rajkiyalive

islampur vidhansabha 2024 : जयंतरावांना मतदारसंघात रोखणार कोण ? राज्यस्तरावर चर्चा

इस्लामपूर ः सिद्धार्थ कांबळे

islampur vidhansabha 2024 : जयंतरावांना मतदारसंघात रोखणार कोण ? राज्यस्तरावर चर्चा : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राज्यपातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. आ.जयंत पाटील यांना मतदारसंघात रोखण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून फिल्डींग लावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार यापेक्षा कोणता उमेदवार आ.जयंत पाटील यांना रोखू शकतो यावर राज्यस्तरावर चर्चा झडू लागल्या आहेत.

islampur vidhansabha 2024 : जयंतरावांना मतदारसंघात रोखणार कोण ? राज्यस्तरावर चर्चा

इस्लामपूर मतदारसंघाचे सप्तपदी आ.जयंत पाटील आगामी विधानसभा निवडणूकीत विजय संपादन करुन सलग आठव्यांदा आमदार होण्याच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येक निवडणूकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करत आ.जयंत पाटील विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर जावे लागणार आहे. मला मतदारसंघात अडकविण्याचा प्रयत्न होईल असे वक्तव्य करत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सावध व दक्ष राहण्याच्या सुचना केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनीही तुम्ही राज्य सांभाळा आम्ही मतदारसंघात कार्यरत राहून आ.जयंत पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची शपथ घेवून वाटचाल सुरु केली आहे.

आ.जयंत पाटील यांनी प्रत्येक विधानसभा निवडणूकीत मताधिक्क्यात वाढ झाली आहे. गत विधानसभा निवडणूकीत आ.जयंत पाटील, शिवसेनेचे गौरव नायकवडी व भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली होती. आ.जयंत पाटील 1 लाख 15 हजार 553 मते घेवून 76 हजार मतांनी विजयी झाले. तर निशिकांत पाटील यांना 43,394 व गौरव नायकवडी 35,668 यांना मते मिळाली. गत निवडणूकीत आ.जयंत पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी मिळवला. तरीही विरोधकांच्या एकूण मतदानाची संख्या 83,256 एवढी होती. सध्यस्थितीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील पुन्हा एकदा जयंतरावांना टक्कर देण्यासाठी तयारी करत आहेत.

निशिकांत पाटील यांनी मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणला आहे. हॉल्पिटलच्या माध्यमातून 30 हजार लोकांना मोफत उपचार केले असून मतदारांच्या सतत संपर्कात आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
शिवसेनेचे नेते गौरव नायकवडी यांनी लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे धनुष्यबाण विजयी करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली होती. त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. गतवेळीसारखी मलाच उमेदवारी मिळेल असा त्यांचा दावा आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही विधानसभेसाठी दावेदारी सांगितली आहे.

गतवेळी माघार घेतली आता नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी लोकसेवेचे धनुष्यबाण उचलले आहे. भाजप व शिवसेनेतून विरोधकांनी दावेदारी सांगितली असली तरी इस्लामपूर मतदारसंघात आ.सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक यांच्या मतांची रसद विरोधी उमेदवाराला आवश्यकच आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून उमेदवारी ठरली तरी महायुतीतील सर्व विरोधकांना एकत्र करून निवडणूक लढवावी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे.

जयंतरावांविरोधात दुसर्‍यांदा लढणार कोण ?
आ.जयंत पाटील यांच्या विरोधात विधानसभेला एकदा लढत दिलेला उमेदवार पुन्हा दुसर्‍यांदा त्यांच्या विरोधात उभा राहिलेला नाही. हे सातवेळचे समीकरण आहे. परंतू यंदा गतवेळी निवडणूक लढवलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे नेते गौरव नायकवडी यांनी पुन्हा दंड थोपटले आहे. निशिकांत पाटील किंवा गौरव नायकवडी यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास हे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. विरोधकांतून कोणाला उमेदवारी मिळेल हे वरिष्ठ पातळीवरून ठरणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज