कठोरातल्या कठोर शिक्षेसाठी प्रयत्नशील : पोलीस अधीक्षक संदीप घुगे : आरोपीवर यापूर्वीही पोक्सो अंतर्गत गुन्हा आहे दाखल.
jat murdae news : करजगी येथील बालिकेचा अत्याचारानंतर खून : वैद्यकीय तपासात बाब उघड : : सांगली : जत तालुक्यातील करजगी येथे बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून करणार्या संशयिताविरोधात यापूर्वी विनयभंग प्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचे पोलीस आणि वैद्यकीय तपासात उघड झाले आहे. या खून प्रकरणाचा बारकाईने तपास करुन संशयितास अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. याकरिता लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येवून खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी विनंती न्यायालयास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
jat murdae news : करजगी येथील बालिकेचा अत्याचारानंतर खून : वैद्यकीय तपासात बाब उघड :
यासंदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्या बालिकेचा खून करण्यात आला ती सध्या आजीकडे राहत होती. तिची आई काही दिवसांकरिता कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माहेरी गेली होती तर वडिल बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीस गेले होते. मुलीच्या घरापासून काही अंतरावर संशयित पांडुरंग सोमलिंग कळ्ळी (वय 45) याचे घर आहे.
सुमारे वीस वर्षापूर्वी संशयित पांडुरंग कळ्ळी याची पत्नी त्यापासून विभक्त झाल्याने तो सध्या वृध्द आईसमवेत राहतो.
सन 2016 साली संशयित पांडुरंग कळ्ळी याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यातून त्याची तीन वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाली होती. मजुरीचे काम करणारा संशयित पांडुरंग याची बालिकेची ओळख होती. दरम्यान गुरुवारी बालिका बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यास प्राप्त झाली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली.
मुलीच्या घरी पोलीस दाखल झाल्यानंतर तेथे वावरणार्या संशयित पांडुरंग कळ्ळी याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातील एका लोखंडी पेटीत पोत्यात घातलेला बालिकेचा मृतदेह आढळून आला. यानंतर संशयित कळ्ळी यास अटक करुन त्याच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिक्षक घुगे म्हणाले, खूनाची घटना उघडकीस आल्यावर तातडीने घटनास्थळी भेट देवून ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. गावात शांतता पाळण्याचा आणि कोणीही कायदा हातात घेवू नये असे आवाहन करण्यात आले. तसेच सोशल मीडियावर कोणीही दिशाभूल करणारी माहिती प्रसारित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मनोधैर्य योजनेतून पिडीत मुलीच्या कुटुंबांना मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
कोणताही अनुचित प्रकार होवू नये याकरिता गावात जादा पोलीस बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास जतचे उपअधीक्षक साळुंखे यांच्याकडे देण्यात आला असून संशयितास अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी तसेच खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याची माहिती अधिक्षक घुगे यांनी दिली.
पोलीस अधिक्षक संदिप घुगे म्हणाले, भविष्यात अशा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन तत्पर आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे. मुलांना प्रशालेत सोडण्यासाठी पालकांनी जाणे गरजेचे आहे. मुलांना प्रशालेत पोहचविल्यावर ती जोपर्यत प्रशालेच्या आवारात आहेत तोपर्यत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची आहे. पालकांनी आपल्या मुलांना सांभाळण्याचे आवाहन यावेळी अधिक्षक घुगे यांनी केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



