पाऊस, संभाव्य पूरस्थिाती, नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर येत्या 1 जून पासून एकदम तीन महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात 1300हून अधिक दुकानातून या धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास 6 लाखांवर लाभार्थ्यांना एकाचवेळी तीन महिन्याचे धान्य मिळणार आहे. दरम्यान एकदम तीन महिन्याचे धान्य उतरुन घेण्यासाठी धान्य दुकानदारांकडे आवश्यक जागा नसल्याने त्यांनी मात्र चांगलीच गोची झाली आहे.
पाऊस, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, दुकानदारांची मात्र गोची, धान्यासाठी जागा नसल्याचे चित्र
केंद्र सरकारने भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तीन महिन्यांचे रेशनवरील धान्य देण्याची उपाययोजना केली आहे. जिल्हा पुरवठा विभागाला तशा सूचना दिल्या आहेत. पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील 1370 धान्य दुकानदारांना तसे सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्त्र सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवठा केला जातो. सांगली जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या 30 हजार 598 आहे. या कार्डधारकांना महिन्याला 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. त्याचबरोबर जिल्ह्यात 3 लाख 99 हजार 905 प्राधान्य कुटुंब योजना कार्डधारक आहेत.
यातील कार्डधारकांना माणसी 2 किलो गहू, तर 3 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. एकूण 4 लाख 30 हजार 503 शिधापत्रिका धारकांना रेशनवरील धान्याचा लाभ देण्यात येतो. दरम्यान एकाच वेळी तीन महिन्याचे धान्य मिळणार असल्याने लाभार्थ्यांच्यामध्ये मात्र आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर धान्य दुकानदारांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. तीन महिन्याचे धान्य साठा ठेवण्यासाठी दुकानदारांकडे आवश्यक जागा नाही. त्यामुळे करायचे काय असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. यावर पर्याय म्हणून एका महिन्याच्या धान्य वाटपानंतरच दुसर्या महिन्याच्या धान्याचा कोटा द्यावा अशी मागणी दुकानदारांमधून होत आहे.
तालुका लाभार्थी संख्या
सांगली 104588
मिरज 88909
आटपाडी 31533
जत 68309
कडेगाव 31938
खानापूर 40080
कवठेमहांकाळ 31495
पलूस 33862
शिराळा 32212
तासगाव 53046
वाळवा 86371
एकूण 602343

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.