rajkiyalive

हरिपुरात बोंद्रे पॅनेलची सत्तेची हॅटट्रिक;

विरोधक मोहिते पॅनेलही षटकार एंट्री

 

थेट पहिल्या महिला सरपंचपदी चौरंगी लढतीत मतविभागणीनंतरही राजश्री तांबवेकर यांची 709 मतांनी बाजी

जनप्रवास । सांगली

हरिपूर (ता. मिरज) ग्रामपंचायत निवडणुकीत संगूदादा बोंद्रे पॅनेलने सरपंचपदासह 18 पैकी 12 जागांवर बाजी मारत विजयाची हॅटट्रिक साधली. पण विरोधक हरिपूर विकास आघाडी मोहिते पॅनेलनेही सहा जागांचा षटकार मारत पुन्हा ग्रामपंचायतीत एंट्री केली.गेल्या दोन टर्मपासून मोहिते गट सत्तेतून बाहेर होता, तर गेल्या पंचवार्षिक टर्ममध्ये बोंद्रे गटाने 18-0 अशी विरोधक मुक्त सत्ता काबिज केली होती. पण यावेळी मोहिते पॅनेलच्या सहा सदस्यांच्या एंट्रीने विरोधक उभे ठाकल्याने बोंद्रे गटाला हा दणका आहे. पहिल्या थेट महिला सरपंचपदी बोंद्रे गटाचे प्रमुख अरविंद तांबवेकर यांच्या पत्नी राजश्री तांबवेकर (2605 मते) यांनी 709 मतांनी बाजी मारली. त्यांनी मोहिते गटाचे पॅनेलप्रमुख अशोक मोहिते यांच्या पत्नी शोभा मोहिते (1896 मते) यांचा पराभव केला. सरपंचपदासाठी अपक्ष सौ. अश्विनी संजय सावंत (मते 998) घेऊन तिसर्‍या स्थानी राहिल्या. संगूदादा बोंद्रे स्वाभिमानी आघाडीच्या माजी सरपंच कविता बोंद्रे यांना मात्र केवळ 166 मतांसह डिपॉझिटही राखता आले नाही. यापैकी कोण पसंत नाही अर्थात नोटाला 11 मते मिळाली. सदस्यपदासाठीही प्रभागनिहाय लोकांनी नोटाला 5 ते सुमारे 50 भर मते दिली.

 

हरिपुरात बोंद्रे विरुद्ध मोहिते गटात पारंपरिक लढत आहे. यात प्रामुख्याने यापूर्वी मोहिते गटाचे अधिक प्रमाणात काँग्रेसच्या सत्तेच्या बळावर वर्चस्व असे. परंतु राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून 2014 पासून हरिपुरातही भाजपच्या सत्ताछत्राखाली व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर यांच्या

नेतृत्वाखाली बोंद्रे पॅनेलची सत्ता आहे. मागील टर्ममध्ये 2018 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत तर तांबवेकर यांनी मोहिते गटाचे विरोधक काँग्रेसमधील मदनभाऊ गटाला सोबत घेत एकीची मोट बांधली. त्या आधारे मोहिते गटाचा सुफडासाफ झाला होता. त्यात मदनभाऊ गटाचे विकास हणबर यांना थेट सरपंचपदी संधी दिली. काँग्रेसचे युवानेते मदनभाऊ गटाचे संजय सावंत यांनीही तांबवेकर यांच्याशी स्थानिक पातळीवर जुळवून घेतले होते.

त्या आधारे विरोधक मुक्त सत्ता असल्याने विकासकामांना गती देण्यात आली. खासदार संजय पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या निधीतून मध्यवर्ती गावठाण तसेच विस्तारीत उपनगरांतही विकासाकामे केली. दुसरीकडे मोहिते गटालाही थेट ग्रामपंचायतीची दारे बंद झाल्याने जनसंपर्क कमी झाला होता. शिवाय विरोधक म्हणून विकासाकामे झाली नसली तरी जाब विचारण्यात अडचणी होत्या.
दरम्यान, गेल्या पंचवार्षिक टर्ममध्ये सत्तासंघर्ष उफाळून गटबाजीही निर्माण झाली होती. दुसरीकडे विस्तारीत भागात पाणी रस्त्यांसह विविध सुविधांच्या अभावामुळे नाराजीही होती. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान बोंद्रे गटात गटबाजी उफाळून आली. तरी निवडणुकीत बोंद्रे गटात प्रभागनिहाय बंडखोरी थोपविण्यात तांबवेकर यांना यश आले.

परिणामी बोंद्रे विरुद्ध मोहिते पॅनेल अशी सहा प्रभागात थेट लढत होती. परंतु थेट महिला सरपंचपदासाठी मात्र बोंद्रे गटाककडून बंडखोरी झाली. राजश्री तांबवेकर यांच्या विरोधात संजय सावंत यांनी पत्नी अश्विनी सावंत व संगूदादा बोंद्रे स्वाभिमानी आघाडीच्या कविता बोंद्रे यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केले. मोहिते पॅनेलकडून शोभा मोहिते या रिंगणात होत्या.

त्यामुळे चौरंगी लढतीत मतविभागणी झाल्यास मोहिते यांना फायदा होईल असे आडाखे बांधण्यात आले होते. त्यानुसार सर्वांकडून प्रचाराचा धडाका उडविण्यात आला. यातून झालेल्या मतदानात सुमारे 81 टक्के मतदान झाले होते. आज राजवाड्यातील अप्पर तहसील कार्यालय परिसरात मतमोजणी पार पडली.

यात राजश्री तांबवेकर यांनी सरपंचपदी बाजी मारली. त्यांच्यासह सुवर्णा आळवेकर, युवराज बोंद्रे, मथुरा फाकडे, हरिश्चंद्र हणबर, सुनिता शेरीकर, महेश बोंद्रे, मनिषा कुरणे, कोमल सूर्यवंशी, शर्वरी रांजणे, गणपती साळुंखे, श्रद्धा बोंद्रे आदी सदस्यांनी बाजी मारली.
मोहिते पॅनेलच्या प्रकाश कांबळे, गजानन जगदाळे, माधुरी हणबर, गजानन फाकडे, प्रियांका वास्कर, विणा कांबळे यांनीही बोंद्रे गटाच्या उमेदवारांचा पराभव करीत ग्रामपंचायतीत दमदार एंट्री केली आहे. निवडीनंतर हरिपुरात दोन्ही गटाने जल्लोष करीत गुलालाची उधळण केली. बोंद्रे गटाकडून नूतन सरपंच राजश्री तांबवेकर यांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.

 

हरिपूर ग्रामपंचायत निकाल

1) राजश्री तांबवेकर (बोंद्रे गट) सरपंच 2605 (विजयी)
2) शोभा मोहिते (मोहिते गट) 1996
3) अश्विनी सावंत (अपक्ष) 998
4) कविता बोंद्रे (बोंद्रे स्वाभिमानी) 166

 

काट्याची लढत, नगण्य फरक

सरपंचपदी मतविभागणीनंतरही 700 मतांच्या मताधिक्याने राजश्री तांबवेकर यांनी बाजी मारली तरी बोंद्रे विरुद्ध मोहिते पॅनेलमध्ये सर्वच प्रभागात काट्याची लढत दिसून आली. यात सर्वात कमी फरक 5 मतांचा विजयी माधुरी हणबर व पराभूत अश्विनी हणबर यांच्यात केवळ 5 मतांचा होता. सर्वाधिक फरक विजयी महेश बोंद्रे व पराभूत संजय मोहिते यांच्यात 410 मतांचा होता. अनेक जागांवर तर दहा-बारा ते 20-25 मतांच्या फरकाची काटा लढत झाली. अर्थात ग्रामपंचायतीतही प्रभागानिहाल लोकांनी उमेदवार पसंत नाहीत असे म्हणत नोटाला मते दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज