rajkiyalive

चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्यांवर दिल्ली, मुंबईतून दबाव

जनप्रवास । सांगली
चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्यांवर दिल्ली, मुंबईतून दबाव : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रीय व्हावा, असे आदेश काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांना मुंबई, दिल्लीहून येत आहेत. शिवसेना (उबाठा) गटाने प्रचारासाठी काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांकडे राजकीय दबाबतंत्र वापरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांवर दबाव येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दुसर्‍या फळीतील नेते देखील प्रचारात सहभागी होत नसल्याचे दिसून येत आहेत. काँग्रेस व शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात दिसत आहेत.

चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्यांवर दिल्ली, मुंबईतून दबाव

राष्ट्रवादी देखील ताकदीने नाही: कार्यकर्ते अपक्षाकडे

सांगली लोकसभा मतदारसंघात यावर्षीची निवडणूक चांगलीच गाजत आहे. भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी पहिल्या यादीतच जाहीर झाली. मात्र महाविकास आघाडीमध्ये जोरदार अंतर्गत राजकारण रंगले होता. राज्यात शिवसेना (उबाठा), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. या आघाडीच्या माध्यमातून राज्यातील 48 लोकसभेच्या जागा लढविल्या जात आहेत. शिवसेना (उबाठा) गटाने कोल्हापूर लोकसभेच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा घेतली आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते नाराज झाले. अशातच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेनेतील वाद शमला असल्याचे दिसत नाही.

महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत असताना अपक्ष म्हणून काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील मैदानात आल्याने निवडणुकीत चांगला रंगच भरला आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेनेतील वाद शमला असल्याचे दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचा जिल्हा मेळावा येथील भावे नाट्य मंदिरात पार पडला. या मेळाव्यात आ. विश्वजीत कदम यांनी जोरदार टीका-टिप्पणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील काँग्रेसला जागा मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. पण प्रचाराला सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव वापरला

मात्र तरी देखील नेते व कार्यकर्ते सक्रीय सहभागी झाले नव्हते. त्यामुळे पुन्हा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव वापरला, सांगलीत प्रचार होत नसेल तर कोल्हापूर व सोलापुरला आम्ही विचार करू, असा दम भरला असल्याची चर्चा सुरू आहे. शिवाय काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम यांना मुंबई व दिल्लीतून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दूरध्वनी येत आहेत. प्रचारात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आ. विश्वजीत कदम शनिवारी सांगलीत पुन्हा चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. तर दुसरीकडे कार्यकर्ते मात्र अपक्ष उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांनी नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते पूर्णपणे प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसत नाहीत.

तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते पूर्णपणे प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसत नाहीत. तासगाव, मिरज तालुक्यातील अनेक दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात आहेत. तर सांगली शहरातील अनेक कार्यकर्ते अद्याप तटस्थ राहत आहेत. आ. जयंत पाटील दौर्‍यावर आले की चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात कार्यकर्ते सक्रीय होताना दिसत आहेत, पण चंद्रहार पाटील यांच्याबरोबर दररोजच्या प्रचारात राष्ट्रवादीत दिसत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या धर्मात शिवसेनेची तारेवरची कसरत सुरू आहे.

नेत्यांची लागतेय कसोटी…

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्यांवर दबाब येत आहेत. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. ते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात लागले आहेत. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील तटस्थ भूमीकेत दिसत आहेत. त्यामुळे आ. विश्वजीत कदम, आ. विक्रम सावंत यांची कसोटी लागणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज