JAYANT PATIL SANGLI : जयंत पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री- राष्ट्रीय संत चिरंजीवीशास्त्री यांची भविष्यवाणी
JAYANT PATIL SANGLI : जयंत पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री-
१०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाची पूर्णाहुती व महाभंडाराने समारोप
इचलकरंजी : जयंत पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील अशी भविष्यवाणी राष्ट्रीय संत यज्ञाचार्य पंडीत चिरंजीवीशास्त्री यांनी येथे केली. यामुळे यज्ञसोहळ्याला उपस्थित भाविकांच्या भुवया उंचावल्या. समस्त जनकल्याण, विश्र्वशांती तसेच पर्यावरणशुद्धीसाठी सुरु असलेल्या दहा दिवसीय भव्य १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाची सांगता याग व पूर्णाहुतीने झाली. सलग दहा दिवस रुद्र होम, गणेश याग यांसह विविध अभिषेक देखील करण्यात आले. पंचगंगा वरदविनायक मंदिर नदीकाठावर भव्य यज्ञशाळा उभारून १०८ होमकुंड साकारण्यात आले होते.
महायज्ञ काळात देशभरातील विविध धर्म, पंथाच्या संत महंतांसह सुमारे दोन लाख भाविकांनी उपस्थिती लावली.
याच्या समारोपला शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावून सहभाग घेतला.महायज्ञाचे व वरदविनायकाचे दर्शन घेत देशभरातून आलेल्या साधुसंत महंतांशी संवाद साधून आशिर्वाद घेतले.यावेळी आशिर्वाद देताना यज्ञाचार्य पंडीत चिरंजीवीशास्त्री यांनी श्री गणपतीची कृपादृष्टी होऊन आपण मुख्यमंत्री व्हाल असा आशिर्वादही दिला.यावेळी त्यांच्यात राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे,वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी आदी उपस्थित होते.
एकाच वेळी तब्बल १०८ महंत यामध्ये सहभागी झाले होते.
श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर आवारात महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता. श्री श्री १०८ सीतारामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचार्य पंडित चिरंजीवी शास्त्री यांसह एकाच वेळी तब्बल १०८ महंत यामध्ये सहभागी झाले होते. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम आदी कुंडांचे जल याकाळात वापरले गेले.
आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात आले.
सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात आला. दहा दिवसात धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदूसह याग व इतर धार्मिक कार्यक्रमांत भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.आज पंचगंगा नदीच्या काठावर श्री गणपती महायज्ञ पूर्णाहुती व महाभंडारात संपन्न झाला. महाभंडारा व पूर्णाहुतीमध्ये सहभागी होण्यासाठी यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर संत महंतांचे संमेलनही झाले.गणपती महाआरतीनंतर २५ हजार भाविकांनी महाभंडाऱ्याचा लाभ घेतला.
गेली दहा दिवस अवघा पंचगंगा काठ भक्तिरसात न्हाऊन निघाला.
श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ यांच्यावतीने महायज्ञ करण्यात आला. त्यासाठी गायत्री सेवा मंडळ, जय जगदंबा सत्संग मंडळ, करंट मारुती सत्संग मंडळ,माय फाउंडेशन, केसरवाणी समाजसह महिला मंडळ्याचे सहकार्य लाभले. गोविंद बजाज, द्वारकाधीश सारडा,श्याम काबरा, गोविंद सोनी युवराज माळी, उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



