rajkiyalive

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

हातकणंगले, कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर जयंतरावांची गुगली, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

 

अनिल कदम, जनप्रवास

राजकीय पक्षांकडून लोकसभेची तयारी सुरु असताना मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हातकणंगले आणि कोल्हापूरच्या जागेवर दावा केला. जयंतरावांच्या या गुगलीने तर्कवितर्क लढवले जात आहेत. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष व पूत्र प्रतीक यांना मैदानात उतरवण्याचा प्रयत्न आहे, की सध्या स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांची एकला चलो ची भूमिका आहे, तशी शेट्टींनी तयारी सुरु केली आहे. या परिस्थितीत इंडिया आघाडीकडे अद्याप उमेदवार नसल्याने शेट्टींना सोबत घेण्यासाठी प्रतीक यांच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. दुसरीकडे भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे चित्र दिसते.

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरणही तापू लागले आहे. निवडणुकीसाठी भाजप विरोधी असलेल्या पक्षांची एकत्रित मुठ बांधली जात आहे. भाजप विरोधातील पक्ष इंडिया आघाडीत सामील होऊ लागले आहेत. त्यामुळे देशात काँग्रेसचे बळ वाढत असल्याचे चित्र दिसून येते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस ही लोकसभेची तयारी जोमाने करीत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

लोकसभा निवडणुकीची चर्चा करताना इंडिया आघाडीकडे राष्ट्रवादीने अधिक जागांची मागणी करावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. याच बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली आणि कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी केली. हातकणंगलेतील जागा मागील काही वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी अदलाबदल होत आहे. असे असताना 2024 च्या निवडणुकीसाठी हातकणंगलेच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न केला.

गत निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते माजी खा. शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करुन निवडणूक लढवली होती. सगल दोन वेळा बाजी मारल्यानंतर शिवसेनेचे धैर्यशिल माने यांच्याकडून 2019 च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आगामी निवडणुकीत शेट्टींनी कुणाशीही आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून निवडणुकीची तयारी सुरु असताना साखर कारखान्यांचा हंगाम सुरु होण्यापूर्वी गतवर्षीच्या ऊसापोटी 400 रुपये देण्याच्या मागणीसाठी पदयात्रा सुरु केली आहे.

त्यामुळे शेट्टी यांनी ना भाजप-महायुती, ना महाविकास आघाडी यांच्याशी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे सध्या उमेदवार दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पुत्र प्रतीक यांच्यासाठी चाचपणी केली जात आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून जयंत पाटील यांच्या पाठोपाठ प्रतीक पाटील यांनी देखील इस्लामपूर मतदारसंघ आणि राजारामबापू उद्योग समूहात लक्ष घालायला सुरुवात केली होती.

सध्या जयंत पाटील यांचे राज्याच्या राजकारणातील वाढलेले महत्त्व आणि जबाबदार्‍या पाहून इस्लामपूर मतदारसंघातील आणि राजारामबापू कारखान्यातील निर्णय घेण्यासाठी प्रतीक पाटील यांच्या हाती साखर कारखान्याची जबाबदारी देण्यात आली. प्रतीक यांच्या रुपाने या घराण्यातील तिसर्‍या पिढीचा राजकीय प्रेवश झाला आहे. कारखान्याच्या बिनविरोध संचालकपदी वर्णी लागल्यानंतर अध्यक्षपदीही निवड झाली आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रतीक यांची खर्‍या अर्थाने राजकारणात एंन्ट्री झाली आहे. कारखान्याचे अध्यक्षपद नसतानाही त्यांनी गत विधानसभा निवडणुकीपासून जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली होती.

हेही वाचा

शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

मागील काही दिवसांपासून केवळ राजकीय नव्हे क्रिडा स्पर्धांचे नियोजनही त्यांच्याकडून केले जात होते. सध्या राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून हंगाम सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर गावागावात जावून शेतकर्‍यांची संवाद साधत आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रतीक यांचा वाढता वावर पाहता आगामी निवडणुकीत उतरण्याच्या दृष्टीकोनातून तयारी केली जात असल्याचे दिसून येते.
आगामी लेाकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. विद्यमान खा. धैर्यशिल माने शिंदे गटाकडून निवडणूक लढविणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

त्यामुळे माने यांनी पुन्हा जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर भाजपला पाठींबा दिला. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोल्हापूर दौर्‍यावर आले असताना त्यांनी आमदार आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल यांना लोकसभेची तयारी करण्याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपकडून राहुल यांचे नाव पुढे येवू शकते.

सद्यस्थितीत राजू शेट्टी यांची एकला चलोची भूमिका आहे, ऐनवेळी इंडिया आघाडीकडे अद्याप उमेदवार नसल्याने शेट्टींना सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची खेळी असू शकते. या कारणांमुळेच प्रतीक यांच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, अशी चर्चा रंगली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज