rajkiyalive

khanapur vidhansabha : खानापुरात ‘श्री’साठी ‘सौ’ उतरल्या मैदानात

प्रताप मेटकरी
khanapur vidhansabha : खानापुरात ‘श्री’साठी ‘सौ’ उतरल्या मैदानात : लवकरच खानापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रबळ दावेदारांनी उमेदवारी गृहित धरून मतदारसंघात मॅरेथॉन दौरे सुरू केले आहेत. संभाव्य उमेदवारांबरोबरच त्यांच्या सौभाग्यवती देखील मैदानात उतरल्या आहेत. सौभाग्यवतींनी आपल्या पतीच्या आमदारकीसाठी पायाला भिंगरी बांधली आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघातील महिला वर्गाशी जनसंपर्क साधला जात आहे.

khanapur vidhansabha : खानापुरात ‘श्री’साठी ‘सौ’ उतरल्या मैदानात

माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर यांच्या पत्नी प्रा. सोनिया बाबर या देखील अ‍ॅकटिव्ह मोडवर आल्या असून स्व. शोभाकाकी अनिलभाऊ बाबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला मेळावे घेऊन सुहासभैय्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करीत आहेत. जागर आदिशक्तीचा व्यासपीठाच्या माध्यमातून विटा शहरात महिलांची सांस्कृतिक चळवळ वाढवून महिलांचे चांगले संघटन केले आहे.

तसेच त्यांच्याबरोबरच जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या पत्नी संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. शीतल बाबर या देखील जोमाने सक्रिय झाल्या असून विशेषतः ग्रामीण भागात महिला मेळावे आयोजित करून महिलांचे प्रश्न समजून घेत विविध शासकीय योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांशी संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्गत गावातील महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व कोरोना काळामध्ये केलेल्या योगदानाबद्दल अंगणवाडीसेविका व आशावर्कर यांना एक छोटीशी गिफ्ट व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला जात आहे.

या अभिनव उपक्रमाचा अ‍ॅड. शीतल बाबर सध्या मतदारसंघात धडाका लावला आहे. महिलांना भावनिक साद घालत खानापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. आमदार अनिलभाऊंनी आणि युवा नेते सुहासभैय्या आणि अमोलदादा यांनी दिलेल्या योगदानाची आणि कार्याची आठवण करून देत आगामी विधानसभा निवडणुकीत सुहासभैय्यांच्या पाठीशी महिलांची ताकद उभी करण्याचे आवाहन करत आहेत.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या पत्नी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी देखील आपली यंत्रणा सज्ज केली असून प्रतिभा शक्ती युवती मंचच्या माध्यमातून विटा, आटपाडी, खानापूर परिसरात महिलांच्या बैठका घेत आहेत. प्रतिभाशक्ती युक्ती मंचच्या वतीने एक राखी जवानांसाठीसीमेवर रक्षण करणार्‍या भावासाठी उपक्रमांतर्गत खानापूर मतदारसंघातून राख्यांचे संकलन करून सीमेवर असणार्‍या जवानांसाठी पाठवल्या होत्या. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्रतिभा पाटील या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि कोलकाता येथील डॉक्टर युवतीवर अत्याचार करून केलेली अमानुष हत्या या दोन घटनेच्या निषेधार्थ युवती व महिलांना संघटित करून प्रतिभा शक्ती युवती मंचच्या माध्यमातून विटयातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थेट रस्त्यावर उतरत लक्षवेधी निषेध आंदोलन केले. तसेच मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन महिलांशी संवाद साधत आहेत. महिलांचे प्रश्न समजून घेत आहेत. वैभवदादांनी खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देत सामाजिक क्षेत्रात केलेल्या सार्वजनिक कामांची आठवण करून देत आहेत.

खानापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी वैभव पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे आवाहन करीत आहेत. एकंदरीत ’श्री’साठी ’सौ’ मैदानात उतरल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. आपापल्या कुटुंबातील महिलांनी भावी आमदारांसाठी कंबर कसली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज