sagreshwar news : सागरेश्वर देवस्थान येथील शिलालेख 898 वर्ष जुना : सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर देवस्थान येथे प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. येथे जवळपास 37 मंदिरे असून 108 शिवलिंगे आहेत. मंदिराच्या आवारात असणार्या अनेक वर्षे अपरिचित राहिलेल्या शिलालेखाची उकल व त्याचे वाचन इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे व अतुल मुळीक यांनी केले. हा शिलालेख 12 व्या शतकातील असून यात कलचुरी बिज्जणदेव द्वितीय याचा महत्वाचा उल्लेख आला आहे. शिलालेख वाचनामुळे सागरेश्वर मंदिराचा सुमारे 898 वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात आला आहे.
sagreshwar news : सागरेश्वर देवस्थान येथील शिलालेख 898 वर्ष जुना
कलचुरी बिज्जल द्वितीय तसेच कर्हाड देशाचा उल्लेख ; मंदिराला दान दिल्याचा संदर्भ
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील श्री सागरेश्वर मंदिराच्या डाव्याभिंतीला लागून कुंडाजवळ दोन शिलालेख आहेत. यामधील एक दुर्बोध झाला असून, दुसरा ही खुप खराब झाला आहे. सदर शिलालेख 87 सेंमी उभा असून 41 सेंमी रुंद आहे. तर 18 सेंमी जाड आहे. शिलालेख एकूण सहा ओळींचा आहे. सर्वात वर सूर्य, चंद्र व शिवपिंडी, नांगर कोरण्यात आली आहे. त्याजवळ देवाचे नाव कोरले आहे. तर सर्वात खाली गाय तसेच राजाचे राज्य चिन्ह तलवार कोरण्यात आलेले आहे.
शिलालेख वाचन
1. क्षनकुर देवर्गे
2. स्वस्ती स्री सकु 1049 पलवंगो
3. संवसरे न ॥ स्री वेज्यानादेव वीजय रज्या
4. कर्हाठ देसी थान असु देस रु॥ मगदी ॥
5. देव दत्त ॥ ग्नोक नं कु मी ताडी जी ॥
6. प क र व देत्व फेडी तेय गढोव बापा
कंसातील वाचन अस्पष्ट व दुर्बोध आहे
शिलालेखाचा अर्थ :
सर्वांत वर ’शंकर देवर्गे’ असा येथील देवाचा उल्लेख आला आहे म्हणजे हे शंकर देवाचे मंदिर आहे व हे दान येथील या देवतेस दिले आहे. त्यानंतर स्वस्ती श्री हे मंगल वचन आलेले आहे. त्यानंतर शके 1049 लवंग संवत्सरे मध्ये बिज्जण देवाचे विजयी राज्य कर्हाट देशावर असताना येथील मंदिराला काही दान दिले आहे. देवाला दिलेले दान जो कोणी फेडेल म्हणजेच अव्हहेर करेल त्याच पिता गाढव असेल. शिलालेख बराच जीर्ण असल्याने काही मजुकुर वाचता येत नाही. वरील शक व संवत्सर हे 15 मार्च 1127 ते 1 मार्च 1128 या काळात होते म्हणजेच हा शिलालेख इ. स. 1127 ते इ. स. 1128 सालातील आहे.
करहाड तसेच कराहाड देश व कलचुरी बिज्जन द्वितीय :
शिलाहार नृपती मारसिंग (इ. स. 1050-1075) हा करहाटपती (करहाट देशाचा अधिपती) होता. त्याने तिची कन्या चंद्रलेखा हीचा स्वयंवर कराड येथेच ठेवला होता. वा. वि. मिराशी यांच्या मते हा स्वयंवर विवाह झाल्यावर लवकरच शिलाहार यांना आपली राजधानी कराडून कोल्हापुरास हलवावी लागली. नंतरच्या काळात करहाट येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि शष्ठ विक्रमादित्यचा मांडलीक कलचुरी जोगम हे काही काळ राज्य करीत होते, असे उल्लेख आढळतात.
या कलचुरी जोगमची मुलगी सावल देवी ही चालुक्य शष्ठ विक्रमादित्य यास दिली होती. तसेच द्वितीय बिज्जल कलचुरी हा जोगम कलचुरीचा नातू आहे. तसेच त्याचे सहावा विक्रमादित्य याच्याशी जवळचे कौटुंबिक संबंध होते. जसे कराड प्रांतावरून जोगम राज्य करत होता, त्याचप्रमाणे पुढे चालून त्याचा नातू व चालुक्यांचा संबंधित नातेवाईक म्हणून बिज्जन द्वितीय हा या प्रांतावरून राज्यकारभार करत असावा. हे या इ. स. 1127 च्या देवराष्ट्रे शिलालेखातून स्पष्ट होते.
बिज्जन हा चालुक्यांचा सेनापती तर होताच तसेच प्रचंड शक्तिशाली मांडलीक पण होता. त्याने वेळोवेळी बंड पुकारल्याचे दिसते. त्यातच या शिलालेखात त्याचे हे विजयी राज्य असल्याचे म्हटले आहे. यावरून त्याच्या चक्रवर्ती होण्यासाठीच्या प्रबळ इच्छा दिसून येतात. ’तृतीय सोमेश्वरच्या काळातच कराड 4000 चा राज्यकारभार पाहत असलेला चालुक्यांचा सामंत असलेला बिज्जल कलचुरी हा हळूहळू आपले प्रस्थ वाढवत होता. असा संदर्भ सातारा गॅझेटमध्ये देण्यात आला आहे.
sagreshwar-news-inscription-at-sagareshwar-temple-is-898-years-old
कलचुरी बिज्जन द्वितीय याच्या कारकिर्दीतील पहिला शिलालेख
कलचुरी बिज्जन द्वितीयचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अनेक शिलालेख सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील औराद येथे आढळलेला सोमेश्वर तृतीय याच्या कारकीर्दीतील नवव्या राज्यवर्षी इ. स. 1135 मध्ये महामंडलेश्वर कलचुरी बिज्जन द्वितीय त्याचा अधिकारी याने अनेक विजय कालीन राज्यांवर मिळवल्याचे उल्लेख मिळतात. तसेच इ. स. 1142 च्या एका शिलालेखावरून बिज्जन करहाटक 4000 या विभागावरून राज्य करत असल्याचे सांगितले आहे.
पूर्वी सापडलेल्या शिलालेखाच्या अगोदरच या देवराष्ट्रे शिलालेखावरून कलचुरी बिज्जन द्वितीय हा कराड प्रांतावरून इ. स. 1127 सालापूर्वीच राज्य करत होता हे स्पष्ट होते. तसेच शिलालेख नमूद केलेल्या काळात तृतीय सोमेश्वर कराड 4000 चा राज्यकारभार बघत होता. पण सोमेश्वराचा सामंत कलचुरी बिज्जन द्वितीय स्वतःचे राज्य म्हणत असल्याने त्याच्या कारकिर्दीतला पहिला शिलालेख तसेच त्याची महत्त्वाकांक्षा दर्शविणारा महत्वपूर्ण असा सागरेश्वर शिलालेख म्हणावा लागेल. अशी माहिती इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे व अतुल मुळीक यांनी दिली.
शिलालेख वाचनासाठी विक्रांत मंडपे तसेच राजेश जाधव, देवस्थानचे सागर गुरव, प्रा. अरुण घोडके, हर्षल केसरकर यांचे सहकार्य लाभले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



