बड्या ग्रामपंचायतींमध्ये उडणार धुरळा, गुलाल कुणाचा
जनप्रवास : अनिल कदम
ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक पक्षीय चिन्हावर होत नसली तरी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे गट शिवसेना यांच्यात चुरस होईल. कुंडल, हरीपूर, नांदे्र, तांबवे, ढालगांव, बिळूर, कारंदवाडी, वाकुर्डे बुद्रुक, नेलकरंजी, करगणी येथे जोरदार रस्सीखेच सुरु आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवरील नेत्यांच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यामुळे या रंगतदार होणार असून, गावपातळीवरील राजकारणाला ऊत येणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूक लागलेल्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून सोमवारपासून (दि. 16) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर गाव पातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे.
डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणार्या नव्याने स्थापित व चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुकान होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या (सदस्यपदासह सरपंच) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम रावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी शिराळा तालुक्यात सर्वाधिक 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील.
त्यापाठोपाठ कवठेमहांकाळ तालुका 21, खानापूर 3, जत 5, तासगाव 2, पलूस 3, कडेगाव 2, वाळवा 4, आटपाडी 16, मिरज तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गतवर्षी झालेल्या निवडणुकांमधून ओबीसी आरक्षण वगळल्याने स्थगित करण्यात आलेल्या कुंडल, हरीपूर, नांद्रे, मळणगाव व चिंचोळे या पाचही ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरु झाली. संख, मौजे डिग्रज आणि जानराववाडी केवळ लोकनियुक्त सरपंचपदासाठी रणधुमाळी सुरु आहे. तर 23 ग्रामपंचायतमधील 29 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
उमेदवारी अर्ज दि. 16 ते 20 ऑक्टोबरपर्यंत सादर करता येणार आहेत. मात्र, त्यांच्याच गावात धुमशान होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या ग्रामपंचायतीपैकी काही गावे तालुक्यातील नेत्यांची आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायती संवेदनशील म्हणून ओळखल्या जावू लागल्या आहेत. ग्रामपंचयतीमध्ये सत्ता गावात आणण्यासाठी नेत्यांची पराकाष्ठा सुरू झाली आहे. निवडणुकीत सुमारे चारशे वॉर्डमधून 1 हजार जागांसाठी धुमशान होणार आहे. तसेच पोटनिवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतची संख्याही असल्याने जिल्ह्यात राजकारणामुळे वातावरण गरम झाले आहे.
हेही वाचा
जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या जोरावर राज्यात सत्तांतर झाले. परंतू भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर पुन्हा समीकरणे बदलली आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार गट भाजप, शिंदे गटासोबत सत्तेत आला आहे. सत्तात्तरानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिन्ही पक्षांनी सत्तेचा संकल्प सोडला आहे.
शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी आ. शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडीक यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमशान सुरु आहे. त्यापाठेापाठ कवठेमहांकाळ तालुक्यात भाजपचे खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, अनिता सगरे, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटात चुरस आहे. आटपाडी तालुक्यात शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटात लढत होत आहे.
कुंडल, हरीपूर, नांद्रे या ग्रामपंचायतीसाठी जोरदार रस्सीखेच दिसून येते. कुंडलमध्ये आ. अरुणअण्णा लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड विरुद्ध जिल्हा बँकेेचे संचालक व काँग्रेस नेते महेंद्र लाड यांच्यात काट्याची लढत आहे. हरीपूरमध्ये काँग्रेसचे नामदेवराव मोहिते, राष्ट्रवादीचे माजी सभापती अशोक मोहिते यांच्या पॅनेलविरोधात भाजपचे अरविंद तांबवेकर यांच्यात तर नांदे्रमध्ये भाजपचे पंचायत समितीचे माजी उपसभापती राहुल सकळे यांच्याविरोधात काँग्र्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या गटात चुरशीची लढत होईल.
गावातील मिनी मंत्रालयातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी जोमात होती. परंतू राज्यात सत्ता नसल्याने गावपातळीवरील नेत्यांना म्हणावे तसे बळ मिळत नसल्याचे चित्र दिसून येते. ओबीसी आरक्षण आणि प्रभाव रचनेवरील आक्षेपामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुका लांबलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होत नसल्या तरी गावात आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या गावांत रंगली रणधुमाळी
– शिराळा तालुक्यातील बांबवडे, वाकुडे बु. मादळगांव, शिरसी, धसवाडी, करुंगली, खुजगांव, रांजणवाडी, भाटशिरगांव, रिळे, अंबेवाडी, खराळे, कुसाईबाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, बेलवाडी, फकीरवाडी, चिखलवाडी, अस्खलवाड़ी, इंगरुळ, चिंचेवाडी, कुसळेवाडी, मेणी, मोरेवाडी, मराठेवाडी, प.त. वारुण, मानेवाडी, पाचगणी व कदमवाडी
– कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगांव, देशिंग, घोरपडी, करोली टी, मोरगांव, रामपूरवाडी, गर्जेवाडी, ढोलेवाडी, दूधेभावी, कदमवाडी, कुंडलापूर, कोकळे शिंदेवाडी घो. अग्रण धुळगांव, पिंपळवाडी, बसाप्पाचीवाडी ढालगांव, जाधववाडी, करलहटी, झरेवाडी.
– आटपाडी तालुक्यातील चिंचोळे, नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, आंबेवाडी, बनपुरी, करगणी, मुठेवाडी, निंबवडे, पिंपरीखुर्द, पुजारवाडी, विभूतवाडी, ओटेवाडी व कानकात्रेवाडी.
– जत तालुक्यातील गुलगंजनाळ, कोंत्येबोबलाद, बिळूर, कोणबग्गी, खिलारवाडी
– तासगांव तालुक्यातील चिखलगोठण व बिरणवाडी
– पलूस तालुक्यातील कुृंडल, राडेवाडी, आमणापूर व विठ्ठलवाडी
– कडेगांव तालुक्यातील वाजेगांव, शाळगाव, उपाळे मायणी व चिंचणी वांंगी.
– वाळवा तालुक्यातील तांबवे, शिरटे, साटपेवाडी, कारंदवाडी.
– खानापूर तालुक्यात भेंडवडे, देवनगर व साळशिंगे
– मिरज तालुक्यातील हरीपूर, नांद्रे, कावजी खोतवाडी, निलजी बामणी व वाजेगांव.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



