तीन वर्षात ठेवी, कर्जे व एनपीए कमी केल्याच्या कामाची पोहोच ः मानसिंगराव नाईक
जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेकडून दहा नवीन शाखांना मंजुरी दिली आहे. तब्बल पंचवीस वर्षानंतर परवानगी मिळाली आहे. याशिवाय आणखी 15 शाखा विस्तारासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे ेअध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात केलेल्या ठेवी, कर्जे, एनपीए कमी करण्यांसह विविध पातळ्यांवर चांगल्या कामाची पोहोच मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष नाईक म्हणाले, जिल्हा बँकेने शाखांसाठी एक वर्षापुर्वी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव दाखल केला होता. रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषात बँक पात्र ठरली आहे. तब्बल 25 वर्षानंतर म्हणजे 18 जुलै 2001 नंतर प्रथमच शाखा विस्तारण्यास परवानगी दिली आहे. नव्या शाखांमध्ये मल्लेवाडी (मिरज), कुकटोळी (कवठेमहांकाळ), गुड्डापूर (जत), ढवळी (तासगाव), बनपूरी (आटपाडी), बलवडी-भाळवणी (खानापूर), शिरगाव (वाळवा), तुपारी फाटा (पलूस), हणमंतवडीये (कडेगाव), येळापूर (शिराळा) या दहा शाखांचा समावेश आहे. या शाखांसाठी जागांचा शोध सुरु आहे. येत्या तीन महिन्यात शाखांना रिझर्व्ह बँक अधिकृत परवाना क्रमांक देईल. त्यानंतर कामकाज सुरु केले जाईल.
नवीन दहा गावात शाखांमुळे गावात सुविधा वाढण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील गावांसह ज्या गावात कोणत्याही बँकेची शाखा नाही. अशा गावांत शाखा सुरु करण्यास आम्ही प्राधान्य देणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील लोकांची सोय, ठेवी आणि कर्जे विस्तारासाठी संधी असलेल्या ठिकाणची निवड केली आहे. नव्या 15 शाखांसाठी अश्याच ठिकाणीच्या निवडी केल्या जातील. उदाहरणार्थ भाटवाडी (वाळवा), काळुद्रे (शिराळा) अशा गावांचा समावेश असेल, असेही अध्यक्ष नाईक यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ म्हणाले, वर्षाअखेरीस 225 कोटी रुपये ढोबळ नफ्याचे उद्दिष्ट आहे. सध्या कर्जवसुलीला प्रतिसाद मिळतो आहे. कर्जमाफीतून शेतकरी आता बाहेर पडताहेत. सध्या 8 हजार कोटी ठेवी आहेत. कर्जे 7 हजार 150 कोटी वाटप झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा 500 कोटींनी ठेवी वाढल्या असून आणखी दोन महिन्यांत मोठी ठेववाढ अपेक्षीत आहे. उर्वरित दोन महिन्यात 350 कोटी रुपये कर्ज वाटपाचेही उद्दिष्ट आहे. सर्वसाधारण मार्चअखेर 17 हजार कोटीचा व्यवसाय होईल.
शाखा विस्तारास उपाध्यक्षांसह सर्व संचालकांचे योगदान
मागील तीन वर्षात केलेल्या ठेवी, कर्जे, एनपीए कमी करण्यांसह विविध पातळ्यांवर चांगले काम करण्यासाठी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्यासह सर्व संचालकांनी प्रयत्न केला, त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने नवीन शाखांना परवानगी दिल्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



