rajkiyalive

भोसे येथील श्री यल्लमा मंदीराजवळील वटवृक्ष उन्मळला

फांद्यांपासून 400 वटवृक्षाची रोपे तयार करण्याचा निर्णय

मिरज / प्रतिनिधी

भोसे येथील श्री यल्लमा मंदीराजवळील वटवृक्ष उन्मळला : पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आंदोलन करून राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून वाचविलेला भोसे (ता. मिरज) येथील सुमारे 400 वर्षे जुना वटवृक्ष उमळून पडला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच भोसे गावातील ग्रामस्थ, यल्लमा देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य आणि पर्यावरण प्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील वटवृक्षाची एका बाजुची मुळे अजूनही जमिनीत रुजलेली असल्याने या झाडाच्या फांद्या हटवून मूळ बुंध्याचे आहे त्याच ठिकाणी जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या वटवृक्षाच्या फांद्यांपासून सुमारे 400 वटवृक्षाची रोपे तयार करण्यात येणार असून, त्यांचे विविध ठिकाणी रोपण करण्यात येणार आहे.

भोसे येथील श्री यल्लमा मंदीराजवळील वटवृक्ष उन्मळला

पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून वाचविलेला हा वटवृक्ष उन्मळून पडला. राष्ट्रीय महामार्गाचे काम झालेल्या बाजूकडील झाडाची मुळे जमिनीतून उखडली गेली आहेत. महामार्गाचे काम करीत असताना त्या बाजूच्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. तर त्याच्या विरुद्ध दिशेला वृक्षाच्या फांद्या व्यापक रित्या जमिनीत पसरलेल्या आहेत. एकाच बाजुला फांद्यांचे ओझे झाल्याने हा वटवृक्ष त्या बाजूला उन्मळून पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष भोसेच्या यल्लमा देवीच्या दारात उभा आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गावर सांगलीमधील भोसेत असलेला हा वटवृक्ष तोडून महामार्ग निर्माण करण्याचा घाट हायवे प्राधिकारणाने घातला होता. मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि त्यांच्या वनराई संस्थेच्या सहकार्‍यांनी वटवृक्षाखालीच उपोषण सुरू करून वृक्षतोडीला विरोध केला होता. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये म्हणून प्रयत्न केले.

त्यांच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसाद देत वटवृक्ष न तोडता रस्त्याचे डिझाईन बदलायचे आदेश दिले. त्यानुसार रस्त्याची डिझाईन बदलून वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र, या कामाच्या दरम्यान वृक्षाच्या मुलांना गंभीर इजा पोहोचली असावी असे आता हा वृक्ष कोसळल्यानंतर दिसून आले आहे. महामार्गाच्या कामासाठी आधी केलेल्या खोदाईमुळे त्याच्यामुळे इजा पोचली असावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेली पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने मुळं कमकुवत झालेला हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला असावा अशी ग्रामस्थांची धारणा आहे.

राज्याचा कायदा बदललेल्या आणि शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून या ऐतिहासिक मार्गावर असलेल्या या वटवृक्षाचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

400 वर्षाच्या वारशाला पुन्हा हवीय मदत

दरम्यान, सांगलीमधील प्रवीण शिंदे यांनी कळकळी विनंती केली आहे. एक वटवृक्ष किमान हजार वर्षे टिकतो, त्याचे उपवृक्ष तयार करून ठेवतो, या ऐतिहासिक झाडाने सेवा केलीय आहे. भोसे गावासह जिल्ह्याला ओळख निर्माण करून दिली. वारसावृक्ष असणार्‍या या झाडाबद्दल आपल्याला आता कृतघ्न होऊन चालणार नाही. हे झाड शास्त्रीय दृष्ट्या जपण्यासाठी शासन, प्रशासन यांच्याकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही हवी ती तज्ज्ञ माहिती द्यायला तयार आहे, पण हा वारसा जपायला हवा, यासाठी आता पुन्हा एकदा या वटवृक्षाला सर्वांच्या मदतीची गरज आहे. सर्वांनी शासन प्रशासनाकडे मागणी करण्यासाठी ज्याच्या त्याच्या पातळीवर प्रयत्न करावेत, असे त्यांनी म्हटले आहे
हा वटवृक्ष उन्मळून पडल्याची माहिती मिळताच

ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामस्थ, यल्लमा देवी मंदिर ट्रस्ट आणि सह्याद्री देवराई, अग्रणी फाउंडेशन, नेचर कंजर्वेशन सोसायटी या पर्यावरण प्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते दिनेश कदम, प्रवीण शिंदे, अमोल जाधव, शिवदास भोसले, विनायक कदम, राहुल गणेशवाडे, अमोल गणेशवाडे, भोसे येथील ग्रामस्थ प्रमोद कांबळे, यल्लमा देवी मंदिर ट्रस्टचे शिवाजी कोळी यांच्यासह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या वटवृक्षाच्या फांद्या तोडून झाडाचा मूळ बुंधा आहे त्याच ठिकाणी जतन आणि त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. झाडाच्या तोडलेल्या फांद्यांपासून 400 वटवृक्षाची रोपे तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज