rajkiyalive

miraj vidhansabha 2024 : मिरज पॅटर्नमध्ये उभी फूट; काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाहेर

आ. कदमांकडून खरडपट्टी: पालकमंत्र्यांना पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण

जनप्रवास । सांगली

miraj vidhansabha 2024 : मिरज पॅटर्नमध्ये उभी फूट; काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाहेर  मिरज विधानसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांना सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी मिरजेच्या माजी नगरसेवकांची खरडपट्टी करत जाब विचारला, अखेर ‘त्या’ माजी नगरसेवकांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सहकार्‍यांनी परस्पर पाठिंब्याची घोषणा केली होती, आम्ही पाठिंबा दिल्याच नसल्याचे स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिला नसल्याचे बोलत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक बाहेर पडल्याने या विधानसभा निवडणुकीत मिरज पॅटर्नमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे.

miraj vidhansabha 2024 : मिरज पॅटर्नमध्ये उभी फूट; काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाहेर

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिरजेतील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी एकत्रित येत खा. विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे विशाल पाटील यांना मिरज शहरात चांगले मताधिक्य मिळाले. त्यानंतर माजी नगरसेवकांचा ‘मिरज पॅटर्न’ चांगलाच गाजला होता. तर काही दिवसांपूर्वी मिरजेतील माजी नगरसेवकांची बैठक पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घेतली होती. या बैठकीत सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी मिरज विधानसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर करण्यात आला होता. या बैठकीला भाजपचे सुरेश आवटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी यांच्याबरोबर काँग्रेसचे संजय मेंढे, करण जामदार आदी सर्वपक्षीय माजी नगरसेवक उपस्थित होते.

ही बाब काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर मिरजेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी खा. विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्यासह मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय मेंढे, माजी नगरसेवक करण जामदार, बबिता मेंढे आदी उपस्थित होते. आ. विश्वजीत कदम यांनी माजी नगरसेवकांची खरडपट्टी केली. त्यावेळी माजी नगरसेवकांनी खुलासा करताना सांगितले की, जिल्हा नियोजन समितीच्यामार्फत महापालिकेला निधी दिला जाणार होता. या निधीतून विकासकामे सूचविण्यात येणार होती. सध्या नगरसेवकांची टीम अस्तित्वात नसल्याने माजी नगरसेवकांनी कामे मला सूचवावीत मी ती कामे आयुक्तांना देतो, असे पालकमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते.

त्यानुसार कामे सूचवली, कामे मंजुरीसाठी गेली. निधी वाटप करताना दुजाभाव न केल्याने पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते, पण याला राजकीय रंग लावण्याचा प्रयत्न झाला. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्याकडून पाठिंब्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला नव्हता, असे स्पष्टीकरण मिरजेच्या माजी नगरसेवकांनी दिले. त्यानंतर आ. विश्वजीत कदम म्हणाले, राज्यात, जिल्ह्यात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. पलूस-कडेगाव, जत, सांगलीबरोबर मिरज विधानसभेची जागा देखील काँग्रेस मागणार आहे. ही निवडणूक मोठ्या जोमाने लढायची आहे. महाविकास आघाडीला बाधा पोहचेल, असे काम होऊ नये, पक्षवाढीसाठी सर्वांनी कामाला लागावे, अशा सूचना दिल्या.

पालकमंत्र्यांना पाठिंब्याचा निर्णय नाहीच: संजय मेेंढे

मिरज शहरातील विकासकामे करण्यासाठी माजी नगरसेवकांनी कामे सूचवावीत, अशा सूचना पालकमंत्री कार्यालयातून आल्या होत्या. त्यानुसार आम्ही कामे सूचवली. त्यानंतर सर्वपक्षीय माजी नगरसेवकांच्यामार्फत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सत्काराचे नियोजन झाले, त्यांचा सत्कार देखील केला. त्यानंतर निवडणुकीसाठी भाजपच्या माजी नगरसेवकांनी पालकमंत्र्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये काँग्रेसच्या कोणत्याही पदाधिकार्‍याने पालकमंत्री खाडे यांना पाठिंबा दिला नाही. आम्ही काँग्रेससोबतच असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्याचे प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी दिली.

पालकमंत्र्यांच्या बगलबच्च्यांकडून दिशाभूल: मैनुद्दीन बागवान
सध्या महापालिकेत नगरसेवकांची बॉडी अस्तित्वात नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमार्फत मनपाला जाणार्‍या निधीतून विकासकामे सूचविण्याची मागणी मिरजेतील सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना केली होती. त्यातून कामे सूचवली होती. या कामांना निधी देताना दुजाभाव केला नसल्याने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सत्काराचे नियोजन झाले, तसा दूरध्वनी देखील आला होता. त्यानुसार आम्ही गेलो, सत्कार केला, त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक बाहेर पडले. त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांना पाठिंब्याचा निर्णय झाला, पण आम्ही पाठिंबा दिलेला नाही. पालकमंत्र्यांच्या काही बगलबच्च्यांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी केला.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज