rajkiyalive

भाजपचे मिशन इलेक्शन जोमात; ‘इंडिया’ कोमात

भाजपचे मिशन इलेक्शन जोमात; ‘इंडिया’ कोमात

समन्वयक ते बूथरचनेची तयारी : राज्यातही महाविकास आघाडीत एकी अन् नियोजनाचा अभाव

अमृत चौगुले

चारपैकी तीन राज्यातील विधानसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली. त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभा अन् त्याापाठोपाठ विधानसभेच्या मिशन इलेक्शन अंतर्गत भाजपने महायुती आणि अगदी उमेदवारीचे त्रांगडे असूनही स्वतंत्रपणे जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत दोन्हीसाठी स्वतंत्र समन्वयक, बूथनिहाय तयारी ते सोशल इंजिनिअरिंगवर भर दिला आहे. मात्र भाजपला यावेळी एकत्रितपणे महाविकास आघाडीद्वारे रोखू असा इशारा करणार्‍या विरोधकांच्या काहीच हालचाली नाहीत. उलट त्यांच्या जागा वाटपावरूनच मतभेदाचे घोडे असले असून, उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. परिणामी सर्वजण संभ्रमात असल्याने भाजपचा वारू कसा रोखणार, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

 

 

भाजपचे मिशन इलेक्शन जोमात; ‘इंडिया’ कोमात

भाजपविरोधातील रोष इनकॅश करत काँग्रेसने गेल्यावर्षी कर्नाटकात सत्तापरिवर्तन घडविले होते. त्याचा लाभ अन्य राज्यांतही होईल असे आडाखे जुन्या युपीए आणि नव्याने बांधणी झालेल्या विरोधी इंडिया आघाडीने बांधले. लोकसभेच्या टर्मची मुदत एप्रिल 2024 अखेर संपणार आहे. त्यानुसार मध्यप्रदेश, राज्यस्थान, उत्तराखंड आणि तेलंगाणा या चार राज्यातील विधानसभा निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल असे चित्र निर्माण करीत आव्हान उभे केले होते.

भाजपचे मिशन इलेक्शन जोमात; ‘इंडिया’ कोमात

भाजपने सेमीफायनल 75 टक्केहून अधिक गुणांसह डिस्टिंक्शनमध्ये जिंकली.

पण दुर्दैवाने यात उत्तराखंड, राज्यस्थान काँग्रेसच्या हातून निसटून भाजपला मिळाले, तर मध्यप्रदेशात सलग चौथ्या टर्मलाही भाजपलाच संधी मिळाली. एकमेव तेलंगाणा तेवढे बीआरएसच्या ताब्यातून काँग्रेसला मिळविण्यात यश आले. तेथे भाजपचे काही नुकसान झाले नाही. त्यामुळे भाजपने सेमीफायनल 75 टक्केहून अधिक गुणांसह डिस्टिंक्शनमध्ये जिंकली. साहजिकच भाजपमध्ये त्याचा जल्लोष सुरू झाला मात्र काँग्रेससह इंडियाचे घटकपक्ष मात्र जणू कोमातच गेले आहेत.

आतापासूनच पुन्हा केंद्र आणि राज्यात सत्ता काबिज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी

वास्तविक लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा नैराश्य झटकून भाजपसमोर आव्हान उभे करणे गरजेचे होते. पण दुर्दैवाने तसेक कुठेच चित्र दिसत नाही. उलट भाजप आगामी सर्वच निवडणुकांच्यादुष्टीने 24 बाय 7 इलेक्शन मोडवर पोहोचले आहेत. लोकसभेबरोबरच एकूणच चित्र पाहता प्रसंगी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाही मुदतपूर्व लावण्याचीही खेळी होऊ शकते. त्यासाठी आतापासूनच पुन्हा केंद्र आणि राज्यात सत्ता काबिज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली सुरू केली आहे.

समन्वयकांच्यादृष्टीने प्रमुखांच्या नियुक्ती केल्या

याअंतर्गत मायक्रोप्लॅनिंग करीत सर्व फ्रंटल आणि सेलने पुन्हा बाह्या सरकवल्या आहेत. यासाठी राज्यनिहाय दिग्गज मंत्र्यांवर, नेत्यांवर पक्षांच्या राज्यनिहाय मुख्य समन्वयक, लोकसभा समन्वयक ते विधानसभा निवडणूक समन्वयकांच्यादृष्टीने प्रमुखांच्या नियुक्ती केल्या आहेत. त्यांनी आतापासूनच जनतेत मोदी सरकारच्या विकासकामांपासून ते राममंदिर उभारणी-उद्घाटन, तिहेरी तलाखसह समान नागरी कायद्यासारखे विचार पुढे आणायला सुरुवात केली आहे.

राहुल गांधी यांच्या ‘कमबॅक’चा काँग्रेस अन् इंडियाला बुस्टरडोस

55 दिवसांच्या नियोजनाचा कार्यक्रमही नुकताच जाहीर

जनतेवर शत प्रतिशत भाजपचे विचार रुजविणे, प्रसंगी बिंबविण्यासाठी सोशल, जनतेत जावून, मिडिया सेलपासून सर्वच पातळ्यांवर भेटी-गाठी, मेळावे सुरू झाले आहेत. याअंतर्गत महायुती असली तरी भाजपने राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रमुखपदी नियुक्ती करून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यांचे दौरेही सुरू झाले आहेत. नागपूर अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री व भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्वच मंत्री, आमदारांची बैठक घेऊन त्याचा आढावाही घेतला. एवढेच नव्हे तर आता 55 दिवसांच्या नियोजनाचा कार्यक्रमही नुकताच जाहीर झाला आहे.

मोदींचे हॅटट्रिकसाठी हात बळकट करायचा निर्धार

सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे सेनेच्या गैरकारभाराचे आरोप होताच भाजप आक्रमकपणे निषेध, पुतळे जाळण्यापासून आंदोलने करीत आहेत. राज्यात भाजप-शिंदे सेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट एकत्र लढणार असे जाहीर केले आहे. त्यादृष्टीने सध्या तरी तिघांत एकी आहे. मात्र सर्वच 48 जागांवर भाजपने तयारी ठेवली आहे. अगदी अनेक ठिकाणी भाजपअंतर्गतच लोकसभा उमेदवारी बदलाची चिन्हे आहेत. त्यावरूनही संघर्ष सुरू असताना ‘पार्टी फर्स्ट, कँडिडेट आफ्टर’ असा पवित्रा आहे. पार्टी ठरवेल तो उमेदवार निवडून आणत मोदींचे हॅटट्रिकसाठी हात बळकट करायचा निर्धार सर्वत्र आहे.

चार राज्यांतील निकालानंतर इंडियाचे एक एक गट बाजूला होऊ लागले

मात्र या तुलनेत चार राज्यांतील निकालानंतर इंडियाचे एक एक गट बाजूला होऊ लागले आहेत. आपचे अरविंद केजरीवाल, जनता दलाचे नितीशकुमार, ममता बॅनर्जीसह अनेकांनी याबाबत संकेत दिले आहेत. काँग्रेसमध्ये एकसंधतेचा अभाव असून, नेत्यांत दहा दिशेला तोंडे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी फुटीने खिळखिळी झाली असून, अस्तित्वाची लढाई लढत आहे. यामुळे महायुतीने राज्यातील 48 पैकी तब्बल ‘मिशन 45’ची तयारी केली आहे. त्यात महाविकास आघाडीत एकत्र सोडाच, स्वतंत्रपणेही निवडणुकीसाठी कोणतीही तयारी नाही.

केंद्रात ती अवस्था तर महाराष्ट्रात नेत्यांसह अनेक कार्यकर्ते भाजप-शिंदे सेना वा अजितदादा गटात गेल्याने महाविकास आघाडीत बूथ यंत्रणेपासून सर्वच तयारीचा अभाव आहे. त्यामुळे भाजपच्या मिशन इलेक्शनसमोर देशात विरोधक इंडियांचा अन् राज्यात महाविकास आघाडीचा कसा टिकाव लागणार अन् सत्तापरिवर्तन होणार, हा प्रश्न आहे. त्यांचा भाजपविरोधी जनतेवर हवाला असाच कारभार राहणार आहे.

राममंदिर उद्घाटनाचा इलेक्शन प्रभाव रोखणार कसा?
गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडून विरोधक संपविण्यासह सत्ता केंद्रीभूत करण्याचे राजकारण सुरू आहे. फोडा, झोडा प्रसंगी ईडी, सीबीआयसह सर्वच यंत्रणांच्या माध्यमातून मास लिडर असलेले सर्वच पक्षांचे नेते भाजपच्या वाटेवर आणले जात आहेत. हे करताना केवळ आणि केवळ ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे विकासाची गॅरंटी’ असा दावा केला जात असून, त्या ग्लोबेल नीतीसमोर काँग्रेससह सर्वच इंडियाचे घटक फिके पडत आहेत. आता लोकसभेची फायनल नावापुरती एनडीए असलेली भाजप जिंकणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

अँटी इन्कम्बन्सी कॅश करायला काँगेस तोकडी?

लोकसभेसाठी भाजपअंतर्गत गटबाजी आणि एकूणच विद्यमान खासदारांबद्दल उदासीनता यातून उमेदवार कोण हे निश्चित नाही. त्यामुळे भाजपअंतर्गत या अँटी इन्कम्बन्सी कॅश करून पुन्हा सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पंजा उठविण्याची संधी चालून आली आहे. त्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीकडून दादांचे विशाल पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जाते. पण दुर्दैवाने नेत्यांसह कार्यकर्त्यांतील उदासीनता तसेच मोर्चेबांधणीचा अभाव आहे. अलिकडे विशाल पाटीलही सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेसला चालून आलेल्या संधीला हात दाखविण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.

उमेदवारी निश्चित असूनही हालचाली नाहीत : कार्यकर्त्यांत मरगळ; एकसंधपणाचा अभाव?

लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने फिर एक बार मोदी सरकार अंतर्गत भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अर्थात मोदींचा करिष्मा कमी झाला असला आणि भाजपबद्दल देशभरात नाराजी असली तरी सत्तेसाठी वाट्टेल ते फंडा वापरायची भााजपने तयारी केली आहे. यात महाराष्ट्रात सत्तेची सूत्रे हाती घेतल्यासाठी भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी फोडून एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्यासह दिग्गज नेतृत्वाला आपल्या वळचणीला घेतले. त्याद्वारे विरोधकांना कमजोर करण्याबरोबरच सत्ता बांधणीच्यादृष्टीने व्यूहरचना सुरूच ठेवली आहे.

अशातच आता जगाचे लक्ष लागून राहिलेल्या राम मंदिर उद्घाटनाचा 22 जानेवारीला शो होणार असून, त्याचा उत्सव जानेवारीला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तोंडावर चालेल. ते होताच आचारसंहिता लावून लोकसभेची निवडणूक होईल. अर्थात त्याच्या लोकप्रियतेचा प्रभाव विरोधक रोखण्यासाठी कोणतीही तयारी नाही. तो कसा रोखणार हे राम जाणे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज