rajkiyalive

काँग्रेसबरोबर भाजप, राष्ट्रवादीचे नाराज विशाल पाटलांसोबत

भाजप, महाविकास आघाडी कसे करणार पॅचअप?

जनप्रवास । प्रतिनिधी
काँग्रेसबरोबर भाजप, राष्ट्रवादीचे नाराज विशाल पाटलांसोबत : सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस राहिले असताना मतदारसंघात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व भाजपचे अनेक गाव पातळीवरील नेते, कार्यकर्ते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत प्रचारात सक्रीय होत आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना नाराजांची समजूत काढून पॅचअप करावे लागणार आहे. हे आव्हान दोन्ही उमेदवारांसमोर असणार आहे.

काँग्रेसबरोबर भाजप, राष्ट्रवादीचे नाराज विशाल पाटलांसोबत

सांगली लोकसभा मतदारसंघ राज्यात संवेदनशील होऊ लागला आहे. भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील पुन्हा निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून मोठे महानाट्य झाले होते. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना (उबाठा) गटाने सांगलीची जागा घेतली आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सांगलीची निवडणूक तिरंगी होत आहे. काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांनी देखील महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार तोफ डागली होती. शिवाय प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जागा गेली ती चूकच झाली असल्याचे सांगलीच्या मेळाव्यात म्हटले होते.

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते आता ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाहीत.

आ. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचे जाहीर केले. त्यानुसार पलूस-कडेगाव मतदारसंघात बैठका देखील घेतल्या. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून येत नव्हते. भाजपचे लोक देखील विशाल पाटील यांच्या प्रचारात आहेत. अशीच पस्थितीत सांगली शहरात देखील आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी माजी नगरसेवक-पदाधिकार्‍यांच्या ताकदीने सांगली विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काही माजी नगरसेवक देखील सहभागी झाले आहेत.

मिरज विधानसभा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

मिरज शहरातील काँग्रेस, भाजपचे नगरसेवक अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रीय आहेत. मिरज पूर्व भागातील काँग्रेस व भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते अपक्षांच्या प्रचारात आहेत. जत विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलासराव जगताप हे अनेक दिवसांपासून विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे चित्र आहे. तर नुकताच जत शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या माजी 31 नगरसेवकांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचा गट विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रीय आहे. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा गट देखील सक्रीय आहे.

भाजपने लोकसभा मतदारसंघातील अनेक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनी करून अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा देखील सांगली लोकसभा मतदारसंघात झाल्या आहेत. भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहेत. पण तालुका नेते व प्रमुख पदाधिकार्‍यांची नाराजी दूर करणे गरजेचे आहेत. लोकसभेसाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. त्यामुळे चारच दिवस नेत्यांकडे राहिले आहेत. या काळात भाजपच्या नेत्यांची नाराजी दूर करणे आवश्यक आहे.

महाविकास आघाडी एकजूट करण्यात यश मिळाल्याचे दिसत नाही.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दुसर्‍यांदा तर खा. संजय राऊत तिसर्‍यांच्या सांगलीच्या दौर्‍यावर आले आहेत. मात्र त्यांना महाविकास आघाडी एकजूट करण्यात यश मिळाल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सभा, बैठका घेत आहेत. पण त्यांचे कार्यकर्ते पूर्णपणे सक्रीय झाल्याचे दिसून येत नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील प्रमुख नेते प्रचारात दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करणे आता शिवसेनेच्या नेत्यांसमोर आव्हान असणार आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज