rajkiyalive

miraj bjp news : आगामी निवडणुकीसाठी भाजपचे पुन्हा ‘हिंदुत्व कार्ड’

अनिल कदम

miraj bjp news : आगामी निवडणुकीसाठी भाजपचे पुन्हा ‘हिंदुत्व कार्ड’: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीला आलेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी हिंदुत्वाचे कार्ड वापरण्यात आले. मुख्यमंत्री लाडके बहीण, लाडका भाऊ याबरोबरच ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देण्यात आला. त्याचा महायुतीला चांगलाच फायदा झाला असून राज्यात एकहाती सत्ता मिळाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली असताना मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी पुन्हा हिंदुत्वाचे कार्ड काढले. मी दलित असलो तरी हिंदू आहे, मिरजेतून सलग चार वेळा निवडणूक जिंकली असून तो मतदारसंघ ‘मिनी पाकिस्तान’ क्षेत्र म्हणून घोषितही केले. आमदार खाडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले.

miraj bjp news : आगामी निवडणुकीसाठी भाजपचे पुन्हा ‘हिंदुत्व कार्ड’

लोकसभेच्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी अन् महायुतीने जोरदार ताकद लावण्यात आली. गेल्या काही विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर मुस्लिम व्होट बँकने भाजपला नाकारले होते. त्यामुळे विधानसभेला भाजपने हिंदुत्वाचे कार्ड खेळले. भाजपच्या निशाण्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राहिला. हिंदु मत एकत्र झाली तर आपला विजय नक्की आहे, असा विश्वास भाजपला होता.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान यांच्यासारखे दिग्गज नेते प्रचारात उतरले. याशिवाय भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मोहन यादव, हिमंता बिस्वा सरमा आदी प्रचारात सहभागी झाले होते. भाजपने निवडणुकीत धर्माचा मुद्दा लावून धरला. भाजपची ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा मतदारांपर्यंत पोहचवली. तर दुसरीकडे काँग्रेससोबत महाविकास आघाडीने आपला जुनाच फॉर्मूला प्रचारात वापरला.
2019 च्या निवडणुकीत 38 मुस्लिम बहुल मतदारसंघात 11-11 जागांवर भाजप आणि काँग्रेसने विजय मिळवला होता. 9 जागा शिवसेनेने जिंकल्या.

राष्ट्रवादी 3, सपा आणि एमआयएमने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या.

मुस्लिम बहुल असलेल्या 38 जागांवर केवळ आठच मुस्लिम उमेदवार निवडून आले होते. विशेष म्हणजे मुस्लिम लोकसंख्या अधिक असलेल्या 10 जागांवर काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत या 38 जागांपैकी 20 जागांवर भाजपचे मताधिक्क वाढले होते. शिवसेना स्थापन झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात सर्वात प्रथम ’हिंदुत्व कार्ड’हा मुद्दांवर ठामपणे भूमिका घेतली होती. आता उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत असल्याने हिंदुत्व आणि सावरकर या मुद्यांवरुन भाजपने त्यांना धारेवर धरले.

बंटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ हा नवा नारा महाराष्ट्रात दिला.

दलित-आदिवासी यांच्यात फूट पाडण्याचा आरोप काँग्रेसवर मोदींनी केला आहे. विदर्भात महाविकास आघाडीने दलित-मुस्लिम-कुणबी यांना सोबत घेत प्रचार केला. अन्य ठिकाणी मराठा-मुस्लिम-दलित या फॉर्मूल्यावर आघाडीवर आपली रणनीती आखली, आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी यश मिळाले. येत्या काही कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि तालुकास्तरीय नेत्यांची मोट पुन्हा बांधली जात आहे.

भाजपचे जिल्हास्तरावरुन सर्व नेत्यांना घेवून जाण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि सत्यजित देशमुख या चौघांना बालेकिल्ल्यातील स्थानिक स्वराज्य संस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विधानसभेला मिळालेले यश टिकवून ठेवण्यासाठी भाजपने सदस्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्ह्यात सभासद नोंदणीचे काम हाती घेतले आहे. अशातच सांगलीत शुक्रवारी हिंदू एकता आंदोलन व हिंदू व्यापार्‍यांच्यावतीने राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हिंदू गर्जना सभा घेण्यात आली.
या सभेत आमदार सुरेश खाडे यांनी हिंदुत्वाचे कार्ड काढले.

लोकसभेला अपयश आले पण विधानसभेला सर्व हिंदू एकत्र आले.

त्यानंतर हिंदूत्ववादी सरकार स्थापन झाले. दलित असलो तरी मी हिंदू आहे. चारवेळा मिरज विधानसभा मतदारसंघातून लढलो आणि जिंकलो. मी मिनी पाकिस्तानमधूनच लढतोय असे म्हणत आ. खाडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्र ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून घोषित केले. ज्यांनी साथ दिली नाही, त्यांचा कार्यक्रम करणारच आहे, जिथे रुजवायचे तिथे हिंदुत्वाचे बी रुजवणार आणि जिथे ठोकायचे तिथे ठोकणार, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. आमदार खाडे यांच्या वक्तव्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या रणनीतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

भाजप 2017 चा पॅटर्न राबविणार

राज्यात 2014 ते 2019 या कालावधीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती. त्याचा फायदा या कालावधीत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला झाला होता. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली होती. त्यानंतर झालेल्या सांगली कुपवाड आणि मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपला दणदणीत यश मिळाले. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाही ताब्यात घेण्याची रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर 2017 ची पुनरावृत्ती करण्याचा संकल्प भाजपने केला असल्याचे चित्र दिसून येते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज