rajkiyalive

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

 

दिनेशकुमार ऐतवडे

जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम

क्रिकेटच्या खेळात आपणे नवनवे रेकॉर्ड आणि विक्रम पहात आलो आहोत. परंतु आता राजकारणातही नवनवे विक्रम होताना दिसत आहेत. सांगोला मतदार संघातील शेकापचे गणपतराव देशमुख यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच मतदार संघातून सात वेळा निवडून जाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी सातही वेळा सात वेगवेगळ्या उमेदवारांचा पराभव केला आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्यांच्या समोर आला नाही. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेला हीच परंपरा कायम राहते, की पुन्हा जुना उमेदवार समोर येतो हे त्यावेळीच कळेल.

विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा काळ कोणालाही विधानसभेत टिकता आले नाही.

सांगली जिल्हा तसा नेत्यांचा खाण म्हणून ओळखला जातो. स्व.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, स्व. डॉ.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील, स्व.मदन पाटील यांनी आपआपल्या काळात सांगलीचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले. हार जित पचवत त्यांनी राजकारणाच्या पलिकले जावून काम केले. परंतु विधानसभेचे नेतृत्व करीत असताना एवढा काळ कोणालाही विधानसभेत टिकता आले नाही. अगदी वसंतदादाही चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल होते. परंतु तेही केवळ 1952, 1957, 1962 आणि 1978 असे चार वेळा विधानसभा जिंकले. 1967 आणि 1972 ची निवडणूक ते लढले नाहीत. या काळात ते विधानपरिषदेवर होते.

हेही वाचा

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

1984 मध्ये जयंत पाटील यांनी राजकारणाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

राजारामबापू पाटील यांच्या अकाली निधनानंतर अमेरिकेत असणार्‍या जयंत पाटील यांना राजकारणात ओघानेच यावे लागले. 1984 मध्ये जयंत पाटील यांनी राजकारणाची सूत्रे आपल्या हातात घेतली. सुरूवातीला त्यांना राजारामबापू कारखान्याचे चेअरमन करण्यात आले. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाग घेता आला असता परंतु त्यांनी गडबड केली नाही. त्या निवडणुकीत त्यांनी स्व.नागनाथअण्णा पाटील यांना पाठिंबा देवून निवडून आणले. पाच वर्षे त्यांनी मतदार संघाचा संपूर्ण अभ्यास केला. सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि 1990 च्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. यातील पहिल्या चार निवडणुका या पूर्वीच्या वाळवा मतदार संघातून तर गेल्या तीन निवडणुका इस्लामपूर मतदार संघातून लढले.

जे जे निवडणुकीला प्रमुख उमेदवार होते ते परत त्यांच्या विरोधात  रिंगणात आले नाहीत.

या सातही निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सातही निवडणुकीत त्यांच्या समोर जे जे निवडणुकीला प्रमुख उमेदवार होते ते परत त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आले नाहीत. जयंत पाटील यांनी आजपर्यंत विलासराव शिंदे, रघुनाथदादा पाटील, बाबा सूर्यवंशी, प्रा. विश्वास सायनाकर, अशोक पाटील, सी.बी.पाटील आप्पा, वैभव नायकवडी, अभिजित पाटील, जितेंद्र पाटील, गौरव नायकवडी आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा आजपर्यंत पराभव केला आहे. जयंत पाटील यांचे 2014 मधील 75 हजाराचे मताधिक्य आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य आहे.

1990 मध्ये काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळाले.

आमदार जयंत पाटील यांनी आपली पहिली निवडणूक वयाच्या 27 व्या वर्षी लढवली. 1990 मध्ये काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळाले. त्यांच्या विरोधात आष्ट्याचे विलासराव शिंदे होते. विलासराव शिंदे यांनी 1978 मध्ये राजारामबापुंचा पराभव केला होता. त्याच विलासराव शिंदेंचा पराभव करून जयंत पाटील यांनी आपल्या आमदारकीची सुरूवात केली.

शरद पवारांवरील आपली निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही.

सध्या जयंत पाटील राज्यपातळीवरील प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला तर शरद पवारांवरील आपली निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही. आज राज्याच्या राष्ट्रवादीची जबाबदारी त्यांच्या खात्यावर आहे. संपूर्ण इस्लामपूर मतदार संघ आजही त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून आहे. जयंत पाटील बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण या प्रमाणे कार्यकर्ते त्यांच्यावर निष्ठा ठेवून आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज