RAJARAMBAPU PATIL : शरद पवारांच्याहस्ते मंगळवारी राजारामबापुंच्या पुतळ्याचे अनावरण : येथील स्टेशन चौकात उभारण्यात आलेल्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुर्णाकृती पुळ्याचे मंगळवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी महापालिका व राष्ट्रवादीकडून सुरू आहे. रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या परिसराची पाहणी केली.
RAJARAMBAPU PATIL : शरद पवारांच्याहस्ते मंगळवारी राजारामबापुंच्या पुतळ्याचे अनावरण
जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली: यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, हरिदास पाटील आदी उपस्थित होते.
राजकारण, समाजकारण, शिक्षण व शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेच्यावतीने उभारण्यात आला आहे. याचे अनावरण मंगळवार 16 रोजी सायंकाळी सहा वाजता शरद पवार यांच्याहस्ते तर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या नियोजन ठिकाणाची पाहणी जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, नगर अभियंता परमेश्वर हळकुंडे, शाखा अभियंता ऋतुराज यादव, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक रजपूत यांनी पाहणी केली.
शिराळा तालुक्यातील खुजगाव येथे आज जर धरण असते तर जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्याला पाण्यासाठी टाहो फोडावा लागला नसता, अशीच चर्चा सध्या सुरू आहे. परंतु राजारामबापूंच्या खुजगावच्या धरणाला राजकारणाचा डाग लागला आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुके कायमच दुष्काळी राहिले. बापुंचे सुपुत्र जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील 50 हजार एकरावर पाणी पुरवठा मंजूर करून बापुंचा वारसा पुढे चालविला आहे.
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली.
जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात स्व राजारामबापू पाटील यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या कुशल नेतृत्वाखाली त्यांनी सांगली जिल्ह्याचे तर नेतृत्व केलेच परंतु त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातही त्यांनी मानाचे स्थान मिळविले. भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांबरोबरच अनेक नवयुवकांनाही देशासाठी काहीतरी करावे असे वाटू लागले. सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील राजारामबापू पाटील हेही त्यापैकीच एक. हातात तलवारी कट्टे घेउन फिरणार्या वाळवा तालुक्यातील पोरांना जर भविष्यात जर घडवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे राजारामबापुंनी ओळखले आणि वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली.
देश स्वतंत्र झाला होता परंतु अजून राज्याची निर्मिती झाली नव्हती.
त्यावेळी सांगली जिल्हाही अस्तित्वा नव्हता. दक्षिण सातारा हा जिल्हा होता. मुंबई प्रांतात असणार्या या जिल्ह्यातून वसंतदादा पाटील यांनी आपले राजकीय बस्तान बसविण्यास सुरूवात केली होती. 1952 आणि 1957 च्या निवडणुकीत दादांनी विजय मिळविला. बापुंच्या राजकीय जीवनाची सुरूवात 1957 पासून झाली. 1957 मध्ये विधानसभेला पहिल्यांदा त्यांनी अर्ज भरला. या पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 25 फेब्रुवारी 1957 रोजी ही निवडणूक झाली. त्यावेळी वाळवा आणि शिराळा एकच होते.
शिराळा मतदार संघातून राजारामबापू निवडणुकीस उभे होते.
त्यांच्या विरोधात यशवंराव चंद्रू पाटील यांनी राजारामबापूंचा केवळ 796 मतांनी पराभव केला. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे समजून राजारामबापू पुन्हा जोमाने कामाला लागले. गोरगरीबांची सेवा आणि तत्वाचे राजकारण करीत त्यांनी केवळ आपला मतदार संघ न पाहता जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले. सर्वत्र काँग्रेसचे वातावरण होते.
बी. ए. एलएलबी झालेल्या राजारामबापुंना काँग्रेसने 1959 मध्ये प्रदेशाध्यक्ष केले.
पुढे 1960 मध्ये राज्याची निर्मिती झाली. आणि पुढे दोनच वर्षात म्हणजे 1962 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. राजारामबापुंच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकला लढविल्या गेल्या. प्रदेशाध्यक्ष असल्याने बापू राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळली आणि स्वत तर निवडून आलेच पण त्याचबरोबर राज्यात 264 पैकी 215 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. वाळव्यात राजारामबापू पाटील यांनी एन. डी. पाटील यांचा 28756 मतांनी पराभव केला.
पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीमंडळात..!
राज्यात चांगले काम केल्याने राजारामबापुंना मंत्रीमंडळात संधी देण्यात आली. अभ्यासू राजकारणी म्हणून प्रसिद्ध असणार्या राजारामबापुंना या पहिल्याच मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. महसूल, उद्योग, वीज, नागरी पुरवठा सहकार, वन अशा अनेक खात्यांची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. 1962 मध्ये नवीन राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी कठीण होती. याच मंत्रीमंडळात 7 सप्टेंबर 1966 रोजी विधीमंडळात बापुंनी जमीन महसूल विधेयक सादर करताना लँड रेव्हेन्यू कोडमधील दुरस्त्यांची घोषणा केली. या कायद्यान्वये शेतकर्यांना बँकेकडून कर्ज मिळणे सोपे झाले, दुसर्याच्या शेतातून पाणी नेणे सोपे झाले.
या कालावधीपासूनच जिल्ह्यात बापू आणि दादा यांच्यात दुरावा वाढत गेला.
महाराष्ट्र राज्याची ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक. 21 फेब्रुवारी 1967 रोजी या निवडणुका घेण्यात आल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंतदादा पाटील हे असल्याने त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका लढविण्यात आल्या. वाळव्यातून विद्यमान मंत्री राजारामबापू पाटील यांनी ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांचा पुन्हा एकदा 18 हजार 299 मतांनी पराभव केला.
हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
वारसा असूनही… न झालेले आमदार…
राजारामबापूंचा मंत्रीमंडळात दुसर्यांदा समावेश
वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले त्यांनी पुन्हा एकदा राजारामबापू पाटील यांच्या रूपाने सांगली जिल्ह्याला मंत्रीपदाची संधी दिली. राजारामबापू पाटील यांना उद्योग आणि वीज या महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली.
1972 मध्ये राज्याची तिसरी विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत राजारामबापू पाटील यांनी इतिहासच घडविला त्यांनी वसंत शिंदे यांचा 59 हजार 644 मतांनी पराभव केला. राजारामबापुंचे वातावरण संपूर्ण राज्यभर झाले होते. संपूर्ण राज्यात त्यांचा गट तयार होवू लागला. परंतु जिल्ह्यात वसंतदादांच्या रूपाने त्यांच्या विरोधात गट होत होता. त्यातच 1978 मध्ये विधानसभा निवडणुका लागल्या.
खुजगाव येथे धरण व्हावे, अशी बापुंची इच्छा
1957 पासून सुरू झालेले बापुंचे राजकीय जीवन बर्यापैकी जिल्ह्यावर वर्चस्व मिळवले होते. याच काळात दादा आणि बापू वाद वाढत गेला. वारणा नदीवर बांधावयाचे धरण चांदोलीत बांधायचे की खुजगाव येथे बांधायचे यावर मोठा वाद होत होता. शिराळा तालुक्यातील खुजगाव येथे धरण व्हावे, अशी बापुंची इच्छा होती. खुजगावला जर धरण झाले तर पाणलोट क्षेत्र मोठे मिळाले असते. पाण्याचा साठा मोठा मिळाला असता आणि याचा फायदा शिराळा, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, मिरज आणि कराड या तालुक्यांना झाला असता. शिवाय सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यालाही पाणी देता आले असते, अशी भूमिका बापुंनी मांडली होती.
बापुंनी खुजगाव येथे मोठी शेतकरी परिषदही घेतली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा पाठिंबा बापुंना मिळत होता. याचे लोण राज्यभर पसरले आणि दादा बापू वाद राज्यात गाजला. धरण हे चांदोली येथेच बांधायचे हा ठेका वसंतदादांनी सोडला नाही. यशवंतराव चव्हाण यांनही दादांची भूमिका उचलून धरत शेवटी चांदोला धरण बांधायचे नियोजन झाले. जिल्ह्यात दादा आणि बापू असे उघडउघड गट तयार झाले होते. बापुंनी जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी तालुक्यात आपला गट तयार केला होता. दोघेही एकमेकांना पाण्यात बघत होते. राजारामबापूंनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला. राजारामबापुंनी जगजीवनराम यांच्या लोकशाही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. पुढे हा पक्ष जनता पक्षात विलीन झाला. तेथेही बापुंना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.
1978 : राजारामबापुंचा पराभव
राजारामबापुचे वर्चस्व वाढत असतानाच मार्च 1978 मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या. जिल्ह्यात इंदिरा काँग्रेस, रेड्डी काँग्रेस आणि जनता पक्ष अशी तिरंगी लढत झाली. जिल्हयावर नेतृत्व करायचे म्हटल्यावर राजारामबापुंचा पराभव केलाच पाहिजे, या हेतूने त्यांनी सर्वते प्रयत्न केले. राजारामबापुंच्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्यात दादांना यश आले. इस्लामपुरातून एम. डी. पवार यांनीही त्यावेळी मोठे काम केले. एन. डी. पाटील यांनी 22464 मते खाल्ली आणि राजारामबापूंचा केवळ 9 हजार 812 मतांनी पराभव झाला.
सांगली जिल्ह्यात वाळव्याची निवडणूक सर्वात लक्षवेधी ठरली.
येथे राजारामबापुना पराभव करण्यासाठी वसंतदादांनी मोठी खेळी खेळली. आष्ट्याच्या नवख्या विलासराव शिंदेंना काँग्रेसमधून उमेदवारी देण्यात आली. वसंतदादांनी रात्रीचा दिवस केला. अगोदरच तिरंगी होत असलेली ही निवडणूक शेकापच्या एन. डी. पाटील यांच्या उमेदवारीने अधिकच रंगतदार झाली. येथे तीन अपक्ष उमेदवार उमे करण्यात आले. आणि याचाच फटका राजारामबापुंना बसला. काँग्रेसतर्फे विलासराव शिंदे, जनपा पक्षातर्फे राजारामबापू पाटील आणि शेतकरी कामगार पक्षातर्फे शरद पवारांचे मेहुणे एन. डी. पाटील यांच्यात लढत झाली. विलासराव शिंदे यांना 38449, राजारामबापू यांना 28637 तर एन. डी. पाटील यांना 22464 मते मिळाली. नवख्या विलासराव शिंदे यांनी राजारामबापू पाटील यांचा धक्कादायक पराभव केला. बापुंचा पराभव झाला असला तरी बापुंच्या नेतृत्वाखाली राज्यात जनता पक्षाचे 99 आमदार निवडून आले होते.
शरद पवारांच्या मंत्रीमंडळात बापुंना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळाली.
पुढे पुलोदचा प्रयोग झाला झाला आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. शरद पवारांच्या मंत्रीमंडळात बापुंना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळाली. पुढे 17 जानेवारी 1984 रोजी बापुंचे अकाली निधन झाले. बापुंना आपल्या राजकीय आयुष्यात अनेक संघर्ष करावा लागला. परंतु बापुंनी कधी हार मानली नाही. बापुंनी कारखाना, सूतगिरणी, बँक, शिक्षण संस्था स्थापन करून सर्वसामान्य माणसांची जवळीक केली पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्हाच नव्हे तर राज्य पिंजून काढले. पाणीवाला आमदार म्हणून त्यांना संबोधले तर वावगे ठरणार नाही.
बापूंची इच्छा असलेले खुजगाव धरण झाले असते तर आज जत तालुक्यात जी परिस्थिती आहे ही नक्कीच बदलली असती.
आज जत तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका दुष्काळी आहेत. खुजगाव धरणाच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यांना पाणी पुरवता आले असते. येथील दुष्काळी परिस्थिती हटली असती. परंतु नियतीच्या मनात नव्हते. त्यामुळे दुष्काळी भागातील जनता आजही म्हणत आहे की खुजगावला धरण झाले असते तर….

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



