rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका महत्त्वाची

 

जयसिंगपूर/ अजित पवार
HATKANANGLE LOKSABHA : शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका महत्त्वाची : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी मत मागणीच्या वाटा बदलल्या आहेत. यामुळे स्थानिक लेवलच्या नेत्यांची मतदारांसमोर दमछाक होऊ लागली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने माजी आमदार उल्हास पाटील यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. मतांची गोळाबेरीज करताना नेत्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. यात शिरोळ तालुक्यात जास्त मतांची बेरीज कोण गोळा करते याकडे आता मात्र जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. तर विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका तालुक्याच्या राजकारणात या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

HATKANANGLE LOKSABHA : शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका महत्त्वाची

राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणात शिरोळ तालुक्यातील ही राजकीय समीकरणासोबत अनेक राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. निवडणुकीचे मैदान सुरू झाले असताना उमेदवारांनी स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. महाविकास आघाडीच्या उबाठा गटाकडून शाहूवाडी- पन्हाळाचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरूडकर यांनी शिरोळ तालुक्याचा नुकताच दौरा केला. यामध्ये त्यांनी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी केल्या. त्यातच जयसिंगपूर येथील आम आदमी पार्टीच्या कार्यालयात सरूडकर यांनी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तर शिरोळ येथे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या पुढाकाराने तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा मेळावा संपन्न झाला.

या मेळाव्यात शिरोळचे बी.जी. माने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती महादेव धनवडे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे, जयसिंगपूर शहराध्यक्ष तेजस कुराडे, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत प्रचाराची रूपरेषा कशी असावी याबाबत या बैठकीत चर्चा झाली. ’काही मनाने होते काही तणाने होते’ असे एकंदरीत चित्र पहावयास मिळत होते. या बैठकीत अनेकांनी आपला उमेदवार कसा सक्षम आहे याबाबत मत व्यक्त केले.

पण तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अंतर्गत ताकद जादा आहे. हे सर्वांना माहीत असतानाही मोठमोठ्या क्लुप्त्या येथे लढविण्यात येत होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या निवडणुकीत स्वतः उमेदवार आहेत. त्यांना मानणारा गट हा वेगळाच आहे. तरीही या बैठकीत आपण मताधिक्य मिळवू असा ठाम विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे. गतवेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार उल्हास पाटील यांना राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चितपट केले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण किती मताचे मताधिक्य देऊ याकडे उल्हास पाटील यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

महायुतीचे शिवसेना भाजप गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

त्यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यातील भाजप शिवसेना आणि माने गट सक्रिय झाला आहे. त्यातच विद्यमान आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणावर आपली भिस्त निर्माण व्हावी याकरिता यड्रावकर घराण्याने संघर्ष केला आहे. त्याचे फलित म्हणूनच अपक्ष असूनही यड्रावकरांनी विधानसभा गाठली आहे.

तत्कालीन सरकारमध्ये ते राज्यमंत्री पदी होते.

त्यावेळी आणि सध्या सुरू असलेल्या कामात त्यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यावधी रुपयाची विकास कामे करून शिरोळ तालुक्याचा कायापालट केला आहे. हाच अजेंडा घेऊन यड्रावकर खासदारकीच्या निवडणुकीला सामोरे जातील असे बोलले जात आहे. पण अद्याप त्यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. निर्णायक वेळी आपली भूमिका स्पष्ट करून ते या निवडणुकीत रंग भरल्याशिवाय राहणार नाहीत असे राजकीय जाणकार बोलत आहेत.

स्थानिक नेत्यांची दमछाक…

सध्या तालुक्यात उबाठा गटाचे माजी आमदार उल्हास पाटील आणि काँग्रेस पक्षाचे नेते आणि दत्त कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांची या निवडणुकीत युती असणार आहे. या दोघांच्या शब्दाखातर मतदारराजा कितपत सत्यजित पाटील सरूडकर यांना मताधिक्य देतो हे मात्र पहावे लागणार आहे. मतांची गोळाबेरीज करत असताना या दोघा पाटील नेत्यांची मात्र दमछाक होताना दिसत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज