rajkiyalive

मारुती चौक पुन्हा चर्चेत…

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

 कोण आला रे कोण आला, जनता दलाचा वाघ आला अशी गर्जना आली की लोक ओळखायचे सांगलीचे बिजलीमल्ल संभाजी पवार यांची एन्ट्री झाली. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविलेल्या वसंतदादांना त्यांच्या हयातीतच सांगली विधानसभा हिसकावून घेण्याचा भीमपराक्रम केलेल्या संभाजी पवारांनी चार वेळा आमदारकी जिंकली. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भूषविलेल्या संभाजी पवारांनी आपले संपूर्ण राजकारण सांगलीच्या मारूती चौकातून चालवली. आज पुन्हा एकदा मारूती चौक चर्चेत आला आहे. निमित्त आहे ते संभाजी पवारांचे चिरंजीव पै. पृथ्वीराज पवार यांच्या शक्तीप्रदर्शनाने…

पै. पृथ्वीराज पवार यांचा नुकताच वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. येणार्‍या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पवार गटाची ताकद सर्वांना समजावे यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. निमित्त जरी वाढदिवसाचे असले तर निवडणुका हेच टार्गेट पवार गटाचे असणार आहे यात काही शंका नाही.

1986 मध्ये गोरगरीब, दीनदलित, हातगाडे, व्यापारी, सर्वसामान्यांच्या पाठिंब्यावर संभाजी पवारांनी राजकीय इतिहास घडविला. वसंतदादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांचा विधानसभेत पराभव केला. आणि त्यावेळीपासून त्यांनी सांगलीच्या राजकारणावर आपला प्रभाव निर्माण केला. सर्वसामान्यांच्या काळजात भिडणारे संभाजी पवारांचे नेतृत्व होते. पहाटे सहा वाजल्यापासून रात्री 12 वाजेपयर्र्ंत मारूती चौकातील आप्पांचे कार्यालय सदैव उघडे असायचे. आप्पांच्या कार्यालयात कोणीही माणूस गेला तरी त्याला न्याय मिळायचाच हीच भावना सर्वांनची होती. पण दुर्दैव हेच होते की चार वेळा आमदार असूनही सतत विरोधी पक्षातच आप्पांना रहायला लागले. आप्पा जर सत्तेत असते तर मंत्री झाले असते आणि सांगलीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता यात काही शंका नाही.

हेही वाचा

संभाजी पवार गट पुन्हा रिचार्ज होणार

आप्पांच्या विचारांचा आणि कामाचा वारसा त्यांचे पूत्र पै. पृथ्वीराज पवार पुढे चालवित आहेत. जनता दलातून भाजप व्हाया शिवसेना असा त्यांचा प्रवास राहिला असला तरी सध्या ते भाजपमध्ये चांगलेच रूळले आहेत. भाजपनेही त्यांच्यावर चांगला विश्वास टाकला आहे. भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांना दिले आहे. पवारांना त्या पदाला चांगला न्यायही दिला आहे. राज्यात अनेक शेतकर्‍यांची उस तोड मुकादमांनी फसवणूक केली आहे.

त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पवारांनी केला आहे. तसेच कवलापूर विमानतळ प्रकरण, शेरीनाला योजना, बंधारा बचाव समिती, कष्टकरी, भाजीपाला विक्रेते, रस्त्यावरील व्यापारी, मोठमोठे व्यापारी या सवार्र्ंसाठीच पृथ्वीराज पवार यांनी संभाजी पवारांसारखे मोठा लढा उभारून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मारूती चौकातील आप्पांचे कार्यालय हेच पृथ्वीराज पवार वापरत आहेत. पृथ्वीराज पवारांच्या रूपात लोक आप्पांना पहात आहेत.

पृथ्वीराज पवार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा एकदा लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही. परंतु पृथ्वीराज पवारांना हार मानली नाही. पुन्हा नव्या जोमाने ते कामाला लागले आहेत. सध्या सांगली विधानसभा भाजपकडेच आहे. 2014 आणि 2019 मध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांना भाजपचा गड शाबूत ठेवला आहे. येणार्‍या निवडणुकीतही गाडगीळच राहणार अशी शक्यता आहे. असे असले तरी राजकारणात काहीही घडू शकते.

त्यामुळे नेत्यांना कायम तयारीतच रहावे लागतेे. त्यामुळे सर्वच नेते सध्या कामाला लागले आहेत. पृथ्वीराज पवारही मारूती चौक केंद्रस्थानी मानून लोकांच्या हाकेला ओ देत आहेत. सध्या त्यांच्या हातात काहीच नसले तरी सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठिशी आहे. सांगली विधानसभा मतदार संघात येणार्‍या ग्रामीण भागात अजूनही आप्पांना आणि पृथ्वीराज पवारांना मानणारा मोठा गट आहे. सांगलीतही हमाल, भाजीपाला व्यापारी, लहान व्यापारी यांचा मोठा गट त्यांच्या पाठिशी सदैव आहेच. त्यामुळे त्यांना सुरूवात शुन्यातून करावी लागणार नाही हे नक्कीच.

आजपर्यंत मारूती चौकाची धडकी अनेकांना बसली आहे. सांगलीचे वसंतदादा घराणेही त्याला अपवाद नाही. आप्पांनी अनेक नगरसेवक, आमदार घडवले आहेत. देशातील अनेक मोठमोठ्या नेत्यांचे पाय मारूती चौकाला लागले आहेत. नरेंद्र मोदी, गोपिनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे आशीर्वाद पवार घराण्याला लाभले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज पवार सध्या जोरात आहेत. येणारा काळ हा आपलाच असणार आहे, असे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटत आहेत. त्यामुळे कायम सावध भूमिका ठेवून कामात राहणे त्यांनी पसंत केले आहे.

सर्वसामान्यांचा पाठिंबा हीच पवारांची ताकद…
संभाजी पवार कायम गोरगरीबांसाठी झटले. त्यांच्या पाठिमागे हमाल, लहान सहान व्यापारी, भाजीपाला विक्रेते, हातावरील पोट असणारे सर्वसामान्य लोक असायचे. गोरगरीबांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांचे ओळख होती. तोच वारसा पृथ्वीराज पवार यांनी पुढे चालविला आहे. आपल्यासाठी लढणारा कोणीतरी आहे असे सर्वसामान्यांसाठी वाटते. हीच पृथ्वीराज पवारांसाठी जमेची बाजू आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज