rajkiyalive

jayant patil news : दुष्काळी भागाला पाणी देणारे पाणीदार नेतृत्व : आ. जयंतराव पाटील

jayant patil news : दुष्काळी भागाला पाणी देणारे पाणीदार नेतृत्व : आ. जयंतराव पाटील

jayant patil news : दुष्काळी भागाला पाणी देणारे पाणीदार नेतृत्व : आ. जयंतराव पाटील : लोकनेते राजारामबापू पाटील यांनी खुजगाव आंदोलन व उमदी पदयात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्याचा पाया रचला. त्यानंतर माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील सर्व पाणी योजना पूर्ण केल्या. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी ताकारी, म्हैसाळ, टेंभू, वाकुर्डे बु: या सांगली जिल्ह्यातील पाणी योजनांना भरघोस निधी उपलब्ध करून दिला. शेवटी जलसंपदा मंत्री या नात्याने विस्तारित म्हैसाळ योजनेला 6 टीएमसी व विस्तारित टेंभू योजनेला 8 टीएमसी पाणी उपलब्ध करून देऊन त्यावर कळस चढविला. आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जलसिंचन क्षेत्रातील कामाचा घेतलेला आढावा!

jayant patil news : दुष्काळी भागाला पाणी देणारे पाणीदार नेतृत्व : आ. जयंतराव पाटील

सांगली जिल्ह्याचे दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्यासाठी लोकनेते राजारामबापू पाटील व आ.जयंतराव पाटील या पितापुत्रांनी केलेले कार्य दुष्काळी भागाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावे, असेच आहे.  कृष्णा खोरे लवादाच्या पाणी वाटपानंतर 1960 च्या दशकात लोकनेते राजारामबापू पाटील यांनी महसूल व उद्योग मंत्री असताना वारणा नदीवर शिराळा तालुक्यात खुजगाव येथे धरणासाठी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे 3 जानेवारी 1967 साली वारणा नदीवर खुजगाव येथे 87.12 टीएमसी क्षमतेच्या धरणास पहिली प्रशासकीय मान्यता देण्यात आली. धरणाच्या डाव्या तीरावर म्हणजे सांगली जिल्ह्यात 147 कि.मी.लांबीचा व उजव्या तीरावर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात 195 कि.मी.लांबीचा कालवा काढून प्रवाही सिंचनाव्दारे 99 हजार 100 हेक्टर पीक क्षेत्र निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले.

 

या धरणस्थळास स्थानिक व बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला.

डाव्या कालव्याव्दारे सांगली जिल्ह्याच्या शिराळा, वाळवा, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांना नैसर्गिक उताराने/आडव्या पाटाने पाणी देण्याचे नियोजन केले. मात्र या धरणस्थळास स्थानिक व बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला. या प्रकल्पाला विरोध करताना धरणाची जागा खुजगाव ऐवजी चांदोली येथे करण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील गटाने पुढे केला. राजारामबापू पाटील हे खुजगाव धरणासाठी आग्रही होते. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील दे.भ.रत्नाप्पा कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांचा पाठिंबा होता. त्यातूनच मतभेद वाढत गेले व पुढे हा वाद वैचारिक, तात्विक झाला. सांगली जिल्ह्याला खुजगाव धरणावरून मोठा राजकीय संघर्ष पहायला मिळाला.

1976 साली वसंतदादा पाटबंधारे मंत्री असल्यामुळे धरणाची जागा बदलून चांदोली येथे 34.403 टीएमसीचे चांदोली धरणाला मंजुरी मिळाली.

यावेळी बापूंना माघार घ्यावी लागली. याकाळात बापूंनी दूरदृष्टी ठेऊन कृष्णा नदीतून वाळवा तालुक्यासाठी 18 पाणी परवाने मंजूर करून घेतले. बापूंच्या दुर्दैवी निधनानंतर राजकारणाची सर्व सूत्रे आ.जयंतराव पाटील यांच्याकडे आली. आ.जयंतराव पाटील यांनी बापूंचे जमिनी ओलिताखाली आणण्याचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावात पदयात्रा काढल्या.
सर्वसामान्य शेतकर्‍यांना पाण्याचे महत्व पटवून दिले.

त्यांच्या जमिनी बँकेस कर्जासाठी तारण देण्यास प्रवृत्त केले व त्यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा संस्थांच्या स्थापनेस गती मिळाली.

त्यासाठी नाबार्डचे अर्थ सहाय्यातून भूविकास बँक व अन्य राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज घेण्यात आले. यातून 46 गावांमध्ये 48 हजार 476 एकर क्षेत्रासाठी 39 पाणीपुरवठा संस्था कार्यान्वित केल्या. यासाठी 1983 ते 2000 या कालावधीत 52 कोटी रुपये बँक कर्ज घेण्यात आले होते. या सर्व कर्जाची परतफेड करून सध्या या संस्था पूर्णपणे सक्षम झालेल्या आहेत.

राजारामबापू दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी आग्रही होते.

त्यांनी दुष्काळी भागातील जनतेची पाण्याची मागणी विचारात घेऊन वेळोवेळी जनमताचा रेटा चालूच ठेवला. त्यामुळे 1982 साली शासनाला ताकारी उपसा सिंचन योजनेला मान्यता द्यावी लागली. 1982-83 मध्ये बापूंनी दुष्काळी भागातील जनतेच्या अडचणी समजावून घेण्यासाठी सांगली ते उमदी अशी 250 किलोमीटरची पदयात्रा केली. बापूंच्या या 10 दिवसाच्या पदयात्रेमुळे जनमताचा मोठा रेटा तयार झाला व शासनाला म्हैसाळ व त्यानंतर टेंभू अशा उपसा सिंचन योजनांना मान्यता द्यावी लागली.

बापूंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी खूप कष्ट घेतले.

बापूंच्या नंतर जयंतराव पाटील यांनी बापूंच्या पावलावर पाऊल ठेवत दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांना अर्थमंत्री कारकिर्दीत मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेच्या अधिकार्‍यांना बोलावून घेऊन योजनांची स्थिती व निधीची गरज समजून घेवून या योजनांना प्राधान्याने निधी दिला आहे.

आ. जयंतराव पाटील यांच्या अर्थमंत्री पदाच्या कारकिर्दीत ताकारी योजनेला 2952 कोटी, म्हैसाळ योजनेला 4335 कोटी तर टेंभू योजनेला 1083 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या योजनांना मोठी गती निर्माण होऊन योजना पूर्ण होण्यास मदत झाली.

तरीही सांगली जिल्ह्यातील काही गांवे या योजनांपासून वंचित रहात होती. आ.जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राजारामबापूंचे दुष्काळी भागाला पाणी देण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचे निर्धार केला. महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे त्यांना हवे ते मंत्रिपद मिळू शकले असते. परंतु जिल्ह्यातील पाणी योजनांना गती देण्यासाठी त्यांनी आवर्जून जलसंपदा खात्याची निवड केली.

अर्थमंत्री असताना सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांना निधी वितरीत करीत असताना त्यांचा या योजनांचा अभ्यास झालेला होता.

जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशा पद्धतीने जिल्ह्यातील सर्व गावांना पाणी मिळेल, असे नियोजन त्यांच्या जलसंपदा मंत्रिपदाच्या काळात केले गेले. कृष्णा खोरे सुधारित पाणी वाटपात महाराष्ट्राला 81 टीएमसी जादा पाणी उपलब्ध झाले. त्यातून त्यांनी टेंभू योजनेला 8 टीएमसी व विस्तारित म्हैसाळ योजनेला 6 टीएमसी जादा पाणी मंजूर केले. यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व वंचित गावांना या योजनांच्या माध्यमातून पाणी देणे शक्य झाले आहे.

सांगली जिल्ह्याचे दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्यासाठी लोकनेते राजारामबापू पाटील व आ.जयंतराव पाटील या पितापुत्रांनी केलेले कार्य दुष्काळी भागाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावे, असेच आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व गावांना शेतीला पाणी देणार्‍या अत्यंत दूरदृष्टी असलेल्या पाणीदार नेत्यास वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! त्यांना आरोग्यपूर्ण, दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा…!

– अ‍ॅड. बाबासाहेब देवाप्पा मुळीक
जेष्ठ विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते,
विटा, जि. सांगली.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज