rajkiyalive

दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपनेच फोडले : जयंत पाटील

जनप्रवास । प्रतिनिधी

दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपनेच फोडले : जयंत पाटील सांगली ः सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे. जेव्हा जेव्हा देश संकटात आला, तेव्हा तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी सांगलीने आपले योगदान दिले आहे. देशाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आले आहे, त्यामुळे आता सांगलीला मागे राहता येणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून क्रांतीची मशाल सांगलीतून पेटेल, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. तर महाविकास आघाडीला रोखणे शक्य न झाल्याने सत्ता भाजपने पाडली. त्यानंतरही दोन मराठी माणसांचे पक्ष फोडल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

 

दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपनेच फोडले : जयंत पाटील

क्रांतीची मशाल सांगलीतून पेटेल ः संजय राऊत, , चंद्रहार पाटलांचे रॅलीने शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी भरण्यात आला. त्यानंतर स्टेशन चौक ते मारुती चौक रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप मारुती चौकात झाला, त्यावेळी खासदार राऊत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आ. अरुणअण्णा लाड, आ. सुमनताई पाटील, संजय विभुते, शरद लाड, प्रा. सुकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार राऊत म्हणाले, मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे,

त्यांना आपल्याला घालवायचे आहे, आणि त्या क्रांतीची सुरुवात सांगलीतुन होणार आहे. सांगलीच्या भाजपच्या खासदाराला तडीपार करून त्याची सुरुवात सांगलीतून करायची आहे. ईडीच्या बापाला पण आम्ही घाबरत नाही, आता ती भीती आम्हांला नका घालू. लढाई एकास एकच होईल, त्यामध्ये आपला पैलवान विजयी होईल. देशाच्या भल्याचा विचार करणारे पक्ष आपल्यासोबत आहेत. शेतकर्‍यांचा पोरगा संसदेत शेतकर्‍यांचे प्रश्न मांडेल, ही मशाल संसदेत कधीही विझणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, चंद्रहार यांचे घराण्यात कोणीही राजकारणात नव्हते

स्वर्गीय अनिल बाबर यांनी चंद्रहार पाटील यांना पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आणले. दोनदा महाराष्ट्र केसरी हा किताब त्यांनी मिळवलेला आहे. कुस्तीमध्ये त्यांनी पूर्ण क्षमता त्यांनी दाखवली आहे. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. पुढच्या काळात महविकास आघाडीचे सर्व नेते या प्रचारात येतील. उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील सगळीकडे पोहचणार नाहीत, त्यामुळे आता कार्यकर्त्यानी ही निवडणूक हातात घ्यावी.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडीने विकासकामे उभारली.

कोरोनात लोकांना आधार दिला, दुष्काळात कर्जमाफी दिली, महापुरात मदत केली. देशात 50 लाख लोक कोरोनामध्ये मयत झाले, ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी मृत्यू दर केवळ आमच्या सरकारमुळे राहू शकला, भाजपची सत्ता असणार्‍या राज्यात मृतदेह नदीत फेकण्यात आले, अशी एकही घटना महाराष्ट्रात घडू दिली नाही. इतकं काम असल्यामुळं उद्धवजी यांचा पक्ष फोडला, त्यानंतर राष्ट्रवादी फोडली, तरीही महाराष्ट्रात जनता आजही उद्धवजी आणि शरद पवार यांच्या पाठीशी आहे. असा दावा जयंत पाटील यांनी केला.

ठाकरे मुख्यमंत्री असताना जिल्ह्याला मदत

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जिल्ह्याच्या पूर्व भागात 65 गावांना अतिरिक्त 6 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने घेतला. सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेला देखील आपण चांगला निधी दिलेला आहे. शेजारच्या सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात देखील त्याचा फायदा झाला आहे. जिल्ह्यातील 82 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी उद्धवजी यांनी सत्ता येताच पहिल्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयात दिली. सांगली जिल्ह्यात 136 कोटी रुपयांची मदत पुरबाधित गावांना केल्याने जयंत पाटील यांनी सांगितले. बानुगडे-पाटील म्हणाले, सांगली जिल्हा हा स्वातंत्र सैनिकांचा जिल्हा आहे. भाजप हा सुद्धा एक हुकुमशहा आहे. त्यांच्यापासून

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ही लढाई आहे. शेतकर्‍याचा मुलगा खासदार होणार ः चंद्रहार पाटील

महाराष्ट्रात संदेश गेलाय, एका शेतकर्‍याच्या मुलाला खासदार करायला सगळी महविकास आघाडी एकत्र आलेली आहे. सांगली जिल्ह्याला पैलवानांची परंपरा आहे. ऐतिहासिक मारुती चौकात आज सगळे माझ्या विजयाचे साक्षीदार झाला आहात. कुस्ती परंपरेत हिंदकेसरी मारुती माने, हरिनाना पवार, संभाजी पवार, माझे गुरू गणपतराव आंधळकर आदीनी राजकारणात चांगले काम केले आहे. मी देखील त्याच मार्गाने काम करेन, असा विश्वास चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला.

16 वर्षांनी जयंत पाटील पुन्हा मारुती चौकात

सांगली महानगरपालिका निवडणुकी 2008 साली माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांना रोखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी यांची महाआघाडी स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये दिवंगत भाजपचे नेते संभाजी पवार, जयंत पाटील, संजयकाका एकत्र होते, त्यावेळी जयंत पाटील यांची मारुती चौकात सभा झालेली होती, त्यांनतर राजकारणात अनेक बदल झाले. आज हे सगळे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात असताना त्यांनी पुन्हा 16 वर्षांनी मारुती चौकात भाषण केले.

जयंत पाटील यांचे पुन्हा स्पष्टीकरण

निवडणुकीच्या आधी तिकीट वाटपासाठी सोशल मिडियावरून सर्वांचा रोख माझ्यावर आहे, पण या निर्णयात मी कुठंही नाही. हा निर्णय काँग्रेस आणि शिवसेनेचा आहे. राष्ट्रवादीने ही जागा मागितली नव्हती. त्यामुळे आता निर्णय झालेला आहे. संजय राऊत हे एकदा निर्णय घेतला की ते कोणाचेही ऐकत नाहीत, हा माझा अनुभव आहे. आपल्याला भाजपला पराभूत करायचे आहे, त्यामुळे आपले मतभेद बाजूला ठेवून एकास एक लढत झाल्यास, आजच निकाल लागेल. असे स्पष्टीकरण आज पुन्हा जयंत पाटील यांनी दिले.

काँग्रेसचा बहिष्कार, आ. सावंत अर्ज भरण्यापुरतेच

काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने महाविकास आघाडीत नाराजी आहे. विशाल यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे, काँग्रेसची नाराजी कायम असून महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या रॅलीकडे पाठ फिरवून काँग्रेस नेत्यांनी बहिष्कार घातला. परंतु जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत हे केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुरतेच उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज