rajkiyalive

आटपाडीचा लाल दिव्याचा दुष्काळ संपणार काय

 

मुंबईत अमित शहा यांनी राज्यातील बड्या नेत्यांची नुकतीच बैठक घेतली आणि रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या बातमीला पुन्हा एकदा पंख फुटले. आता 15 ऑगस्टपूर्वी नक्की मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सांगली जिल्ह्यात अनिल बाबर आणि गोपीचंद पडळकर हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. 1990 पासून राजकारणात असणार्‍या अनिल बाबर यांना मंत्रीपद निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल बाबर यांच्या रूपाने आटपाडी तालुक्यातील मंत्रीपदाचा दुष्काळ संपनार काय असाच प्रश्न सवार्र्समोर पडला आहे. कारण राज्याच्या निर्मितीपासून आटपाडी तालुक्याने राज्याला राजकारणात अनेक हिरे दिले असले तरी अजूनही आटपाडी तालुक्याला एकदाही मंत्रीपद मिळाले नाही. बाबर यांना मंत्रीपद मिळावे आणि आटपाटी तालुक्यातील मंत्रीपदाचा दुष्काळ संपवावा अशी चर्चा सर्वत्र रंगू लागू लागली आहे.

 

 दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास 

राज्याच्या राजकारणात  मोठा भूकंप झाला आणि एका रात्रीतच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले.

राज्याच्या राजकारणात  मोठा भूकंप झाला आणि एका रात्रीतच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले. मंत्रीपद मिळणे हा नशिबाचा आणि कर्तृत्वाचा भाग असला तरी सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि जत तालुक्याला मात्र पाण्याच्या दुष्काळाबरोबर मंत्रीपदाचा दुष्काळही जाणवत आहे. कारण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून गेल्या 64 वर्षामध्ये अजून जत आणि आटपाडी तालुक्याला मंत्रीपदच मिळाले नाही. मंत्रीपदाचा हा दुष्काळ अनिल बाबर किंवा गोपिचंद पडळकर यांच्या रूपाने संपतो की काय हे येणार्‍या मंत्रीमंडळाच्या विस्तारातच समजेल.

1952 च्या पहिल्या निवडणुकीत विटा, खानापूर, आटपाडी मध्ये दोन जागा होत्या.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1961 रोजी रोजी. यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री राज्याला मिळाला. त्या अगोदर सांगली जिल्ह्याचा मुंबई प्रांतात समावेश होता. मुंबई प्रांताची निवडणूक मात्र 1952 पासून होत होती. 1952 च्या पहिल्या निवडणुकीत विटा, खानापूर, आटपाडी मध्ये दोन जागा होत्या. या दोन्ही जागेवर लक्ष्मण भिंगारदेवे आणि दत्ताजीराव देशमुख निवडून आले. त्याचवेळी जतमधून विजयसिंहराजे डफळे अपक्ष म्हणून निवडून आले.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

1957 च्या निवडणुकीत खानापूर आटपाडीमधून भगवान मोरे आणि पिराजीराव म्हडाले हे आमदार झाले

त्यानंतर पाच वर्षानी झालेल्या 1957 च्या निवडणुकीत खानापूर आटपाडीमधून भगवान मोरे आणि पिराजीराव म्हडाले हे आमदार झाले तर जतमधून पुन्हा एकदा डफळे सरकारांना संधी मिळाली. 1962 मध्ये राज्याची निर्मिती झाली होती. महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत खानापूर आटपाडीमधून वसंतदादांचे कट्टर समर्थक संपतराव माने आणि भगवानराव पवार यांनी बाजी मारली. संपतनानांचा कार्यकाल याच निवडणुकीपासून सुरू झाला. जतमधून तुकाराम शेंडगे निवडून आले.

1967 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी संपतनानांवर विश्वास ठेवला.

1967 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी संपतनानांवर विश्वास ठेवला. त्यांच्या जोडीला बी. एस. कोरे निवडून आले. जत मतदार संघ राखीव झाला होता. येथून एस. टी. बामने यांना संधी मिळाली. 1972 च्या निवडणुकीत संपतनानांची हॅट्रीक झाली. त्यांच्या बरोबर उध्दव इंग्रे हे विधानसभेत गेले. जतमध्ये पुन्हा एकदा एस. टी. बामनेेंंना संधी मिळाली.

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण

1978 मध्ये खानापूर आटपाडीमधून शहाजी साळुंखेंनी बाजी मारली.

1978 मध्ये खानापूर आटपाडीमधून शहाजी साळुंखेंनी बाजी मारली. तर जतमधून जयंत सोहनी हे नवखे उमेदवार निवडून आले. ही विधानसभा दोनच वर्षात बरखास्त झाली आणि पुन्हा एकदा 1980 मध्ये निवडणुका लागल्या. यावेळी मात्र गतवेळचा पराभव पुसून टाकत विट्याच्या हणमंतराव पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली. जतमध्ये पुन्हा एकदा जयंत सोहनी यांना संधी मिळाली. पाच वर्षानंतर 1985 मध्ये संपतनानांची पुन्हा एकदा विधानसभेत एंन्ट्री झाली. जतमध्ये माजी सैनिक असलेल्या उमाजीराव सनमडीकरांनी विजय खेचला. त्यानंतर उमाजीराव 1990 आणि 99 साली पुन्हा निवडून आले.

1990 पासून सध्याचे विद्यमान आमदार आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले अनिल बाबर यांचा राजकारणात प्रवेश

1990 पासून सध्याचे विद्यमान आमदार आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले अनिल बाबर यांचा राजकारणात प्रवेश झाला. जतमधून पुन्हा एकदा उमाजीराव सनमडीकर निवडून आले. 1995 मध्ये भाजप सेनेने सर्वत्र धुमाकूळ घातला आणि ही युती सत्तेपर्यंत पोहोचली. सांगली जिल्ह्यातील पाच आमदार अपक्ष निवडून आले आणि त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला. यावेळी खानापूर आटपाडीमधून राजेंद्रअण्णा देशमुख निवडून आले परंतु त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. जतमधूनही विलासराव जगताप यांनी नवख्या असणार्‍या मधूकर कांबळे यांना रिंगणात उतरवून उमाजीरावांना धूळ चारली.

अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले. यावेळी अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला. जतमध्ये उमाजीरावांनी बाजी पलटवली आणि विधानसभेत प्रवेश केला. 2004 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांना सर्व पक्षीयांना घेरले आणि विट्याच्या सदाशिवराव पाटील यांच्या पदरात माप टाकले. सदाशिवराव आमदार झाले. जतमध्ये विलासरावांनी सुरेश खाडे यांचे हुकमी पान काढून खाडेंना पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश मिळवून दिला. 2009 च्या विधानसधा निवडणुकीत खानापूर आटपाडमधून पुन्हा एकदा सदाभाउंनी दिमाखात विजय मिळविला. जत मतदार संघ खुला झाल्याने अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. परंतु केवळ 15 दिवसात येथे भाजपचे प्रकाश शेेंडगे आमदार झाले.

2014 आणि गतवेळच्या 2019 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांनी विरोधकांना धूळ चारत विधानसभेत चौथ्यांदा प्रवेश केला.

2014 आणि गतवेळच्या 2019 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांनी विरोधकांना धूळ चारत विधानसभेत चौथ्यांदा प्रवेश केला. जतमधून विलासराव जगताप आणि गेल्या निवडणुकीत विक्रम सावंत विधानसभेत गेले. आजपयंर्ंत खानापूर आटपाडीमधून 13 जणांनी विधानसभेत प्रवेश केला तर जतमधून 10 जणांनी विधानसभेची पायरी चढली आहे. गेल्या 64 वर्षात सर्व पक्षांचे सरकार सत्तेवर येउन गेले. असा कोणताच पक्ष राहिला नाही की जो सत्तेत आला नाही.

खानापूर, आटपाडी आणि जतमधील कोणालाच मंत्रीपदाची संधी मिळाली नाही.

परंतु खानापूर, आटपाडी आणि जतमधील कोणालाच मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. संपतराव माने आणि अनिल बाबर यांनी तर चारवेळा विधानसभा गाजवली परंतु तेही मंत्रीपदापासून दूरच राहिले. संपतराव मानेंच्या डोक्यावर तर दादांचा हात होता. परंतु तेही वंचितच राहिले. सध्या राज्यात शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता आहे. अनिल बाबर हे शिंदे गटाचे तर विधानपरिषदेवरील आमदार गोपिचंद पडळकर हे भाजपचे आहेत. अनिल बाबर यांचे शिंदेंशी आणि पडळकर यांचे देवेंद्र पडळकर यांच्यांची चांगले संबंध आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज