वारसदारांच्या एंन्ट्रीने कार्यकर्ते दुखावले, नेत्यांची डोकेदुखीत वाढ
जनप्रवास । अनिल कदम
आगामी निवडणुका जवळ येत असताना राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसतात. असे चित्र असताना सांगली जिल्ह्याही मागे राहिलेला नाही. जिल्ह्यातील राजकीय पक्षांमध्येही अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. भाजपच्या खासदार, आमदारांनी जवळच्या विश्वासू कार्यकर्त्यावर मदार न ठेवता वारसदारोंवर अधिक विश्वास दाखवण्यास सुरुवात केली आहे. विकासकामे असो वा राजकीय चर्चा यामध्ये नेत्यांचे वारसदार हस्तक्षेप करू लागल्याने निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जात आहेत. यापूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात विश्वासू कार्यकर्त्यांची यंत्रणा लागत असल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु आता दिवस बदलल्याने जिल्ह्यातील राजकीय पक्षामध्ये कारभारी उदंड झाले आहेत. वारसदारामुळे नेत्यांचे ओझे कमी झाल्याचे वाटत असले तरी डोकेदुखी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी नसतेे, मात्र मिळालेली संधी सोडली जात नाही. मागील काही वर्षापासून संपूर्ण राजकारणच अनिश्चिततेच्या गर्तेत गुरफटले जात आहे. राजकारणाचा तमाशा आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ असेच काहीसे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. एकेकाळी निष्ठावंत कार्यकर्त्यांशिवाय नेते मंडळींचे पान हलत नव्हते. निवडणूक, विकासकामे, प्रशासकीय यंत्रणाही कार्यकर्त्यांमार्फ राबविण्यात आली. पण बदलत्या परिस्थितीनुसार नेतेही बदलत आहेत. निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय निर्णय प्रक्रियेत नेत्यांचे वारसदार पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे निष्ठावंतांना धक्का बसून राजकीय वजनही कमी होत असल्याचे दिसते.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असल्याने संजयकाका पाटील यांची धावाधाव सुरू झाली आहे. गेली चार वर्षे जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न देणारे खासदार आता गावोगावी जाऊन लोकांमध्ये मिसळत आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये खासदारांची मदार निष्ठावंत कार्यकर्त्यावर राहिली, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून खासदारांचे पुत्र प्रभाकर हे राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत. धार्मिक सामाजिक कार्यक्रमाला हजेरी लावत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे खासदार पुत्रांचा वावर जिल्हाभर वाढला आहे. सध्या तरी निष्ठावंत कार्यकर्ते काही बोलत नसले तरी वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा
..न झालेले मुख्यमंत्री, स्व. गुलाबराव पाटील
1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री
72 वर्षात 28 वर्षेच दादा घराण्यात आमदारकी
कामगारमंत्री व पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू प्रा. मोहन व्हनखंडे यांनी पालकमंत्र्यांची धुरा सांभाळली व आताही सांभाळत आहेत. विधानसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो वा विकास कामाबाबतचा बहुतांशी निर्णय व्हनखंडे यांच्याकडून घेतला जाई. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री डॉ. खाडे यांचे पुत्र सुशांत हे अॅक्टीव्ह झाले आहेत. विकासकामे आणि पालकमंत्र्यांच्या निर्णय प्रक्रियेत सुशांत पुढे आले. दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधत आहेत. परिणामी विश्वासू प्रा. व्हनखंडे यांच्या अधिकारांवर मर्यादा आल्याने ते दुखावले. त्याची प्रचिती गोकुळाष्टमीला दिसून आली.
पालकमंत्री खाडे यांना आव्हान देत गोकुळाष्टमीला जनसुराज्यचे नेते समित कदम आणि प्रा. व्हनखंडे यांनी स्वतंत्र दहीहंडीचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर संतप्तया पालकमंत्र्यांनी पुत्र सुशांत खाडे यांचे प्रेझेंटेशन करीत जोरदार दहीहंडीचा कार्यक्रम घेऊन प्रति आव्हान दिले. दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री खाडे आणि व्हनखंडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.
सांगलीतील भाजप आमदार सुधीर गाडगीळ 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची धुरा लोकसभा प्रभारी शेखर इनामदार यांच्यावर राहिली. आमदार गाडगीळ यांच्या निर्णय प्रक्रिया आणि विकासकामांमध्ये इनामदार यांची महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा
सांगा राजेंद्र पाटील यड्रावकर कुणाचे?
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये
हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी
फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही
हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच
सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन
प्रशासकीय कामे करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. विधानसभा मतदारसंघात गाडगीळ यांचे विश्वासू कार्यकर्ते इनामदार यांची पकड वाढली. आ. गाडगीळ यांच्याकडूनही इनामदार यांच्याशिवाय कोणतेही पान हालत नसे. मात्र मागील दोन वर्षापासून आ. गाडगीळ यांनी पुत्र सिद्धार्थ यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा, बैठका तसेच मेळावे याबाबतचे नियोजनही सिद्धार्थ यांच्याकडून केले जात आहे. या कारणामुळे इनामदार हे आपोआप गाडगीळ यांच्यापासून दुरावत असल्याची चर्चा आहे. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त शक्तीप्रदर्शनात आमदार गाडगीळ यांना दुर्लक्षित करीत श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने कार्यक्रम घेतला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोरही आमदार गाडगीळ व इनामदार यांच्यात वाद झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये फूृट पडल्यानंतर शरद पवार आणि अजितदादा पवार गट असे विभाजन झाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पवार साहेबांसोबत कायम आहेत. परंतु पक्षातील फुटीचा परिणाम जिल्ह्यात होवू लागला आहे. जयंत पाटील यांची जिल्ह्यायातील यंत्रणा शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक नाराज होते. परिणामी बजाज यांचा वाढत्या हस्तक्षेपाबाबत दबक्या आवाजात चर्चा होती. आता अजितदादांनी स्वतंत्र गट निर्माण केल्यानंतर किाही मंडळी दादांच्या गटात सहभागी झाले.
जयंत पाटील यांची साथ सोडताना शहर जिल्हाध्यक्षांच्या कारभारावर तोफ डागत आहेत. पक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, मात्र साहेबांपुढे कोण बोलणार असे म्हणत तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात असल्याचे चित्र पाटील यांच्या गटात असल्याचे दिसून येते.
निष्ठावंतांच्या महत्वकांक्षाना मर्यादा
राजकारणातून समाजकारणाचे स्वप्न पाहत राजकारणात येवू पाहणारी दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांची पिढी सद्यस्थितीतील उलथापालथीमुळे गोंधळून गेली आहे. देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे नेतृत्व करणार्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा वसा आणि वारसा जोपासू इच्छिणार्या पिढीला मर्यादा येवू लागलीय. राजकीय नेतृत्वाचा आदर्श घ्यावा व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जायचे हे विचार केवळ स्वप्नवत बनून राहिले आहे. त्यात आता भर पडली आहे, ती गोंधळून टाकणार्या धोरणांची. रोज बदलणार्या नेत्यांच्या धोरणांमुळे महत्वकांक्षांना मर्यादा येवू लागल्या असून दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



