rajkiyalive

सांगा राजेंद्र पाटील यड्रावकर कुणाचे?

दिनेशकुमार ऐतवडे

(RAJEBDRA PATIL YADRAVKAR)  शिरोळ तालुक्याचे वजनदार नेते, शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नुकताच आपले बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शिरोळ तालुक्यात बॅनरबाजी करून राजकीय वातावरण पेटवत ठेवले आहे. येणार्‍या निवडणुकीत आपण पुन्हा एकदा इच्छुक असल्याचे त्यांनी यामधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु येणार्‍या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर नेमक्या कोणत्या पक्षाकडून लढणार की पुन्हा एकदा अपक्ष लढणार याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

स्व.रत्नापाण्णा कुंभार आणि स्व.शामराव पाटील यड्रावकर यांचा राजकीय संघर्ष केवळ शिरोळा तालुका नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने पाहिला आहे. या राजकीय संघर्षात शामराव पाटील यांना आपल्या राजकीय आयुष्यात कधीही आमदार होता आले नाही. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचे सुपूत्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मात्र ती राजकीय कसर भरून काढली. शामराव पाटील यड्रावकर यांनी पहिल्यापासूनच शरद पवारांची पाठराखण केली आहे. त्यांच्याच नावावरून त्यांनी साखर कारखानाही मंजूर करून घेतला आहे. त्यांच्या पश्चात राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही पवार घराण्याच्या पाठिशी कायम राहिले.

हेही वाचा

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाआघाडीकडून घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सावकार मादनाईक यांना तिकीट मिळाले. त्यामुळे बंडखोरी करत राजेंद्र पाटील यांनी बंडाचा झेंडा हातात धरून आमदारकी खेचून आणली. त्यांच्या नशिबाने म्हणा किंवा राजकीय परिस्थिती म्हणा, भाजप शिवसेना युती तुटली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आली. राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि मंत्रीपद पटकावले. याचवेळी इचलकरंजीच्या आमदार प्रकाश आवाडेंचा निर्णय चुकला त्यांनी भाजपला जवळ केले परंतु भाजप सत्तेपासून दूर गेला.

राजेंंद्र पाटील यड्रावकर यांना राज्यमंत्रीपद मिळाले. आरोग्य खाते त्यांच्याकडे आले. आपल्या मंत्रीपदाचा त्यांनी चांगला उपयोग करून घेतला. कोरोणा काळात अहोरात्र झटून त्यांनी रूग्णांची सेवा केला. शिरोळ तालुक्यात त्यांनी कोरोना रूग्णांसाठी स्पेशल पॅकेज मंजूर करून आरोग्य मंत्री कसा असावा हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. राजकीय उलथापालथ झाली आणि सत्ता संपुष्ठात आली. राज्याच्या नव्या राजकीय समिकरणात त्यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले. परंतु त्यांनी आपल्या कार्यात कधीही कमी पडू दिले नाही.

हेही वाचा

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

तालुक्यात शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र पाटील यड्रावकरांची खरी ताकद कळाली ती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत. त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना फेटा बांधून एकदमच मतदान करून घेतले आणि दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांचा पराभव केला. सध्यातरी शिरोळा तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजकीय ताकद वाखाणन्यासारखी आहे.

ते आता कोणता झेंडा खांद्यावर घेणार ?

परंतु खरी अडचण आहे ती येणार्‍या विधानसभा निवडणुकीत ते आता कोणता झेंडा खांद्यावर घेणार. गेल्या पंचवार्षिमध्ये अपक्ष निवडून येउन शिवसेना पाठिंबा दिला, त्यानंतर शिंदे गटात सामिल झाले. आता तर पुन्हा एकदा राज्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सत्तेत सामिल झाला आहे. त्यामुळे शिंदे गट, अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना सर्वच आपआपले उमेदवार रिंगणात उतरविणार यात शंका नाही. येणारी निवडणूक महायुतीतर्फे लढवणार हे याधीच तिन्ही नेत्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे विद्यमान आमदार म्हटले तर राजेंद्र पाटील यड्रावकरांना उमेदवारीची लॉटरी लागू शकते. परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजीराव माने यांचे आणि यड्रावकरांचे विस्तव आडवे जात नाही. गेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून माने यांच्या सूनबाई निवडून आल्या आणि नगरपालिकेत इतर सदस्य मात्र यड्रावकर गटाचे निवडून आले. त्यामुळे या दोन्ही गटात राजकीय संघर्ष कायमच झाला. त्यामुळे माने आणि यड्रावकर यांचे सूत जुळणार का हाही मोठा प्रश्न आहे.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये असलेल्या गणपतराव पाटील यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महाआघाडी असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात असणार्‍या माजी आमदार उल्हास पाटील हेही पुन्हा एकदा नशीब आजमाविण्यासाठी तयारी करीत आहेत. उल्हास पाटील यांच्यावर उध्दव ठाकरे यांची मर्जीही आहे. त्यामुळे उल्हास पाटील हेही उमेदवारीचे दावेदार ठरू शकतात. यामध्ये जर राजू शेट्टी यांनी जर उडी घेतली आणि ते महाआघाडीत सामिल झाले तर संपूर्ण राजकीय समिकरणे बदलणार आहेत. कारण शिरोळची जागा ते कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाहीत. स्वाभिमानीतर्फे पुन्हा एकदा सावकार मादनाईक महाआघाडीचे उमेदवार होवू शकतात. परंतु हे सर्व जर तरच्या गोष्टी राजू पाटील यड्रावकर कोणत्या पक्षाकडून लढणार की पुन्हा एकदा अपक्ष लढणार हाच प्रश्न आहे.

राजकीय लढाई लढत असताना अगोदरच सर्व गणिते जूळून येत नसतात. त्यामुळे ऐनवेळी काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते सर्व निर्णय बरोबरच ठरतील हेही काही सांगता येत नाही. गेल्या पंचवार्षिकमध्ये पहिल्यापासूनच राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सर्वच निर्णय बरोबर ठरले. अगदी उमेदवारीपासून ते शिवसेनेला पाठिंबा देण्यापर्यंत त्यांचे निर्णय बरोबर ठरून मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. यंदा मात्र आता त्यांना पुन्हा एकदा निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या यड्रावकर शिंदे गटात आहेत. अजित पवार यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबध आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील यांचेही ते नेतृत्व मानतात. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत कोणता पेच निवडायचा हा मोठा पेच त्यांच्यापुढे आहे. सध्या तर सांगा यड्रावकर कुणाचे हीच चर्चा तालुक्यात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज