rajkiyalive

शरद पवारांचे वाभाडे अन् गोडवे

जनप्रवास, विशेष संपादकीय
अमृत चौगुले

नाही म्हटले तरी गेल्या चार-साडेचार दशकांहून अधिक काळापासून महाराष्ट्र अन् देशाचेही थोडे फार राजकारण जाणते नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांभोवती फिरते, हे जगजाहीर आहे. अर्थात राजकारणाला ते कधी काय अन् कशी दिशा देतील हे भल्या-भल्या राजकारण्यांनाही उमगलेले नाही.

 

कोणतीही आपत्ती असो वा विकासाचा प्रश्न असो शरद पवारांचे महत्व अधोरेखित

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनीही शेतकरी धोरणांबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यापासून ते किल्लारी भूकंपावेळी मदत-पुनर्वसनाच्या नियोजनासाठी त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. कोणतीही आपत्ती असो वा विकासाचा प्रश्न असो शरद पवारांचे महत्व अधोरेखित होते. त्यामुळेच जगभरात विश्वगुरू म्हणून ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप कौतुक सोहळे करीत आहे, त्यांनीसुद्धा शरद पवारांना खुलेआम गुरू मानून त्यांचे कौतुक केले होते. ही झाली त्यांच्या महननीयतेची बाजू, पण त्यांच्याकडून राजकारणात चितपट आणि धक्कातंत्राबाबत त्यांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होणे ही दुसरी बाजू आहे.

राजकारणातील कुरघोड्यांदरम्यान तो खंजिर आजही वारंवार चर्चेत

महाराष्ट्रात तत्कालिन मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतरावदादा पाटील यांचे सरकार पाडत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुलोदरूपी केलेला प्रयोग राजकारणात सत्तेसाठी वसंतदादा पाठीत खंजीर खुपसण्याचा पॅटर्न ठरून गेला. राजकारणातील कुरघोड्यांदरम्यान तो खंजिर आजही वारंवार चर्चेत येतोच. अर्थात त्यानंतर पुलोद गुंडाळून शरद पवार पुन्हा काँग्रेससोबत आले, नंतर काँग्रेस फुटीनंतर स्वतंत्र राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्या वेळेपासून स्वतंत्र लढल्यानंतरही सत्तेत आणि बहुतेक लोकसभा, विधानसभा ते सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी वारंवार एकत्र आहेत. त्यामुळे काँग्रेस या खंजिराच्या कटु आठवणी कधीच काढत नाही, मात्र राष्ट्रवादी अन् शरद पवारांवर टीका करताना ही संधी विरोधक कधीच सोडत नाहीत.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

ते आणि त्यांचा पक्ष कुणाशी कायमचे मित्रत्व आणि शत्रुत्व ठेवत नाहीत

पूर्वी शिवसेना अन् आता शिस्तबद्ध पक्ष म्हणून कोणे एकेकाळी गणला जाणारा भाजप तर वारंवार राजकारणातील घडामोडींना शरद पवारांच्या खंजिराचे वाणगीदाखल दाखले देत आहेत. ते काही असो, शरद पवारांनीही ते कधी सिरीयस घेतले नाही, त्याला कधी स्वत:हून उत्तर तर देण्याचा त्यांचा स्वभावच नाही. अर्थात ते आणि त्यांचा पक्ष कुणाशी कायमचे मित्रत्व आणि शत्रुत्व ठेवत नाहीत हे ही तितकेच खरे. त्यामुळेच सन 2014 पासून राष्ट्रवादीने काँग्रेससोबत असूनही मोदी अन् भाजपला टोकाचे टार्गेट केले नाही. एवढेच नव्हे तर राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत बिनसल्यानंतर राष्ट्रवादीला जवळ करण्याचे षड्यंत्र आताही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांनी आता उघड केले.

पहाटेच्या शपथविधीचा अर्धवट राहिलेला ‘कार्यक्रम’ हा शरद पवारांच्या संमतीने

त्यानंतरही पहाटेच्या शपथविधीचा अर्धवट राहिलेला ‘कार्यक्रम’ हा शरद पवारांच्या संमतीने असल्याचे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रांजळपणे कबूल केले. म्हणजेच निष्ठेची भाषा करणार्‍या भाजपलाही शरद पवारांचे वावडे नाही हे स्पष्ट आहे. तेवढ्यावर थांबतील ते शरद पवार कसले? त्यांनीही भाजपला पट काढत काँग्रेस आणि कधी नव्हे ते शिवसेनेची मोट बांधून महाविकास आघाडीचा नवा प्रयोग केला. उद्धव ठाकरेंना त्यासाठी मुख्यमंत्री बनवून किंगमेकरचे किंग बनविले. अर्थात हा पट भाजपच्या मोठ्या जिव्हारी लागला अन् ठाकरेंबरोबर शरद पवारही त्यांच्या हिटलिस्टवर आले.

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात

काळानुरूप भाजपनेही शत प्रतिशतच्या नावावर सत्तेसाठी ‘वाट्टेल ते’ चा सपाटाच लावला.

काळानुरूप भाजपनेही शत प्रतिशतच्या नावावर सत्तेसाठी ‘वाट्टेल ते’ चा सपाटाच लावला. गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेशासह अन्य राज्यांमध्ये आमदार, खासदार नेत्यांच्या इनकमिंगची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करायची तयारी अगदी पहाटेच्या शपथविधीसोबतच भाजपने ठेवली होती हे लपून राहिले नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 50 जणांच्या ‘गुवाहाटी व्हाया सूरत’ सहलीचा बहुचर्चित खोकेबाजार हा त्याचाच प्रकार. यातून महाविकास आघाडीला सत्तेतून खेचणाराच नव्हे तर शिवसेनेला व विशेषत: उद्धव ठाकरे यांच्या वर्चस्वालाच सुरुंग लावणारा डाव ठरला. अर्थात त्यावेळीही नैसर्गिक महायुतीशी गद्दारी करण्यापासून काँग्रेसपेक्षा शरद पवारांसोबत जाण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप झाला.

पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनीही विश्वासघाताचा खंजिर खुपसल्याचाही दाखला देण्यात आला

पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनीही विश्वासघाताचा खंजिर खुपसल्याचाही दाखला देण्यात आला. यामध्ये शिवसेनेशी मुख्यमंत्रीपदाचे ठरलेच नव्हते असे म्हणत ठाकरेंनी युती तोडल्याचे कारण भाजपने दिले. ते मुख्यमंत्रीपदही एकनाथ शिंदे बहाल करीत भाजपने ‘राजा उदार’ पण दाखविले आहे. अर्थात शिंदेंना धडा शिकविला तरी पवारांवर वार शिल्लक होता, तो अजित पवार यांना फोडून भाजपने पूर्ण केला. यामागे देशभरात भाजपविरोधी मोट बांधत सुरू असलेल्या ‘इंडिया’आघाडीला आणि यातील महत्वाचे नेते शरद पवार यांना धक्कातंत्र देण्याचा भाजपचा डाव आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. अर्थात हे करता करता भाजपने काँग्रेससोबतच राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आणि परिवारवादाचा आरोप केला होता हे ही सर्वजण सोयीस्कररित्या विसरले.

अगदी फडणवीस यांनी ‘राष्ट्रवादीशी आपत्धर्म, शाश्वत धर्म’ शक्य नाही म्हटले होते हे ते विसरले.

अगदी फडणवीस यांनी ‘राष्ट्रवादीशी आपत्धर्म, शाश्वत धर्म’ शक्य नाही म्हटले होते हे ते विसरले. एवढेच कशाला, पंतप्रधान मोदींनी तर 27 जून 2023 ला भोपाळच्या भरसभेत शरद पवारांसह राष्ट्रवादीवर 75 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. यात सिंचन घोटाळ्याचे मेरुमणी अजित पवार असून यातील अनेकजण ‘चक्की पिसिंग अ‍ॅन्ड पिसिंग’ असा आरोपही करण्यात आला होता, पण अगदी चार दिवसांतच (2 जुलै 2023) याची अल्पविस्मृती होऊन अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह नऊजणांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल करीत राष्ट्रवादीही फोडण्याचे महानकार्य भाजपने केले. आता अजित पवारांमुळे डबल इंजिनचे सरकार टिबल इंजिन होऊन गतीमान झाल्याचा दावा शिंदे आणि फडणवीस करीत आहेत.

ज्या अजित पवारांवर टीका करीत शिंदे बाहेर पडले त्यांनाच सोबत घेण्याची नामुष्कीही भाजपने आणून ठेवली .

ज्या अजित पवारांवर टीका करीत शिंदे बाहेर पडले त्यांनाच सोबत घेण्याची नामुष्कीही भाजपने आणून ठेवली . यात भाजपमधून फडणवीसच काय, तर शिंदेंच्या वाढत्या महत्वाला चाप लावण्याचाच प्रकार ‘वरून’ झाल्याचे खुद्द दोघांनाही या शपथविधीबद्दल पूर्वी माहीत नसल्याचे सांगण्यातून स्पष्ट होते. एवढे होऊनही शरद पवार डगमगले नाहीत, दुसरीकडे त्यांनी महिना उलटूनही अजित पवारांसह कुणावर कारवाईचा बडगा उगारलेला नाही. दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारच नेते असल्याचे अजूनही गार्‍हाणे सुरूच ठेवले आहे. सोबतच अजित पवारांसोबत पुन्हा राष्ट्रवादीचे काहीजण येणार अशाही वावड्या सुरू आहेत. हे कमी की काय म्हणून आता पुन्हा लोकसभा अधिवेशनात काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी खुद्द नरेंद्र मोदींनीच शरद पवारांचे गोडवे गायला सुरू केले.

पंतप्रधानपदाची क्षमता असूनही काँग्रेसने स्वार्थी राजकारणासाठी त्यांना संधी न दिल्याचा आरोप

एनडीए खासदारांच्या बैठकीत चक्क प्रणव मुखर्जी अन् शरद पवारांमध्ये पंतप्रधानपदाची क्षमता असूनही काँग्रेसने स्वार्थी राजकारणासाठी त्यांना संधी न दिल्याचा आरोप केला. हे मोदी म्हणतात न म्हणतात तोच मणिपूर प्रश्नावरून विश्वासदर्शक ठरावादरम्यान पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र पुन्हा सत्तेसाठी पक्ष फोडण्याचे खंजिररूपी आद्य प्रवर्तक शरद पवार असल्याचा आरोप केला. एकूणच काय, तर शरद पवार पुन्हा स्तुतीसुमने आणि टीकेच्या रूपाने केंद्रबिंदू ठरलेत. यातून उद्या शरद पवारांना भाजपने सोबत घेऊन उपपंतप्रधान किंवा अन्य कोणत्या पदाचे लाभार्थी बनविले तर आश्चर्य वाटू नये. आता एकूणच राजकीय वाटचाल आणि राजकीय कुरघोड्यांच्या खेळी पाहता जनतेलाही याचे आश्चर्य वाटायचे कारण नाही.

——————————————

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज