भाजपाला डोकेदुखी, काँग्रेस मात्र ‘जैसे थे’
प्रशांत पाटणकर
राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीशी फारकत घेत भाजपा शिवसेना (शिंदे गट) यांच्याबरोबर सत्तेत सहभागी होत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली ना.अजितदादांच्या या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटले, राज्यातील या बदलत्या राजकीय वार्याची झुळूक सध्या कडेगाव तालुक्यात सुद्धा जोरदार वाहत असल्याचे दिसत आहे. नुकतीच अजितदादा गटाची कडेगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, त्यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाने कडेगाव तालुक्यात जोरदार एंट्री केली आहे.
( sangli ) कडेगाव : अजितदादा गटाची एंट्री
अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या उपस्थितीत नुकत्याच या निवडी पार पडल्या असून, आता येत्या काही दिवसात गावागावात कार्यकारणी स्थापन करण्यात येणार असून, त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा प्रवेश घेणार असल्याचे नूतन अध्यक्ष कृष्णात मोकळे यांनी जाहीर केले आहे. राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजितदादा गट) असे तिघांचे सरकार असले तरी कडेगाव तालुक्यातील अजितदादा गटाची एंट्री ही भाजपलाच डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र आहे, कारण काल-परवा जी कार्यकारणी जाहीर झाली त्यामध्ये भाजपाचेच कार्यकर्ते असल्याचे दिसत आहेत. कारण याठिकाणी काँग्रेसचे राजकारण हे स्थिर असून, भविष्यात सुद्धा काँग्रेसचे फारसं कोणी या गटाच्या हाती लागले असे चित्र नाही.
थेट परिणाम आता ग्रामीण भागात गावपातळीवर व तालुका पातळीवर
राज्याच्या राजकारणात नव्याने घडत असलेल्या सत्तेची समीकरणे, नव्या युती व आघाड्या याचे थेट परिणाम आता ग्रामीण भागात गावपातळीवर व तालुका पातळीवर उमटताना दिसत आहेत. यामध्ये काही ठिकाणी पारंपरिक विरोधक एकत्र येऊन गळ्यात गळे घालत आहेत, तर काही ठिकाणी आयुष्यभर निष्ठतेने व एकदिलाने राहिलेले कार्यकर्ते नेत्यांच्या बदलत्या राजकीय साठमारीत एकमेकांचे शत्रू होत आहे, असे राजकीय खिचडीचे चित्र सध्या गावागावात निर्माण झाले आहे.
शिवसेनेची ताकत ही तुटपुंजी
प्रथम शिवसेना पक्ष फुटून भाजपात गेला, त्यावेळी कडेगाव तालुक्यात त्याचे फारसे परिणाम जाणवले गेले नाहीत, कारण मुळातच याठिकाणी शिवसेनेची ताकत ही तुटपुंजी अशीच होती, हाताच्या बोटावर मोजले जातील एवढेच कार्यकर्ते याठिकाणी शिवसेनेचे होते आणि आहेत, तसेच भक्कम नेतृत्वाचे पाठबळ देखील त्या कार्यकर्त्यांना लाभले नाही, त्याचे कारण ही तसेच आहे, कारण हा मतदारसंघ हा काँग्रेसी मुशीत वाढलेला, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना कडेगावमध्ये मात्र वेगळे चित्र होते. याठिकाणी मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी हेच एकमेकांचे कट्टर विरोधक होते,
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख आणि अरुण लाड यांचा दोस्ताना
त्यामध्ये कदमांना विरोध म्हणून राष्ट्रवादीतून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख आणि अरुण लाड यांचा दोस्ताना होता. सत्तेच्या बदलत्या समीकरणात साधारण दहा वर्षांपूर्वी देशमुख बंधूनी भाजपला साथ दिली, अरुण अण्णांनी मात्र हातावरचे घड्याळ न सोडता ते आणखी घट्ट करत थेट विधान परिषद गाठली, व देशमुख – लाड हे पारंपरिक मित्र वेगळे झाले. व त्यानंतर आमदार अरुण आण्णा लाड हे पदवीधर मधून आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादी ने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली, परंतु एखादा-दुसरा अपवाद वगळता जे राष्ट्रवादी गेले ते भाजपाचेच कार्यकर्ते होते, आता सुध्दा तीच परिस्थिती आहे.
हेही आवर्जुन वाचा
ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न…
(loksabha ) हातकणंगलेत दुरंगी की तिरंगी?
(sangli )काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप जोमात
उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ
राजकीय समिकरणाचा कसलाही परिणाम कडेगाव पलूसच्या काँग्रेसवर कधीही होत नाही
कारण कडेगाव-पलूस मतदार संघात स्व.डॉ.पतंगराव कदम, मा.आ.मोहनराव कदम व राज्याचे माजी मंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्याकडून काँग्रेसची अभेद्य अशी भक्कम फळी उभी करण्यात आली आहे. त्यामुळेच राज्यातील व देशातील बदलत्या राजकीय समिकरणाचा कसलाही परिणाम कडेगाव पलूसच्या काँग्रेसवर कधीही होत नाही, आणि झालाही नाही त्यामुळे कडेगाव तालुक्यात नव्याने झालेल्या अजितदादा गटाचे हादरे हे भाजपाला जाणवणार असून काँग्रेस वर त्याचा कसलाही परिणाम होणार नाही. असे कडेगाव तालुक्यातील चित्र आहे. कारण तालुक्याचा राजकीय इतिहास तेच दर्शवित आहे.0

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.