अमृत चौगुले, जनप्रवास
काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष व मास लिडर राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन राहुल गांधी यांना खासदारकी पुन:र्बहाल करण्याचा मार्ग मोकळा केला. एवढेच नव्हे तर पुढे दोन टर्म सक्रिय राजकारणापासून वंचित ठेवण्याचा विरोधक एनडीएचा डावही आता उधळला गेला आहे. आता लोकशाहीच्यादृष्टीने योग्य-अयोग्य काही असो, पण राहुल गांधींचे संसदेत कमबॅक साहजिकच मोदी आणि एनडीएविरोधी ‘इंडिया’साठी आणि अडचणीतील काँग्रेससाठी हा बुस्टर डोसच (संजीवनी) म्हणावा लागेल. जोडीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडियाच्या ‘मोदी हटावो, देश बचाओ’च्या मिशलाही मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.
सन 2013 पूर्वी एखाद् दुसरा अपवाद वगळता काँग्रेस राज्यात असो वा देशात सत्तेत होती
सन 2013 पूर्वी एखाद् दुसरा अपवाद वगळता काँग्रेस राज्यात असो वा देशात सत्तेत होती. सर्वात मोठा पक्ष होता. अर्थात सर्व घटकांना समावेशक अशी या पक्षाची आयडॉलॉजी होती व आहे. म्हणूनच काँग्रेसच्या पटलावर कधी सूर्य मावळणार नाही अशी पूर्वी बिरुदावली होती. पण दुर्दैवाने 2013 मध्ये एकूणच आलेल्या साचेबद्ध आणि स्थूल राजकारणाला विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाटणी दिली. अर्थात ते देताना त्यांनी जणू राजकारणाचे संकेत, संहितेसह सर्वच आकार उकार बदलून टाकले.
या लाटेत कुठे फेकले गेले हे कुणालाच कळाले नाही.
काँग्रेसला बदनाम आणि भ्रष्टाचाराची गंगा असल्याचे बिंबविण्यापासून घराणेशाहीचा उद्धार करण्यापर्यंत सर्वच हातखंडे त्यांनी वापरले. सोबतीला अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांसह रेडिमेड नेत्यांच्या इनकमिंगचेही मोठे बळ मिळाले. एकूणच या सर्वाला जनतेतूनही त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि नुसते परिवर्तन नव्हे तर त्याला मोदी लाटेचे स्वरूप प्राप्त झाले, यामध्ये भाजप आणि भाजपसाठी सर्वस्व झोकून देणारे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते मात्र या लाटेत कुठे फेकले गेले हे कुणालाच कळाले नाही.
कधी नव्हे एवढी काँग्रेस-राष्ट्रवादी पिछाडीवर गेली.
केंद्रापाठोपाठ राज्यातही अशाच पद्धतीने भाजप-शिवसेनेसह समविचारी महायुती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षीय आघाडीचा सामना रंगला. इथेही सत्ता काबिज करण्यात महायुतीला यश आले. कधी नव्हे एवढी काँग्रेस-राष्ट्रवादी पिछाडीवर गेली. राज्यात तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार अन् दोन अंकामध्येच आमदार राहिले. केंद्र राज्याच्या पाठबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कमळ तरारून उमलले. यात समविचारी पक्ष मात्र झाकोळले गेले हे मान्यच करावेल लागेल.
हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
राजकारणाचे समिकरण बदलले गेले.
एकूणच दहा वर्षांत मनी, मसल आणि माईंड पॉवरसह सर्वच प्रकारे (मिडिया मॅनेजमेंट) राजकारणाचे समिकरण बदलले गेले. अगदी राहुल गांधींना पप्पू ठरविण्यापासून ते विरोधकांना सोयीस्कर बदनाम करण्यासाठी सोशल मिडियाचा वापरही तितक्याच प्रमाणात भावला गेला. यातूनच हीच मोदीरूपी लाट आणि आक्रमक कार्यपद्धतीपुढे काँग्रेससह सर्वच विरोधक निष्प्रभ होत गेले. जे झुकले नाहीत त्यांच्याविरोधात मागील भ्रष्टाचाराचे हत्यार करून त्यांना राजकारणातून संपविण्याचा सपाटा सुरूच राहिला. जोडीला नवनवी आश्वासने आणि विकासाचा अजेंडाही राबविण्यात केंद्र राज्य विसरले नाही.
साम-दाम-दंड या पद्धतीमुळे आता मोदी एके मोदीचा बोलबाला सुरू आहे
एकूणच या सर्वांमुळे नऊ-दहा वर्षांत साम-दाम-दंड या पद्धतीमुळे आता मोदी एके मोदीचा बोलबाला सुरू आहे. जोडीला आंतरराष्ट्रीय पातळीवरही सर्वतोपरी मोदींनी स्वत: आणि देशाची ‘इमेज बिल्टअप’ करण्यात यश मिळविले. दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहारसह पंजाबसह अन्य राज्ये भाजपच्या हातून गेली अन् मोदींची लोकप्रियता घसरू लागली. भाजपला तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र, तेलंगाणासह अन्य राज्यात मात्र तेथील स्थानिक पक्षांच्या मजबूत पकडीमुळे भाजपला पाय रोवता आले नाहीत. अगदी केंद्राकडून नाक दाबण्यापासून ते ईडीसह सर्व प्रकारचे हत्यार वापरूनही तेथे मोदी आणि भाजपला अपयश आले हे मान्यच करावे लागेल. अर्थात हे भाजपला मोठे शल्य होते व आहे.
शिवसेनेनेही जशास तसे उत्तर देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पहिल्यांदाच हात धरला
एकीकडे पूर्ण देशभर वर्चस्व मिळविता आले नाही आणि महाराष्ट्रात शिवसेनेशी बिनसल्यामुळे सुरुवातीला राष्ट्रवादीत अजित पवार यांच्यारूपाने पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग झाला. पण तोही अपयशी ठरला. शिवसेनेनेही जशास तसे उत्तर देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पहिल्यांदाच हात धरला. काँग्रेस-राष्ट्रवादीला सावरण्याबरोबरच सत्तेची संधी चालून आली. परिणामी महाविकास आघाडीरूपी प्रयोगाचा झटका जिव्हारी लागला होता. त्यातून विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली.
हेही वाचा
1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
‘भारत जोडो अभियान’अंतर्गत थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी देशभर यात्रा काढली.
याच दरम्यान भाजपविरोधी रोष वाढतच होता. हाच रोष इनकॅश करण्यासाठी पुन्हा राहुल गांधी यांनी कार्पोरेट स्टॅटर्जी बदलून ‘भारत जोडो अभियान’अंतर्गत थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी देशभर यात्रा काढली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत गेल्याने विरोधकांचा आवाज पुन्हा बळकट होत गेला. दरम्यान, काँग्रेसला अन् राहुल गांधींना झटका देण्याची संधी मोदी नावाने झालेल्या टीकेच्या रूपाने चालून आली. ‘सर्व मोदी चोर कसे?’ या कर्नाटकातील सभेतील आरोपावरून राहुल गांधी यांच्यावर भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा केला होता.
याप्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा लागली.
याप्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा लागली. खासदारकी रद्द झाली अन् संसदेतील आवाजही दाबला गेला. काँग्रेसला आलेली उभारी कर्नाटकात जमेची बाजू, तर भाजपविरोधी नाराजी वजाबाकीची ठरली. परिणामी काँग्रेस बहुमतासह सत्तेवर आली. त्यानंतर पुन्हा भाजपविरोधात देशभरातील सर्वपक्षीयांना एकत्र करून आगामी 2024 च्या निवडणुकीत लढण्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी वज्रमूठ सुरू असतानाच भाजपने अजित पवार यांना फोडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि विरोधकांना एकसंध करणारे दुवा शरद पवार यांना राज्यात झटका देण्याची खेळीही भाजपने केली आहे. तरीही पुन्हा सर्वांनी एकत्र येऊन मोदीविरोधी आवाजाला ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्ल्युझिव्ह अॅलायन्स) रूपाने टक्कर देण्याची तयारी केली आहे. त्याच्या बैठकाही सुरू आहेत. एकीची वज्रमूठ आवळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मानहानीच्या प्रकरणात देण्यात आलेल्या शिक्षेवर स्थगिती दिली
अशातच आता सर्वोच्च न्यायालायाने नुकताच राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात देण्यात आलेल्या शिक्षेवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा संसदेत एंट्रीचाच मार्ग मोकळा झालेला नाही, तर पुढे 2024 आणि 2029 च्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. हा एकप्रकारे काँग्रेसला आणि इंडियाच्या मोटबांधणीला बुस्टर डोसच ठरणार आहे. एकूणच एनडीए विरुद्ध इंडियाचा निवडणुकीचा सामना अधिक रंगतदार होणार हे यातून स्पष्ट होणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.