rajkiyalive

AJIT PAWAR SANGLI : निमित्त कार्यक्रमाचे…वाटचाल अजितदादा गटाची

AJIT PAWAR SANGLI : निमित्त कार्यक्रमाचे…वाटचाल अजितदादा गटाची. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पक्ष फुटीनंतर प्रथमच आज सोमवारी सांगली जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या दौर्‍याचे केवळ निमित्त आहे, पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे खंदे समर्थक महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवक अजितदादा गटाच्या वाटेवर आहेत अजितदादा पवार आज सांगली दौर्‍यावर

AJIT PAWAR SANGLI : निमित्त कार्यक्रमाचे…वाटचाल अजितदादा गटाची

जनप्रवास । सांगली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पक्ष फुटीनंतर प्रथमच आज सोमवारी सांगली जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या दौर्‍याचे केवळ निमित्त आहे, पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे खंदे समर्थक महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवक अजितदादा गटाच्या वाटेवर आहेत. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्र्री पाटील यांनीही त्यांची कोल्हापुरात भेट घेतली आहे. त्यामुळे निमित्त कार्यक्रमाचे असले तरी अनेकांची वाटचाल अजितदादा पवार यांच्या गटाकडे आहे, हे दिसून येत आहे.

विविध स्पर्धेच्या निमित्ताने अजितदादा सांगली दौर्‍यावर

अजितदादा आपल्या गटाची बांधणी करणार आहेतच पण त्याही अगोदर सांगलीतील अनेकांनी त्यांच्या गटात जाहीर प्रवेश केले आहेत. पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, इद्रिस नायकवडी यांनी यापूर्वीच प्रवेश केले आहे. माजी महापौर सुरेश पाटील यांनीही प्रवेश केला आहे. अजितदादांचा कोल्हापूरचा दौरा नुकताच झाला. त्या दौर्‍यांना सांगलीतील अनेकांनी त्यांची भेट घेतली. विविध स्पर्धेच्या निमित्ताने अजितदादा सांगली दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे कुंपणावरील आणखी किती जण त्यांच्या गटात प्रवेश करतील हे उद्याच्या कार्यक्रमावरून कळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जिल्ह्यातील राजकारणही बदलत चालले आहे.

शरद पवार यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फारकत घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजितदादा गट सांगली जिल्ह्यातही स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील असले तरीही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजितदादा गटाकडून केला जात आहे. या परिस्थितीत पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांना आ. जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले होते.

JAYANT PATIL NCP : अजितदादांबरोबर गेलेल्या नाराजांचे मनधरणीसाठी जयंतरावांचे प्रयत्न

पक्षाची बांधणी या निमित्ताने होणार आहे.

शरद पवार यांच्या दौर्‍यानंतर आता उपमुख्यमंत्री अजितदादा दौर्‍यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच सांगलीत येणार आहेत. आ. जयंत पाटील यांचे समर्थक माजी महापौर मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, स्वाती पारधी यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्याने काही नेते व माजी पदाधिकार्‍यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे, पण सोमवारी होणारा अजितदादा पवार यांचा दौरा हा धावता आहे. पण पक्षाची बांधणी या निमित्ताने होणार आहे.

दुपारी तीन वाजता ते कोल्हापूर विमानतळावरून इस्लामपूरकडे येणार आहेत.

या वेळी इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर विटा (गार्डी) येथे स्व. अनिल बाबर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ते सांत्वन करणार आहेत. त्यानंतर माजी आमदार सदाशिव पाटील व ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन चहापानचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर सांगली येथे जिल्हास्तरीय पुरूष कबड्डी निवड चाचणी स्पर्धेच्या ठिकाणी ते भेट देणार आहेत.

कुपवाड येथे भाई नेरूकर चषक खो-खो स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे.

त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या घरी भेट घेणार आहेत. यावेळी काही कार्यकत्यार्ंचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे अनेक माजी नगरसेवक अजितदादा पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सोमवारी होणार्‍या दादांच्या दौर्‍यामध्ये हे नगरसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आ. जयंत पाटील यांनी नाराजांची मनधरणी केली होती. त्याला कितपत यश येणार हे सोमवारच्या दौर्‍यावरून स्पष्ट होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज