rajkiyalive

राष्ट्रवादीतील संशयकल्लोळ कायमच

सह्याद्रीचा सिंह शरद पवारांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजितदादांबाबत मवाळ भूमिकेमुळे अस्वस्थता

 

 अमृत चौगुले, जनप्रवास 

मुत्सद्दी नेते अन् सह्याद्रीचा सिंह असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या चाणक्यनीतीचा कोणालाच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीतील फूट ते पुतणे अजित पवार यांच्या भेटी, फूटच नसल्याची भूमिका यामुळे संशयकल्लोळ आहे. अगदी ‘अजितदादांना पुन्हा माफी नाही’ म्हटले तरी यामागे तेच आहेत का, असा कयासही बांधला जात आहे. नाशिक, बीड आणि कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या सभेमध्ये पंतप्रधानांबद्दल स्तुतीसुमने उधळली, दुसरीकडे सरकारवर टीका केली. पण अजित दादा असोत वा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत टोकाची भूमिका न जाहीर केल्याने संशयकल्लोळ अधिक वाढला आहे. यातून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे सोडाच, ज्या भाजप मित्रपक्ष एनडीएविरोधात इंडियाच्या मोटीतील ते प्रमुख नेते असल्याने तेथेही अस्वस्थता वाढली आहे.

हेही वाचा

जयंतरावांचा बालेकिल्ला मजबूत; अजितदादांना सांगली कोसो दूर

ॲड. वैभव पाटील यांचा अजितदादा गटात प्रवेश

माजी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी अजीतदादा गटात

पुरोगामित्वाचे व्रत जपणारे चतुरस्त्र नेते शरद पवार यांची एकूणच राजकीय वाटचाल आक्रमक आणि विकासाभिमुख आहे. अर्थात हे करताना नेहमीच ते सत्तेच्या केंद्रस्थानी आणि भल्या-भल्या राजकारण्यांनाही चक्रावून सोडणारे अन् डाव-प्रतिडावाने चितपट करणारे ठरले आहे. अगदी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा त्यांनी सांगितला तरी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्याविरोधातही जावून त्यांनी पुलोदचा प्रयोग राबवत सर्वाधिक तरुणवयातील मुख्यमंत्री करणारा ठरला होता. त्याला भले खंजिराची उपमा असो वा काहीही. अशाच मुत्सद्देगिरीने ते केंद्रीय राजकारणातही महत्त्वाचे नेते ठरले आहेत.

हेही वाचा

राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण

जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी

काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादीची स्थापना करताना महाराष्ट्रात त्यांनी राज्याच्या सत्तेची दोर अप्रत्यक्ष अनेक वर्षे आपल्याकडेच ठेवली होती. केंद्रातही कृषी, संरक्षणमंत्र्यांपासून अनेक महत्त्वाची खाती त्यांनी बजावली. त्यामुळे महाराष्ट्रापुरता मर्यादित त्यांचा राष्ट्रवादी पक्ष असला तरी काँग्रेस आणि समविचारी पक्षांना नेहमीच त्यांना विचारात घ्यावेच लागत असे व आजही लागते. अर्थात सन 2014 नंतर राजकीय स्थित्यंतरात काँग्रेसपाठोपाठ त्यांच्या पक्षालाही घरघर लागली तरी त्यांचा आकडा राज्यात 50 आमदारांच्या खाली आला नाही. राष्ट्रीय पक्ष काँग्रेस खाली आला तरी त्यापेक्षा त्यांची ताकद आजही राज्यात मोठीच राहिली. त्यामुळेच भाजपविरोधी मोट बांधण्यातही त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे.

एवढेच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना सुरुवातीला राजकीय गुरू म्हणून बारामतीत येऊन उपमा दिली होती. पण त्यानंतर भाजपच्या आक्रमक आणि सत्तेसाठी फोडा, झोडाच्या बदलत्या राजकारणात अन्य पक्षांबरोबर त्यांनाही फटका सहन करावा लागत गेला. तरी तो एवढा मोठा नव्हता.

दरम्यान, सन 2019 मध्ये राज्यात भाजप-शिवसेना नैसर्गिक व परंपरागत महायुती बहुमताने पुन्हा सत्तेवर आली. तरीही त्यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या सत्तासंघर्षावरून मतभेद झाला. युती फुटीच्या उंबरठ्यावर असताना एकीकडे भाजपला खेळवत अजित पवारांच्या माध्यमातून फूट अन् पहाटेच्या शपथविधीचा खेळ केला. अर्थात राष्ट्रवादी भाजपने फोडल्याची चर्चा असताना अजितदादांच्या चार दिवसात यु टर्नने भाजपला सत्तेतून पायउतार व्हायला लावून तोंडावर पाडण्याच्या खेळीचे मास्टरमाईंड शरद पवार होते हे चर्चेत होते. त्यावर खुद्द भाजप नेत्यांपासून ते स्वत: शरद पवारांच्या कबुलीने स्पष्ट झाले. राष्ट्रपती राजवट हटविण्यासाठी ती खेळी झाली अन् पुन्हा शिवसेना-काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा राज्यात पहिला (अर्थात पुलोदचीच पुनरावृत्ती) प्रयोग शरद पवारांनी केला. बहुमतातील भाजपला सत्तेबाहेर बसविले होते.

एवढेच काय, सातार्‍यातून खासदार उदयनराजे भोसलेंना राष्ट्रवादीतून फोडून भाजपमध्ये घेतले गेले. त्यावेळीही पोट निवडणुकीत राजकारणातून निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या श्रीनिवास पाटील या मित्राला पुन्हा शरद पवार यांनी मैदानात उतरविले. त्यावेळी केंद्र, राज्यातील भाजपची पूर्ण ताकद लागली असताना पावसातील एका सभेत ‘शरद पवार यांच्या रूपाने सह्याद्री भिजला’ अशी हवा झाली अन् त्या सभेने पुन्हा उदयनराजेंना चितपट करीत श्रीनिवास पाटील यांना पवारांवरील विश्वासाने खासदार केले. यामुळे शरद पवार यांची प्रतिमा आणखी उंचावली होती.

अर्थात ही सल भाजपला आणि विशेषत: मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ‘पुन्हा येईन’चा डाव अपूर्ण राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होती. त्या नाटकाचे सूत्रधार शरद पवार आहेत हेही ते जाणून होते. त्यातूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिले आणि दुसरे शरद पवार यांचा पक्ष आणि ते दोघे काँग्रेसपेक्षा भाजपचे मोठे टार्गेट ठरले. त्यातूनच भाजपने पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांना शिवसेनेतून फोडून महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार केले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आणि चिन्हासह पक्षच काढून घेण्याचा डावही भाजपने यशस्वी केला. पाठोपाठ राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्यासह दिग्गज आमदारांना फोडून उपमुख्यमंंत्री व महत्वाची मंत्रिपदे बहाल करीत दुसरा डाव यशस्वी केला. एकूणच दोन्ही पक्षांना आणि नेतृत्वांनाही भाजपने जणू जायबंदीच केले आहे.

वास्तविक भाजप आणि मोदींच्या वाढत्या करिष्म्याला ब्रेक लावण्यासाठी विरोधी पक्षाने मिशन लोकसभा 2024 ची जोरदार तयारी सुरू केली. त्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या यशाने त्या शक्तीला बळ मिळाले होते. त्यादृष्टीने मोदी हटावची व्यूहरचना सुरू होती त्यात महाराष्ट्र महत्त्वाचे राष्ट्र आणि विशेषत: शरद पवार यांच्यासारखा नेता महत्त्वाचा होता. दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी मोठा विरोधक असल्याचे स्पष्ट होते. त्यालाही राष्ट्रवादी फोडीने ब्रेक लावण्याचे काम भाजपने केले. अजित पवार फुटले त्यांनी अगदी शरद पवारांवर टीका करताना वयही काढले, त्यामुळे भाजपला खिंडार पडले असे वरकरणी वाटू लागले.

पण तरीही शरद पवारांची नेहमीच धुरंधर खेळी पाहता राष्ट्रवादी फोडली की पहाटेच्या शपथविधीप्रमाणे अजितदादांना फोडून भाजपचा पट काढायचा डाव आहे अशी शंका व्यक्त होत चर्चा सुरू झाली. दुसरीकडे शरद पवारांनाच भाजपसोबत जावून राष्ट्रवादी सत्तेसोबत भक्कम ठेवण्यासाठी पहिली खेळी आहे का असाही संशय व्यक्त होऊ लागला. त्याला अजित पवारांसोबत होणार्‍या कौटुंबिकच्या नावावर होणार्‍या बैठका, घरी ये-जा पासून राष्ट्रवादीत फूटच नाही, अजित पवार पक्षाचेच नेते आहेत, अशा खुद्द शरद पवार, पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची पुष्टीही मिळू लागली आहे.

अर्थात शरद पवार गट व अजित पवार गट असे गोंडस नावाखाली सुप्रिया व प्रफुल्ल पटेल हे दोन कार्याध्यक्ष, जयंत पाटील आणि सुनील तटकरे हे दोन प्रदेशाध्यक्ष आदींचा खेळ सुरूच आहे. एकूणच या सर्वामुळे जनतेत आणि इंडियामधील काँग्रेस-उद्धव ठाकरे शिवसेना आणि अन्य पक्षांना मात्र संभ्रमात पवारांविषयी संभ्रम वाढविणारे ठरत आहे. यावर वारंवार दोन्हीकडून टीका, जाब-जबाब होत राहिले आहेत. पण पवारांनी राष्ट्रवादीच्या पुन:बांधणीचा निर्धार करीत यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेत दौरे सुरू केले. जिल्हानिहाय स्वाभिमान सभा सुरू केल्यानंतर पुन्हा शरद पवार नव्या दमाने मैदानात उतरतील असे वाटले.

त्यानुसार पवार यांनी पहिल्यांदा नाशिकमध्ये अजितदादा गटाचे छगन भुजबळांच्या प्रभागात सभा घेतली. तेथेही फार काही टीका केली नाही. त्यामुळे पुन्हा संशयकल्लोळ सुरू झाला. पाठोपाठ धनंजय मुंढे यांच्या बीडला सभा झाली. दोन दिवसांपूर्वी ज्या कोल्हापुरात राष्ट्रवादीची स्थापना झाली त्याच मातीत पुन्हा शरद पवारांनी नव्याने एल्गार करीत असल्याची घोषणा झाली. तेथे साहजिकच हसन मुश्रीफ यांना पवार झटका देतील असे वाटले. त्यातच छत्रपती शाहू महाराज यांनी सभेचे अध्यक्षपद स्वीकारल्याने कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या आशा उंचावल्या होत्या. या सभेत जणू शरद पवार शाहू महाराजांनाच लोकसभेच्या मैदानात राष्ट्रवादीची उमेदवारीची घोषणा करून पुरोगामी कोल्हापुरात पुन्हा झेंडा फडकविण्याचा निर्धार करतील असे वाटले. पण त्यांनी तेथे चांद्रयानच्या निमित्ताने पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अटलजींबरोबरच नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. दुसरीकडे फार आक्रमक न होता भाजपच्या जनताविरोधी भूमिकेवर टीका केली. सोबत जाता जाता हसन मुश्रीफांना ‘गद्दारी केलीत’ एवढाच संदेश दिला. त्यामुळे या सभेतून काय साध्य झाले असा प्रश्न शरद पवार निष्ठावंत गटासह सहकारी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटालाही पडला आहे.

एकीकडे शरद पवार अपेक्षेप्रमाणे पुन्हा सह्याद्रीचा सिंह गर्जला अशा भीमगर्जनेने पुन्हा आक्रमक होतील. सातार्‍याची पुनरावृत्ती प्रत्येक मतदारसंघात होण्यासाठी मोर्चेबांधणी करतील. दुसरीकडे अजित पवारांसह सर्वांवर सर्वतोपरी कारवाई करतील. त्यांच्या पाडावाची व्यूहरचना होईल अशा सहयोगी पक्षांपासून राष्ट्रवादी प्रेमींना वाटले होते. पण शरद पवार यांची मवाळ व ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका आहे का? असा संशयकल्लोळ कायम राहिला आहे.

आता 1 सप्टेंबरला मुंबईत होणार्‍या एनडीएच्या बैठकीत पुन्हा त्यांनी सहभागी ताकदीने होण्याचा निर्धार केला आहे. खरा. पण त्यांची पुढे जावून काय भूमिका राहते याबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज