rajkiyalive

KHANAPUR-ATPADI सुहास बाबरना पोटनिवडणुकीतून चाल

दिनेशकुमार ऐतवडे (9850652056)
KHANAPUR-ATPADI सुहास बाबरना पोटनिवडणुकीतून चाल : खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे नुकतेच आकस्मीक निधन झाले. निधन होवून एक महिनाही झाले नाही. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने लोकसभेबरोबर खानापूरची पोटनिवडणूक घेण्याची तयारी सुरू केली आहे. पोटनिवडणुकीत अनिल बाबर यांचे सुपूत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांना पुढे चाल मिळण्याची शक्यता आहे. त्यांना जर संधी मिळाली तर राज्याला भविष्यात एक तरूण आणि दमदार नेता मिळणार यात काही शंका नाही.

 

KHANAPUR-ATPADI सुहास बाबरना पोटनिवडणुकीतून चाल

राज्याच्या राजकारणात अनिल बाबर यांचे मोठे नाव होतेे. गेल्या वर्षी ज्यावेळी राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला त्यावेळी सर्वात अगोदर त्यांना साथ दिली ती अनिल बाबर यांनी गुहाटीच्या दौर्‍यात अनिल बाबरही होते. मंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेल्या अनिल बाबर यांना काही शेवटपर्यंत संधी मिळाली नाही. एक पाणीदार आमदार म्हणून त्यांनी आपली सर्वत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या अचानक निधनाने आता पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.

अनिल बाबर यांचे ज्येष्ठ पूत्र सुहास बाबर यांनी आपल्या वडिलांच्या प्रत्येक निवडणुकीत तळागाळात जावून काम केले आहे.

जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असताना त्यांना काम करण्याची मोठी संधी मिळाली. मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते आहेत. आटपाडीच्या तानाजी पाटलांचीही त्यांना मोठी साथ आहे. अनिल बाबर यांच्या कामाचा आणि विचाराचा वारसा ते समर्थपणे पुढे चालवू शकतात, यात काही शंका नाही. सध्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघात भाजपमध्ये आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्रअण्णा देशमुख, अजितदादा पवार गटात वैभव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक आदी नेते कार्यरत आहेत.

अनिल बाबर पहिल्यांदा 1990 मध्ये विधानसभेसाठी निवडून आले. 1995 मध्ये

आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. अनिल बाबर राष्ट्रवादीमधून निवडून आले. पुढे 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि निवडून आले. 2019 मध्येही ते शिवसेनेतून निवडून आले. सध्याच्या घडीला महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमुळे या मतदार संघात बाबर यांना कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही सुहास बाबर यांना पुढे चाल देण्यासाठी एक पाउल पुढे येतील यात काही शंका नाही.

जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत ज्या ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये सांगलीचा एक अपवाद सोडला तर कुटुंबातील व्यक्तीलाच संधी मिळाली आहे. लोकांनीही त्यांना भरभरून साथ दिली आहे. 1987 मध्ये सांगलीच्या वसंतदादा पाटील यांची राज्यस्थानच्या राज्यपालपदी निवड झाली त्यामुळे येथे पोटनिवडणूक लागली. येथेे वसंतदादांचे पुतणे विष्णुअण्णा यांनी तिकीट मिळाले. परंतु नवख्या असणार्‍या पै. संभाजी पवारांनी त्यांना चितपट केले.

1995 मध्ये पलूस कडेगाव मतदार संघातून डॉ. पतंगराव कदम यांचा पराभव करणार्‍या संपतराव देशमुख यांचेही निधन झाले. येथेही पोटनिवडणूक लागली होती. येथेही मतदारांनी देशमुख कुटुंबीयातील पृथ्वीराज देशमुख यांना आमदार केले. पुढच्या निवडणुकीतही पृथ्वीराज देशमुख निवडून आले होते.
पलूस कडेगाव मतदार संघात डॉ. पतंगराव कदम यांचेही आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मतदारांनी विश्वजित कदम यांना बिनविरोध निवडून दिले. त्यावेळी कडेगावच्या देशमुख कुटंबीयांनीही मोठे मन दाखवून निवडणुकीत माघार घेतली आणि विश्वजित कदम यांना साथ दिली. तासगाव मतदार संघातही आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनाही मतदारांनी भरभरून साथ दिली. 2014 आणि 2019 असे दोन वेळा त्या निवडून आल्या.

आता लोकसभेबरोबर खानापूर आटपाडी मतदार संघाचीही पोटनिवडणूक लागणार आहे.

बाबर कुटुंबीय अजून दुखातून सावरले नाहीत. परंतु बाबर यांचे विचार आणि त्यांचे काम त्यांच्या कुटुंबीयांना पुढे चालवावे लागणार आहे. त्यामुळे सुहास बाबर यांनाही तयारीत रहावे लागणार आहे. सध्याच्या सरकारची मुदत ऑक्टोंबरमध्ये संपणार आहे. नवीन आमदाराला सहा महिने कालावधी मिळणार आहे. एकंदरीत निवडणूक लागली तर कदाचित सुहास बाबर बिनविरोधही होवू शकतील.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज