rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : पुन्हा एकदा मानेंना इचलकरंजीनेच तारले

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

HATKANANGLE LOKSABHA : पुन्हा एकदा मानेंना इचलकरंजीनेच तारले : सांगली : अखेर लोकसभा 2024 चा निकाला लागला. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रा लक्ष्यवेधी आणि अटीतटीचा ठरलेला हातकणंगले लोकसभा मतदार संघात अगदी अनपेक्षितरित्या धैर्यशील मानेंनी दुसर्‍यांदा मुसंडी मारली.  इचलकरंजी विधानसभा मतदार संघानेच त्यांना तारले. आमदार प्रकाश आवाडे यांची त्यांना मोलाची मदत मिळाली. इचलकरंजी मतदार संघात धैर्यशील माने यांना 110594, सत्यजित पाटील यांना 71422 तर राजू शेट्टी यांना केवळ 10495 मते मिळाली.

HATKANANGLE LOKSABHA : पुन्हा एकदा मानेंना इचलकरंजीनेच तारले

निवडणुका लागल्यापासून धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात होती. भाजपच्याच लोकांना धैर्यशील मानेंना उमेदवारी देवू नका अशी मागणी पक्षक्षेष्ठींकडे केली होती. परंतु आपल्या अडचणीच्या काळात धैर्यशील माने यांनी मोलाची साथ दिली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. केवळ तिकीट दिले नाही तर पाच दिवस मतदार संघात तळ ठोकून राहिले.

HATKANANGLE LOKSABHA : पुन्हा एकदा मानेंना इचलकरंजीनेच तारले : मानेंच्या विरोधात पारंपरिक विरोधक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि उबाठाचे सत्यजित पाटील सरूडकर यांना उभे करण्यात आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असणार्‍या राजू शेट्टींना एकाच मतदार संघाने जमिनीवर आणले ते म्हणजे इचलकरंजी विधानसभा मतदार संघ. लाखमोलाचे मतदार संघ असणारे इचलकरंजी विधानसभा हॉटस्पॉट बनले होते. झाडून सर्व मंत्री, नेते इचलकरंजीत तळ ठोकून होते. शहरी मतदारांचा भरणा असणारे इचलकरंजी कोणाला साथ देणार याचीच सर्वत्र चर्चा आहे.

इचलकरंजी शहर आणि चंदूर, तारदाळ, खोतवाडी कबनूर आणि कोरोची या गावांचा समावेश या मतदार संघांत होतो.

सुमारे 90 टक्के मतदान इचलकरंजी शहरात आहे. राज्याचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचलकरंजी विधानसभा मतदार संघांने आजपर्यंत अनेकांना साथ दिली आहे तर अनेकांना घरी बसवले आहे. गेल्या निवडणुकीपासून या मतदार संघांची अनेकांनी धास्ती खाली आहे. कारण 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टींना डोक्यावर घेतलेल्या या मतदार संघाने गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 75 हजाराचे

मताधिक्य धैर्यशील मानेंना दिले होतेे. राजू शेट्टी तीन मतदार संघात आघाडीवर होते परंतु ही त्यांची आघाडी एकट्या इचलकरंजीने खाउन टाकली. यंदाची तीच परिस्थिती झाली. इस्लामपूर, शिराळा आणि शाहूवाडीमध्ये आघाडी घेतलेल्या सत्याजित पाटील सरूडकरांना इचलकरंजीकरांनी जमिनीवरच आणले. राजू शेट्टींना तर या मतदार संघात कंदील घेवून शोधावे लागण्याची वेळ आली. त्यांना केवळ 10 हजार मतेच मिळाली.

इचलकरंजीच्या पाणीप्रश्नामुळे यंदाची शहराचे वातावरण तापले होते.

माने, सरूडकर आणि राजू शेट्टी तिघांनीही मीच पाणी प्रश्न सोडविणार अशी वल्गना केली होती. सर्वच राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली. तिहेरी निवडणुकीमुळे यावर्षीची राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलली.

2019 ची निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. दोन वेळा खासदार झालेल्या शेट्टींची हॅटट्रीक चुकली. धैर्यशील माने यांनी त्यांची हॅट्रटीक चुकवली. याच मतदार संघांने सुमारे 75 हजाराचे मताधिक्य माने त्यांना दिले. त्यावेळी शेट्टींना केवळ 49 हजार 907 मतांवर समाधान मानावे लागले होते. तर धैर्यशील मानेंना 1 लाख 24 हजार 824 मते मिळाले होते. इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर ही निवडणूक गाजली होती. त्याचा फटका राजू शेट्टींना बसला होता.

गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले पण इचलकरंजीचा पाणीप्रश्न सुटला नाही.

वारणा योजना, सुळकूड योजना की स्वतंत्र इचलकरंजीला पाणी योजना यामध्ये अजून घोंगडे भिजत पडले आहेत. कोणत्याही नेत्याला हा प्रश्न सोडविता आला नाही. यंदाही हाच प्रश्न ऐरणीवर आला होता. ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडेंनीही लोकसभेच्या रिंगणात शड्ड ठोकला होता.

धैर्येशील मानेंच्या विरोधात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे बंड शमविले. एका रात्रीत त्यांचे मन परिवर्तन झाले. त्यांनी धैर्यशील मानेंची निवडणूक हातात घेतली. राहूल आवाडेंनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आणि धैर्यशील मानेंना 40 हजाराचे मताधिक्य मिळवून दिले.
अनेक ठिकाणी नाराजी, अडचणी असतानाही धैर्यशील मानेंनी केवळ इचलकरंजी मतदार संघावर आपले लक्ष केंद्रीत केले. येथीलच मतदार आपल्याला तारणार हे त्यांनी ओळखल होते.

त्यामुळे त्यांनी आपला सर्व वेळ इचलकरंजीतच घालविला. येथे शेतकरी मतदार नसल्याने राजू शेट्टींना पूर्णपणे नाकारले. त्यामुळे पुन्हा एकदा इचलकरंजीनेच धैर्यशील मानेंना तारले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज