rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : …तर हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार: जयंत पाटील

जनप्रवास । सांगली
HATKANANGLE LOKSABHA : …तर हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार: जयंत पाटील : हातकणंकले लोकसभा मतदारसंघात माजी खा. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल पण सध्याचे चित्र वेगळे दिसते. त्यांनी आमचा पाठिंबा घेतला नाही तर या मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

HATKANANGLE LOKSABHA : …तर हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार: जयंत पाटील

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटणीमध्ये शिवसेनेचा आहे. या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी उध्दव ठाकरेंची भेट घेऊन पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी आता ‘एकला चलो रे’ची भूमीका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

त्याबाबत बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी आमच्यासोबत असावेत असे आम्हाला वाटत होते. पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतो. शिवसेना नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी, बैठका सुरू असल्याचे मला समजले. ते मविआसोबत येतील अशी अपेक्षा होती. पण सध्याचे चित्र मला दिसत नाही. आता त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही तर मग आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आम्हाला त्या मतदारसंघात उमेदवार द्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

भाजपाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा :  राजू शेट्टी

माझ्या पाठिंब्यास राष्ट्रवादीतील काही भाजपप्रेमी लोकांचा अडथळा

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजप व मित्रपक्षांचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. महाविकास आघाडीने उमेदवार देवू नये. महाविकास आघाडीतील शिवसेना पक्ष पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादी पक्षात काही भाजपप्रेमी लोक आहेत. तेच यामध्ये अडथळे आणत आहेत. असा आरोप स्वाभिमानी पक्षाचे नेते, माजी खा.राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. मी महाविकास आघाडीत जाणार नाही. शेतकरी व सर्वसामान्य मतदारांच्या जीवावर हातकणंगले मतदारसंघातून माझा विजयी नक्कीच होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी व महायुतीमध्ये न जाता स्वतंत्र निवडणूक लढवावी असे आमच्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत ठरले आहे. त्यामुळे मी
महाविकास आघाडीत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर निवडणूक न लढता स्वतंत्रच निवडणूक लढवणार आहे. तरीही याबाबत काही ठरवायचे झाले तरी मला आमची कार्यकारणी बोलवावी लागेल. कार्यकारणीच्या विचाराशिवाय मी कोणतेही पाऊल उचलणार नाही. भाजपा सरकार शेतकरी विरोधी आहे.

शासनाने आणलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात लढताना 750 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला याचा आम्हाला कदापही विसर पडणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका भाजपाविरोधी लढण्याची आहे. लढाई आम्हाला नवीन नाही. शेतकरी आम्हालाही शेतकरी विरोधी भाजपाचा पराभव करायचा आहे. त्यामुळे दोन्हींचेही विचार एक असल्याने महाविकास आघाडी मला पाठिंबा देईल अशी खात्री आहे. मी गेली 22 वर्षे राजकारणात आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढल्या आहेत.

अजूनही या मतदारसंघातील सर्वसामान्य लोक निवडणुकीसाठी वर्गणी देतात. हे माझ्यासाठी सर्वात मोठे सर्टीफिकीट आहे. माझा मतदार माझ्या पाठिशी ठाम आहे. 5 वर्षात ग्रामीण भागातील प्रश्न संसदेत मांडणारा खासदार नसल्याची उणीव शेतकरी व सर्वसामानन्य जनतेला झाली आहे. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अ‍ॅड.एस.यु.संदे, भागवत जाधव, पोपट मोरे, संजय बेले, रविकिरण माने, अनिल करळे उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज