावेळी मुंबई प्रांत होते. सांगलीचा समावेश दक्षिण सातारा या जिल्ह्यात होता. 1952 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लागली. त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा सर्वत्र बोलबाला होता. वसंतदादांनीही जिल्ह्यात आपले चांगले बस्तान बसविले होते. 1952 च्या निवडणुकीत पहिल्यांदा ते उभे राहिले. त्यांच्या विरोधात समडोळीचे स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाबुराव देवर्षी उभे होते. दादांनी या निवडणुकीत विजय मिळविला. येथून दादांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

1957 साली झालेल्या या निवडणुकीत दादा दुसर्‍यांदा उभे राहिले.

पाच वर्षानंतर मुंबई प्रांताची दुसरी निवडणूक लागली. 1957 साली झालेल्या या निवडणुकीत दादा दुसर्‍यांदा उभे राहिले. दादांनी माधव गोडबोले यांचा 14266 मतांनी पराभव केला. दरम्यान 1960 मध्ये प्रांतरचना झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1962 मध्ये राज्याची पहिली निवडणूक लागली. दादांनी या निवडणुकीत विजयाची हॅट्रीक केली. त्यांनी भगवानराव सूर्यवंशी यांचा 33880 मतांनी पराभव केला.
1967 मध्ये वसंतदादा प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी सांगलीतून आप्पासाहेब बिरनाळेंना संधी दिली. त्यामुळे पहिल्यांदाच दादा घराण्याच्या बाहेरील उमेदवार निवडून आला. दादांना 1972 मध्ये विधानपरिषदेवर घेण्यात आले.

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

1972 दादा विधानपरिषदेवर असल्याने  प्रा. पी. बी. पाटील यांना संधी मिळाली.

1972 च्या पंचवार्षिक निवडणुकीत दादा विधानपरिषदेवर असल्याने सांगलीतून शांतिनिकेतचे प्रा. पी. बी. पाटील यांना संधी मिळाली. 1972 नंतर पुढील निवडणूक 1978 साली झाली. या निवडणुकीत सांगलीतून पुन्हा एकदा वसंतदादा विजयी झालेे. त्यांनी जनता पक्षाच्या भरमगोंडा खोत यांचा पराभव केला. दोन वर्षातच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त केले. आणि 1980 मध्ये पुन्हा राज्याच्या निवडणुका लागल्या.

1980 मध्ये दादा लोकसभेवर खासदार असल्याने त्यांनी सांगलीतून शालिनीताई पाटील यांना संधी दिली.

शालिनीताई पाटील यांनी समाजवादी काँग्रेसच्या पै. नामदेवराव मोहिते यांचा पराभव केला. 1985 मध्ये दादा पुन्हा एकदा सांगलीतून निवडून आले. त्यांनी हरिपूरच्या पै. नामदेवराव मोहिते यांचा दुसर्‍यांदा पराभव केला. सत्ता आल्यानंतर दादांना मंत्रीपद मिळाले नाही. केवळ आमदार म्हणून राहणे त्यांना पसंत पडले नाही. राजीव गांधींनी त्यांची नेमणूक राजस्थानच्या राज्यपालदी नेमणूक केली. एक वर्षातच 1986 मध्ये सांगलीची पोटनिवडणूक लागली आणि येथूनच पै. संभाजी पवारांचा काळ सुरू झाला.

1986 मध्ये दादांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विजयाचा सिलसिला येथे थांबला.

दादा राज्यपाल असताना 1986 मध्ये दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. परंतु संभाजी पवारांनी त्यांचा पराभव केला. 1952 दादांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विजयाचा सिलसिला येथे थांबला. 1989 मध्ये वसंतदादांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1990, 1995 असे सलग तीन वेळा संभाजी पवारांनी दादा घराण्यातील उमेदवाराचा पराभव केला.

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली

विष्णुअण्णा घराणे राष्ट्रवादीत होते. प्रकाशबापू काँग्रेसमध्ये होते परंतु ते खासदार होते. त्यामुळे विधानसभेचे तिकीट सांगलीवाडीच्या दिनकर पाटील यांना मिळाले आणि ते निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये मदन पाटील यांनी बंडखोरी केली आणि निवडून आले. 1986 नंतर 18 वर्षानंतर दादा घराण्याला आमदारकीची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा 18 वर्षे झाली तरी अजून दादा घराण्याला आमदारकीची संधी मिळाली नाही. 2009 मध्ये पुन्हा एकदा संभाजी पवार, 2014 आणि 2019 मध्ये भाजचे सुधीर गाडगीळ यांनी बाजी मारली आहे.

 जयश्र्रीताई पाटील यांनी आमदारकीसाठी इच्छुक आहेत.

आता पुन्हा एकदा दादा घराण्यातील जयश्र्रीताई पाटील यांनी आमदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांना तिकीट मिळणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. जरी उमेदवारी मिळाली तरी गेल्या 18 वर्षापासून सुरू असलेला दादा घराण्याचा दुष्काळ ते संपविणार की नाही हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीतच कळेल.

दादा घराणे 28 वर्षे विधानसभेवर

वसंतदादा पाटील 1952 ते 67, पुन्हा 1978 ते 80 आणि 1985 ते 86 असे एकूण 18 वर्षे विधानसभेवर होते. शालिनीताई पाटील 1980 ते 85 पाच वर्षे विधानसभेवर तर मदन पाटील 2004 ते 2009 असे पाच वर्षे विधानसभेवर होते. अशा तर्‍हेने दादा घराणे 1952 पासून आजअखेर 72 वर्षात केवळ 28 वर्षेच विधानसभेवर आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज