rajkiyalive

सामना भाजप-काँग्रेसचा, लक्ष्य जयंतरावांच्या भूमिकेकडे

दोन्ही पक्षांची राष्ट्रवादीवर भिस्त, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

जनप्रवास । अनिल कदम

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवरून चुरस सुरु आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारी विशाल पाटील यांना निश्चित मानली जात असली तरी वरिष्ठ पातळीवर चाचणी करण्यात येत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीवर भिस्त राहणार आहे. मागील काही निवडणुकीत जयंतरावांचा फायदा विरोधकांना झाला असल्याने आगामी निवडणुकीतही त्यांचा कल मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत जयंत पाटील यांचा कल कोणाच्या बाजूने राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक ही सर्वच पक्षांच्यादृष्टीने प्रतिष्ठेची ठरत आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा सांगलीच्या जागेवर आहेत. सध्या मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत सांगलीची जागा जिंकण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. सांगलीची जागा वर्षानुवर्ष काँग्रेसकडे राहिली, मात्र 2014 आणि 2019 च्या निवडणुकीवरील काँग्रेसला जागा गमवावी लागली. जिल्ह्यातही भाजपकडून तयारी केली जात असताना खासदार संजयकाका पाटील यांच्या कामकाजाबाबत चर्चाही जोरदार सुरु आहे. परंतु भाजप पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी थांबायला तयार नाही.

खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात अनेक कारणांवरुन वाद उफाळून आहेत. पक्षात राहून सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप अनेकवेळा पक्षातील नेत्यांनीच केला आहे. त्यामुळे खा. पाटील यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

खासदार आणि माजी जिल्हाध्यक्षांनी वेगवेगळ्या बैठका घेत आहेत. पक्षाचे जुने-नव्या कार्यकर्त्यांची त्यांच्याकडून भेटी-गाठी सुरु आहेत. देशमुख यांचा संपर्क वाढत असल्याचे चित्र दिसून येते. माजी आ. विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद आहेत. त्यामुळे जगताप गट खासदारविरोधात आक्रमक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या नागेवाडी येथील यशवंत कारखान्यावरून बाबर आणि खासदार पाटील यांच्यात वाद सुरु आहे. परंतु असे असले तरी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याशी मनोमिलन असल्याचे दिसून येते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील मतभेद मिटवून बांधणी करावी लागणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. निवडणुकीसाठी भाजपविरोधी असलेल्या पक्षांची एकत्रित मूठ बांधली जात आहे. अनेक पक्ष इंडिया आघाडीत सामील होऊ लागले आहेत. त्यामुळे देशात काँग्रेसचे बळ वाढत असल्याचे चित्र दिसून येते. देशात काँग्रेसने काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याशिवाय माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे पुतणे डॉ. जितेश कदम यांच्या नावाची अधून-मधून चर्चा होते.

हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी
राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…
वारसा असूनही… न झालेले आमदार...

काही ठिकाणी भावी खासदार म्हणून जितेश कदम यांचे डिजिटल झळकले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना गटही आहे. त्यांच्याशीही या जागेबाबत चर्चा केली जाणार आहे. चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना एकत्र घेऊन शरद पवार यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली आणि कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी केली. सांगलीच्या जागेची मागणी केली असली तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून गुगली टाकल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष पाटील हे ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर पाटील हे काँग्रेस नेत्यांशीही जळवून घेत असल्याने काँग्रेसमध्ये जाणार की काय असा तर्क लढविण्यात आले. परंतु तसे काहीही झाले नाही.

मागील काही निवडणुकीत जयंतरावांच्याकडून भाजपच्या उमेदवाराला काहीसा फायदा झाल्याची चर्चा होते. त्यामुळे ते पुन्हा भाजपकडे झुकतील, असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. यापूर्वी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ठिकाणी जेजेपीची सत्ता (जयंत जनता पार्टी) असल्याचे बोलले जात होते. आगामी निवडणुकीतही त्यांचा कल आपल्यासोबत राहील, असा अंदाज बांधला जात आहे.

सर्व म्हणतात जयंतराव आमचेच
राष्ट्रवादीचे प्रदेशाचे जयंत पाटील यांचे सर्वपक्षीयांशी सलोखा आहे. या कारणाने लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आगामी निवडणूकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे आपल्याला मदत करतील, अशी अपेक्षा बाळगून आहेत. दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघावरही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. हातकणंगलेच्या मैदानात प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे पुत्र व राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक यांना उतरवण्यासाठीही डावपेच आखले जात आहेत. जर प्रतिक हे लोकसभेच्या निवडणुकीत उतरले तर सांगलीकडे विशेष लक्ष देणार नसल्याची ही चर्चा आहे, त्यामुळे सर्वांकडूनच जयंतराव आमचेच असा सूर निघत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज