जनप्रवास । सांगली
दादा घराणे, काँग्रेसच्या अस्तित्वाची तर भाजपच्या प्रतिष्ठेची निवडणूक : सांगली लोकसभेसाठी मंगळवारी मतदान होणार असून सांगलीचा खासदार जनता ठरविणार आहे. भाजप, शिवसेना व अपक्ष उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत असल्याने राज्यात लक्षवेधी ठरली आहे. वसंतदादा घराणे व काँग्रेसला डावलल्याने ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची असेल तर भाजपने दहा वर्षांपूर्वी हस्तगत केलेला काँग्रेसचा हा बालेकिल्ला पुन्हा शाबूत ठेवण्यासाठी भाजपच्या प्रतिष्ठतेची ही निवडणूक होत आहे.
दादा घराणे, काँग्रेसच्या अस्तित्वाची तर भाजपच्या प्रतिष्ठेची निवडणूक
सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2014 च्या मोदी लाटेमध्ये भाजपने हा बालेकिल्ला हस्तगत करून काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यानंतर पुन्हा 2019 च्या निवडणुकीत भाजपने या ठिकाणी विजय मिळवला. मात्र यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. महायुतीकडून भाजपचे खा. संजयकाका पाटील पुन्हा तिसर्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. भाजप पक्षाने पहिल्या यादीतच खा. पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून प्रचंड रामायण घडले होते. काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा विशाल पाटील यांना मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.
विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना (उबाठा) या घटक पक्षाने कोल्हापुरची शिवसेनेची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली. यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वासात देखील घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. त्यानुसार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती.
त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना घटक पक्ष म्हणून सहभागी होते.
त्यांनी सांगलीची जागा घेतली, ऐनवेळी विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. यावर्षी देखील हाच प्रयोग झाला आणि शिवसेना (उबाठा) गटाला जागा गेली. त्यामुळे ही निवडणूक आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. यावेळी तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा पराभव झाला तर काँग्रेस या मतदारसंघातून हद्दपार होईल. शिवाय दादा घराण्याला देखील मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस प्रेमी व दादा घराण्याच्या अस्तित्वाची असणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
2014 च्या मोदी लाटेत खासदार संजयकाका पाटील विजयी झाले होते. त्यांना पुन्हा 2019 ची उमेदवारी देण्यात आली. यावेळी सांगलीत तिरंगी लढत झाली आणि पुन्हा संजयकाका पाटील दीड लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले. 2024 च्या निवडणुकीत खासदारांना तिसर्यांदा उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळून हॅट्ट्रिक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे या निवडणूक भाजपच्या प्रतिष्ठेची आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.