जनप्रवास । प्रतिनिधी
ZIKA VIRUS : सांगली झिका व्हायरसची एन्ट्री : 82 वर्षीय वृध्दाला लागण : पुणे शहरापाठोपाठ सांगली शहरात झिका एन्ट्री केली आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या शासकीय रूग्णालय परिसरातच पहिला रूग्ण आढळून आला आहे. 82 वर्षीय वृध्द व्यक्तिचा झिका रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थित आहे. झिका रूग्णामुळे मनपाची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून या परिसरातील एक हजार घरांच्या सर्वेक्षणासाठी दहा पथके नियुक्त केली आहेत.
ZIKA VIRUS : सांगली झिका व्हायरसची एन्ट्री : 82 वर्षीय वृध्दाला लागण
परिसरातील 1 हजार घरांचे होणार सर्वेक्षण
पुणे शहरात झिका रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना महापालिकांना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क आहे. दि. 4 जुलैला एका वृध्दाला ताप, खोकला व अशक्तपणा आला होता. त्यांच्यावर खासगी डॉक्टरांच्यामार्फत उपचार सुरू होते. डॉक्टरांनी डेंग्यू, चिकुनगुनियासह काही चाचण्या केल्या होत्या. पण या चाचण्या निगेटिव्ह आल्या. तर दि. 6 जुलैला कोरोना चाचणी देखील करण्यात आली. तरी देखील ती निगेटिव्ह आली होती. शरिरात ताप कमी होत नसल्याने दि. 8 जुलै रोजी फिव्हर पॅनेल मल्टिप्लेक्स पीसीआर ही चाचणी खासगी लॅबद्वारे करण्यात आली.
दि. 9 जुलै रोजी फिव्हर पॅनेल मल्टिप्लेक्स पीसीआर टेस्टचा तपासणी अहवाल आला.
त्यामध्ये झिका व्हायरसचे निदान झाले. झिका बाधित वृध्द व्यक्तिवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ताप देखील उतरला आहे. मात्र सांगलीत झिकाचा पहिलाच रूग्ण सापडला असल्याने महापलिकेची आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
रूग्ण आढळून आलेल्या शासकीय रूग्णालय परिसरातील सुमारे एक हजार घरांचे सर्वेक्षण मनपाच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा पथके स्थापन करून तपासणी सुरू करण्यात आले आहे. या परिसरात ताप असलेल्या रूग्णांची शोध मोहिम राबवली जात आहे. त्यांच्या रक्त नमुन्याची तपासणी करण्यात येणार आहे. या परिसरात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
14 दिवस रूग्ण सर्वेक्षण मोहिम, औषध फवारणी: डॉ. वैभव पाटील
शासकीय रूग्णालय परिसरात झिकाचा रूग्ण आढळून आला आहे. या परिसरात 14 दिवस ताप रूग्ण सर्वेक्षण मोहिम राबवली जाणार आहे. शिवाय औषध फवारणी देखील सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ताप व संबंधित अन्य लक्षणे दिसून आल्यास महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी केले आहे.
गर्भवती महिलांवर विशेष लक्ष…
गर्भवती महिलेस ताप असेल तर रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेला पाठवण्यात येणार आहेत. अलिकडील कालावधीत गर्भवती महिलांची सोनोग्राफी झाली आहे, अथवा नाही याची खात्री केली जाईल. सोनोग्राफी झाली नसल्यास सोनोग्राफी करण्यासंदर्भात सांगितले जाईल. ताप असलेल्या गर्भवती महिलांवर विशेष लक्ष आरोग्य विभागाचे राहणार आहे.
00000000000000
स्वाईन फ्ल्यूचा दुसरा रुग्ण, दोन वर्षाचा बालक बाधित
मिरज पूर्व भागातील एका गावातील दीड वर्षाच्या बालकाला स्वाईन फ्ल्युनंतर त्याच्या संपर्कातील दोन वर्षाच्या बालकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा दुसरा रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले. दीड वर्षाच्या बालकाच्या संपर्कातील बारा जणांच्या स्वॅब तपासणीनंतर अकरा जणांचा निगेटिव्ह आला असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
मिरज पूर्व भागातील एका गावातील बालकास स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती.
या बालकावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याची तब्येत बरी झाल्याने त्याला मंगळवारी घरी सोडण्यात आले. मात्र खबरदारी म्हणून बालकाच्या कुटुंबातील आणि संपर्कातील 12 जणांचा स्वॅब तपासणी पुण्याला पाठवण्यात आले होते. जिल्हा आरोग्य विभागाला गुरुवारी रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्यानुसार अकराजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र दोन वर्षाच्या बालकाचा स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.
बाधित असलेले दोन वर्षाचे बाळ सध्या घरीच आहे. त्याची तब्येत ठणठणीत आहे. त्याला सध्या कोणतीही लक्षणे नाहीत, बालकावर आणि त्यांच्या कुटुंबियावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान जिल्ह्यात दोन बालके वगळता इतर कोणालाही स्वाईन फ्ल्युची लागण झाली नसल्याचे सांगण्यात आले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



