rajkiyalive

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

दिनेशकुमार ऐतवडे

दिवाळीनंतर लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपने राज्यात 45 प्लसचे टार्गेट ठेवले आहे. इंडिया आघाडीही राज्यात वातावरण तापविण्यास सुरूवात केली आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शे्ट्टी यांनीही लोकसभेसाठी मशागत करण्यास सुरूवात केली आहे. गतवर्ष्ीच्या उसाला 400 रूपये आणि यंदाच्या उसाला चांगला दर मिळावा यासाठी त्यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. येणार्‍या 17 तारखेपासून ही यात्रा सुरू होणार आहे. त्यासाठी जनजागृती सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. एकंदरीत येणार्‍या लोकसभेसाठी राजू शेेट्टी यांनी एकप्रकारची मशागतच सुरू केली आहे, असे म्हणावे लागले.

शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून स्वाभिमानीची स्थापना झाली. राजू शेट्टी यांनी आजपर्यंत शेतकर्‍यांसाठी अनेक आंदोलन करून शेतकर्‍यांना चार पैस जास्त मिळवून दिले आहेत. राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार साखर कारखानदारांकडे साखरेचा चढलेला भाव इथेनॉलमधून मिळालेला पैसा याचा विचार करता साडेचार हजार कोटी शिल्लक असताना आम्ही चारशे रुपयेची मागणी करत आहे, मात्र ते द्यायला तयार नाहीत.

शेतकर्‍यांना चारशे रूपये मिळालेच पाहिजेत यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा काढली आहे. यात्रेच्या निमित्ताने त्यांनी सत्ताधार्‍यांवर सडकून टिका करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साखर सम्राटांच्या ताटाखालचे मांजर झाल्याची घणाघाती टीकाही त्यांनी नुकतीच केली आहे.

अजित पवारांवरही त्यांनी टीका केली आहे. राजू शेट्टींची सध्याची वाटचाल एकला चलोरे अशीच आहे. इंडिया आघाडीत त्यांना आणण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहे. सध्याच्या घडीला हातकणंगले लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीकडे ताकदीचा उमेदवार नाही. इंडिया आघाडीला उमेदवार आयात करावा लागणार आहे. भाजप महायुतीचीही सध्या तीच अवस्था आहे. सध्याचे विद्यमान खासदार धैर्यशील माने असले तरी त्यांच्याबद्दल मतदार संघात मोठी नाराजी आहे. मतदार संघात विकासकामे कोठे झाले आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे.

संपर्काच्या बाबतीतही माने पिछाडीवर आहेत. भाजपने राज्यात 45 प्लसची योजना आखली आहे. यामध्ये हातकणंगलेचाही समावेश आहे. हातकणंगले आणि कोल्हापूर दोन्ही जागा आम्ही ताब्यात घेवू अशी गर्जना भाजपचे नेते करीत आहेत. त्यामुळे मंडलिक आणि माने यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

हेही वाचा

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य

ऐनवेळी धैर्यशील माने यांना भाजपच्या तिकीटावर लढायलाही सांगीतले जाईल. दुसर्‍या बाजूला राजू शेट्टींनाही भाजप आघाडीत आणण्याचा डाव खेळला जावू शकतो. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत राजू शेट्टी भाजप आघाडीत होते. त्यामुळे भाजप त्यांना नवीन नाही. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेमध्ये सामिल व्हावे लागेल हे आता सर्वांना समजले आहे. राजू शेट्टीही अखेरच्या क्षणी भाजप आघाडीत जावू शकतात असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी लोकसभेला काहीही होवू शकते.

हातकणंगलेची गेलेली जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी इंडिया आघाडी, राजू शेट्टी प्रयत्न करीत आहेत. राजकारणात केव्हाही आणि काहीही घडू शकते. आपण फक्त तयार असावे लागते. त्यामुळे राजू शेट्टी आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. राजू शे्ट्टींचे संघर्ष यात्रा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून निघणार आहेत. 22 दिवस ही यात्रा चालणार असून, हातकणंगले लोकसभा मतदार संघ यामध्ये कव्हर होणार आहे. अजून कारखाने सुरू होण्यासाठी अवधी आहे. त्या अगोदरच कारखानदारांना खिंडीत गाठण्याचा डाव शेट्टींनी आखला आहे.

यंदा उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी तर होणार आहेच, त्याचबरोबर उसाला चांगला दर मिळण्याची शक्यताही आहे. त्यामुळे यंदाचे वातावरण कोणत्याही परिस्थितीत मारायचेच असा चंग त्यांनी बांधला आहे. दिवसभर पायाला भिंगरी बांधून ते मतदार संघ पिंजून काढत आहेत. कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोरेची भूमिका त्यांची आहे. भाजप आघाडीकडे मानेंशिवाय उमेदवार नाही आणि त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. इंडिया आघाडीने तर राजू शेट्टींना रेड कार्पेट अगोदरच टाकले नाहे. त्याच्याकडे हक्काचा दुसरा उमेदवारच नाही. त्यामुळे सध्यातर राजू शे्ट्टींचे पारडे जड होताना दिसत आहे.

ऐनवेळी भाजपशी सलगीची शक्यता

लोकसभेच्या रणांगणात भाजपने 45 प्लसचे टार्गेट ठेवले आहे. राजू शेट्टी भाजपला परके नाहीत. मानेंबद्दल मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे राजू शेट्टींनाही भाजप गळ घालू शकतो. भाजपने देशात अनेक विरोधकांना जवळ केले आहे. राजू शेट्टींनाही ते आपल्या आघाडीत घेवू शकतात. विजयाची खात्री असल्यास शेट्टीही भाजप आघाडीत जाण्यास मागे पुढे पाहणार नाहीत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज