rajkiyalive

मिरज, खानापूर-आटपाडी जागेवरून महाआघाडीत तर इस्लामपूर व शिराळ्यावरून महायुतीमध्ये चुरस

जनप्रवास । प्रतिनिधी

मिरज, खानापूर-आटपाडी जागेवरून महाआघाडीत तर इस्लामपूर व शिराळ्यावरून महायुतीमध्ये चुरस : राज्यात विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्याळवर आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून आता चर्चेच्या फेर्‍या सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात आठ जागा आहेत. या जागांमध्ये महाविकास आघाडीत मिरज व खानापूर-आटपाडी तर महायुतीमध्ये इस्लामपूर व शिराळ्याच्या जागा वाटप अडचणीचे असणार आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये असलेला घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला (अजितदादा गट) जिल्ह्यात एकही जागा मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मिरज, खानापूर-आटपाडी जागेवरून महाआघाडीत तर इस्लामपूर व शिराळ्यावरून महायुतीमध्ये चुरस

अजितदादांना जिल्ह्यात जागेची शक्यता कमीच

राज्यात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटप वरिष्ठस्तरावर सुरू झाले आहे. सांगली जिल्ह्यातील आठ जागांसाठी देखील दोन्ही आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. ज्या जागांवर विद्यमान आमदार आहेत. ती जागा त्याच पक्षाला ठेवण्याचा निर्णय महाविकास आघाडी व महायुतीमध्ये झाला आहे. त्यामुळे काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. महायुतीमध्ये सांगली, मिरज व खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाची जागा निश्चित झाली आहे. मिरज व सांगली हे दोन मतदारसंघात भाजप लढणार हे निश्चित झाले आहे.

सांगलीमधून आ. सुधीर गाडगीळ यांनी माघार घेण्याचा निर्णय कायम ठेवल्यास पृथ्वीराज पवार, शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची चर्चा आहे. तर मिरज विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जनसुराज्य पक्षाने जत व मिरजेच्या जागेवर दावा केला आहे. पण ही जागा भाजपच लढण्याची दाट शक्यता आहे. तर खानापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाला जागा निश्चित झाली आहे. आ. अनिल बाबर हे विद्यमान आमदार होते. त्यांचे निधन झाले. त्यामुळे या ठिकाणी स्व. अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. तर महायुतीमध्ये तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा, इस्लामपूर, जत व पलूस-कडेगावमध्ये अद्याप निर्णय होणे बाकी आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीमध्ये जत, शिराळा ही जागा भाजपने तर इस्लामपूर, पलूस-कडेगाव शिवसेनेने लढवली होती. त्यामुळे या जागेवर केवळ चर्चा सुरू आहेत. या चारही जागांवर भाजप इच्छूक आहे. तर शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्याकडून इस्लामपूर व शिराळ्यात चाचपणी सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र जिल्ह्यात जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील खानापूर-आटपाडी मतदारसंघातून इच्छूक आहेत. मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (शिंदे गट) ला मिळणार असल्याने वैभव पाटील नाराज आहेत.

महाविकास आघाडीमध्ये पलूस-कडेगाव व जतची जागा काँग्रेसला तर इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ व शिराळा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळणार आहेत. या ठिकाणी त्यांच्या पक्षाचेच विद्यमान आमदार आहेत. मात्र मिरज विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस व उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादी देखील या जागेची मागणी केल्याने वाद वाढला आहे. सांगलीची जागा काँग्रेस लढवणार आहे. पण शिवसेनेने देखील या जागेची मागणी केली आहे. पण त्यांच्याकडे उमेदवार नाही. काँग्रेसमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात चुरस आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस स्वत:कडे कायम ठेवणार आहे.

खानापूर-आटपाडी मतदारसंघात मात्र उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना व राष्ट्रवादीमध्ये चुरस आहे. महाविकास आघाडीकडे या जागेवर तगडा उमेदवार नाही. आयात उमेदवारालाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने यापूर्वी वैभव पाटील यांना ऑफर दिली होती. मात्र ती चर्चा फिस्कटली. आता ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना ऑफर दिली आहे. त्यांनी देखील विधानसभा लढण्याची घोषणा केली आहे. पण त्यांचा पक्ष अद्याप ठरला नाही. देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेल्यास या जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तशीच परिस्थिती मिरज विधानसभा मतदारसंघात आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व उध्दव ठाकरे गटाच्यावतीने उमेदवारी मागितली केली आहे. तिन्ही पक्षाकडे उमेदवार आहेत. त्यामुळे या जागेवरून देखील महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.

तर महायुतीत मिरज व खानापूर-आटपाडीत मैत्रीपूर्ण लढत?

महायुतीमध्ये राज्यातील काही मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केली जात आहे. तिन्ही पक्षातील इच्छूक असलेल्या जागेवर मैत्रीपूर्ण लढतीचा विचार सुरू आहे. पण अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. तसे झाल्यास खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटामध्ये तर मिरजेत भाजप विरूध्द जनसुराज्य अशी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. पण मैत्रीपूर्ण लढतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज