rajkiyalive

miraj vidhansabha 2024 : मिरजेत महाविकास आघाडीकडूनही यंदा बाहेरून उमेदवार?

dineshkumar aitawade 9850652056

miraj vidhansabha 2024 : मिरजेत महाविकास आघाडीकडूनही यंदा बाहेरून उमेदवार? : गेल्या तीन टर्ममध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला पाणी पाजून विजयाची हॅटट्रीक केलेल्या भाजपच्या सुरेश खाडे यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून, यंदा स्थानिक ऐवजी बाहेरून उमेदवार आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

miraj vidhansabha 2024 : मिरजेत महाविकास आघाडीकडूनही यंदा बाहेरून उमेदवार?

मिरज मतदार संघ हा तसा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला परंतु 2009 मध्ये मतदार संघाची पुनर्रचना झाली आणि मतदार संघ राखीव झाला. त्यावेळीपासून भाजपने येथे बस्तान बसवले आहे. तासगाव तालुक्यातील पेड गावचे रहिवासी असलेल्या आणि जतमधून आमदार झालेल्या भाजपच्या सुरेश खाडेंनी येथे चांगलेच बस्तान बसविले आहे. गेल्या तीन निवडणुकीत त्यांना म्हणावा तसा तगडा विरोधक मिळाला नाही. किंबहुना अजूनही कोणी तगडा उमेदवार त्यांच्या विरोधात तयार नाही. मुळात मिरज मतदार संघ कोणाच्या वाटणीला हे अजून निश्चित नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गट तिन्ही पक्षांना हा मतदार संघ हवा आहे. परंतु ताकदीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या मतदार संघात आता बाहेरून ताकदीचे उमेदवार आणावेत असे सर्वच पक्षांना वाटू लागले आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू झाली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मिरज मतदार संघाने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना चांगलाच हात दिला.

त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळु घसरू लागली आहे तर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी गर्दी वाढू लागली आहे. परंतु ताकदीचा आणि नव्या चेहर्‍याच्या शोधात महाविकास आघाडी आहे. या मतदार संघात काँग्रेसचे पर्यायाने विशाल पाटील, जयश्र्री पाटील यांचा चांगला गट असून, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनाही मानणारा येथे मोठा गट आहे. शिवसेनेचीही येथे मोठी ताकद आहे. पूर्वीपासून शिवसेना हाच येथे विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात आहे. एकेकाळी बजरंग पाटील यांच्या रूपाने दोन नंबरवर असणार्‍या या पक्षाकडेही सध्या अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

मिरज मतदार संघ राखीव असल्याने राज्यातील अनेक नेत्यांनी मिरजेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेनेच्या मुलुख मैदान तोफ सुषमा अंधारे यांचे नाव सर्वात अग्रेसर आहे. शिवसेनेतर्फे त्यांना येथून उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचबरोबर हातकणंगलेचे जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनीही आपला मोर्चा इकडे वळविला आहे. त्यामुळे स्थानिक इच्छुक उमेदवारही गोंधळून गेले आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटणीला गेली. त्यामुळे बाळासाहेब होनमोरे हे स्वाभिमानीच्या तिकीटावर उभे राहिले. तरीही सुरेश खाडेंनी सुमारे 31 हजार मतांनी विजयी झाले.

2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले. भाजपतर्फे सुरेश खाडे, काँग्रेसकडून सिध्दश्वर जाधव, शिवसेनेकडून तानाजी सातपुते, तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब होनमोरे उभे राहिले. चौरंगी लढतीत मतांची मोठी विभागणी झाली आणि सुरेश खाडे 64 हजार मतांनी विजयी झाले.

2009 च्या गणेशोत्सवमध्ये मिरजेत मोठी दंगल झाली. याचा परिणाम जिल्ह्यातील सांगली आणि मिरज मतदार संघात तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदार संघात झाला. येथे पहिल्यांदा उभे राहिलेले भाजपचे सुरेश खाडे यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब होनमोरे यांचा मोठा पराभव केला.

गेल्या तीन निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेश खाडेंची ताकद वाढली आहे.

पक्षानेही त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या गळ्यात पालकमंत्र्याची माळ टाकली आहे. भाजपमध्येही उमेदवारीसाठी धुसफूस असली तरी खाडेंनेही मोठी फिल्डिंंग लावली आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी राज्यस्तरावरून हालचाली सुरू झाल्या असून, इचलकरंजीचे राजीव आवळे आणि सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा सध्या तरी सुरू आहे.

मिरज विधानसभा मतदार संघातून आजपर्यंत 1952 मध्ये काँग्रेसकडून श्र्रीमतीबाई कळंत्रे आक्का, 1957 मध्ये काँग्रेसकडून गुंडू दशरथ पाटील, 1962 मध्ये काँग्रेसकडून पुन्हा एकदा गुंडू दशरथ पाटील, 1967 मध्ये गुंडू दशरथ पाटील यांची विजयाची हॅटट्रीक झाली. त्यांनी एन. आर. पाठक यांचा पराभव केला.

1972 मध्ये मात्र एन. आर. पाठक यांचा विजय झाला. त्यांनी दादासाहेब जामदार यांचा पराभव केला. 1978 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच मिरजेच्या बाहेर उमेदवारी गेली. म्हैसाळचे सरकार मोहनराव शिंदे यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विजय मिळविला. त्यांनी जनता पक्षाच्या इलियास नायकवडी यांचा पराभव केला. दोन वर्षात सरकार कोसळले आणि पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे मिरजेतून पुन्हा एकदा मोहनराव शिंदेंना उमदेवारी मिळाली. त्यांनी अपक्ष उमेदवार रघुनाथ नागरगोजे यांचा पराभव केला.

1985 च्या निवडणुकीत मोहनराव शिंदे यांनी विजयची हॅट्रीक केली. त्यांनी जनता दलाच्या प्रा.शरद पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत सुरेश आवटी यांचे वडील देवाप्पा आवटी यांनी बंडखोरी केली होती. 1990 च्या निवडणुकीत जनता दलाच्या शरद पाटील यांनी मागील निवडणुकीत पराभवाचा वचपा काढला. त्यांनी मोहनराव शिंदे यांचा पराभव केला. या निवडणुकीत जिल्ह्यातून शरद पाटील आणि संभाजी पवार हे दोन जनता दलाचे आमदार निवडून आले होते.

1995 च्या निवडणुकीत मोहनराव शिंदे यांचे निधन झाल्याने काँग्रेसने महिला उमेदवार माणिकताई गायकवाड यांना तिकीट दिले परंतु शरद पाटील यांच्यापुढे त्यांचा काही टिकाव लागला नाही. 1999 च्या निवडणुकीत सर्वत्र ओबीसीचा नारा देण्यात आला होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांनी मिरजेची उमेदवारी हाफिज धत्तुरे यांना मिळवून दिली. आणि धत्तुरेंनी शरद पाटलांची हॅट्रीक चुकवली. 2004 च्या निवडणुकीतही पुन्हा एकदा धत्तुरेंनी विजय मिळविला.

आजपयर्र्ंत चारवेळा कुणीच निवडून आले नाही

2009 मध्ये मतदार संघांची पुनर्रचना झाली आणि हक्काचा काँग्रेसचा असणारा मतदार संघ भाजपकडे गेला. गेल्या तीन निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक प्रयोग करून पाहिले परंतु खाडेंच्या पुढे कुणाचेच काही चालले नाही. परंतु मिरज मतदार संघांचा राजकीय इतिहास पाहिला तर आजपर्यंत चौथ्यावेळी कोणीच निवडून आले नाही. सुरूवातीच्या काळात गुंडू दशरथ पाटील उर्फ जी. डी. पाटील यांची हॅट्रीक झाली होती. त्यानंतर मोहनराव शिंदे आणि सुरेश खाडे यांची हॅट्रीक झाली परंतु चौथ्या वेळी कुणीच निवडून आले नाही. शरद पाटील, हाफिज धत्तुरे हे दोन वेळा निवडून आले. त्यामुळे मिरजेचा राजकीय इतिहास मोडून चौथ्यावेळी सुरेश खाडे निवडून येतात की मिरजकर आपला इतिहास कायम ठेवतात हे येणार्‍या निवडणुकीत कळेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज