rajkiyalive

ISLAMPUR : चिकुर्डेच्या स्मशाभूमीत अघोरी पूजा

 जनप्रवास : कुरळप

ISLAMPUR : चिकुर्डेच्या स्मशाभूमीत अघोरी पूजा :मांत्रिकाच्या मदतीने वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो लावून धारदार दाभन खुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. होळी पौर्णिमेपासून रस्त्याच्या लगत असणार्‍या स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता. आज बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला.

 

ISLAMPUR : चिकुर्डेच्या स्मशाभूमीत अघोरी पूजा

स्मशानभूमीत काळ्या कापडात लिंबू, बाहुल्यांसोबत आढळले मुलींचे फोटो

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी.आर. जाधव, निवृत्त प्राचार्य डॉ.सुदाम माने, विनोद मोहिते यांनी हा नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस आणल्यावर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली. कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत म्हणाले, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळापर्यत तपास करू. कोणत्याही मुलींची ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करू. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील लटकत्या बाहुल्या व इतर साहित्य काढले.

आत पाहिल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कापड सोडल्यावर त्यातून नारळ, त्यावर काळी बाहुली, लिंबु व मुलींच्या रंगीत फोटोला टोकदार दाभनातून नारळात खुपसले होते. तर नारळाला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यात कागदी चिठ्या खुपसल्या होत्या. त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचे नाव लिहले आहे. अशी पाच गाठोडी आहेत. यात पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो व नावे आहेत. एका कागदावर एका मुलाचे नाव आहे.

हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता केली. वाळवा तालुक्यातील चिकूर्डे सारख्या सधन गावात हा रस्त्यालगत असणार्‍या स्मशानभूमीत प्रकार घडल्याने गावात दहशत निर्माण झाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विनोद मोहिते म्हणाले, या प्रकारात सोशल मीडियावर असणारे फोटो घेऊन रंगीत झेरॉक्स काढण्यात आल्या आहेत असे वाटते. आपल्या मुली सोशल मीडियावर फोटो टाकतात त्याचा दुरूपयोग होतो याबाबतीत पालकांनी काळजी घ्यावी.

गावात पहिल्यांदाचं धक्कादायक प्रकार

होळी पोर्णिमेनंतर स्मशानभूमीत पहिल्यांदा तीन नारळ काळ्या कापडात बांधून मृतदेह दहन करणार्‍या रॅकला लटकावले होते. पुन्हा दुसर्‍या दिवशी दोन नारळ काळ्या कापडात लटकावले गेले. पुन्हा कोण असे करतंय हे पाहण्यासाठी गावकर्‍यांनी पाळत ठेवली. पण कोणी आढळले नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीला संपर्क साधला. तत्पूर्वी सरपंच रणजीत पाटील व त्यांच्या सहकार्‍यांना माहिती दिल्याचे चिकूर्डेचे पोलीस पाटील सुधीर कांबळे यांनी सांगितले.

जादूटोणा विरोधी कायद्याने कारवाई करा..

या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादू टोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा नुसार गुन्हा दाखल करावा. यासाठी संबंधित फोटोतील युवती, नाव असणारा मुलगा कोण ? यांच्या मुळापर्यत पोलिसांनी जावे. या मुलांना हा प्रकार कोणी करायला भाग पाडले आहे का? हे तपासावे व दोषींवर जादू टोणा विरोधी कायद्याने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज