जनप्रवास । प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ : ‘लाडकी बहीण’ अर्जासाठी पैसे मागितल्यास कारवाई : सांगली ः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी करण्यात येणार्या अर्जांसाठी कोणत्याही शासकीय यंत्रणांनी शुल्काची मागणी करू नये. जिल्ह्यात कोठे अर्जासाठी पैशाची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास थेट कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ : ‘लाडकी बहीण’ अर्जासाठी पैसे मागितल्यास कारवाई
जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी यांची धोडमिसे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.
सीईओ धोडमिसे म्हणाल्या, अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून पिवळे, केशरी रेशनकार्ड धारकांची यादी घ्या. त्यानंतर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांनी तातडीने लाभार्थींचे अर्ज भरावेत. लाभार्थींचे आधार कार्ड तसेच ई-केवायसी झालेल्या बँक अकाउंट असलेल्यांनी तपासणी करा. अर्ज हमीपत्रासह तातडीने अपलोड करावेत.
जिल्ह्याला सीमाभाग आहे. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या महिलांना अर्ज करण्यास कागदपत्रांअभावी अडवणूक करू नका. त्यांच्या पतीची कागदपत्रे घ्या, त्यानुसार अर्ज भरून द्या. मात्र पात्र अर्जदाराचा अर्ज नाकारण्यात येणार नाही याची दक्षता घ्या, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांनी अर्ज भरून घेण्यासाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरावर अचूक सुक्ष्म नियोजन करावे. नियमानुसार प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी दिल्या.
ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश
लाडकी बहीण योजना यशस्वी राबविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कृषी सहाय्यक, तलाठी, पोलिस पाटील यांच्यासह आवश्यक असलेल्या व्यक्तींना घेऊन ग्रामस्तरीय समितीची स्थापना करा. योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जाची प्रिंट काढून संपूर्ण यादीचे प्रत्येक शनिवारी चावडीत वाचन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.