महायुतीच्या घटक पक्षांना सोबत घेणार, जुन्या-नव्यांचा मेळ घालणार
sangli bjp news : मिशन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी चंद्रकांतदादा मोट बांधणार : राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला. सांगलीकरांच्या अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटील यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागली. येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका तसेच नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. 2017 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे भाजपला यश मिळवायचे असेल भाजपमधील अलबेलपणा कमी नव्या-जुन्यांचा मेळा पालकमंत्री चंद्रकांतदादा घालावा लागणार आहे. निवडणुकांना सामोरे जाताना महायुतीतील घटक पक्ष असलेले एकनाश शिंदे शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेवून महायुतीचा झेंडा फडकवावा लागणार असल्याचे चित्र दिसून येते.
sangli bjp news : मिशन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी चंद्रकांतदादा मोट बांधणार
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने चांगलेच यश मिळवले. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक पाच जागा महायुतीने बाजी मारली. तर महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळाल्या. चार ठिकाणी विजय मिळवत भाजप जिल्ह्यातील मोठा पक्ष ठरला. सांगली, मिरजेबरोबरच शिराळा आणि जत विधानसभा भाजपने मिळवली. शिवसेना शिंदे गटाने आपली एकुलती एक जागा कायम राखली. 2014 मध्येही जिल्ह्यात भाजप चार आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला होता, त्याची पुनर्रावृत्ती 2024 मध्ये झालेली पहायला मिळाली.

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातून मंत्रिपद मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच झाले.
माजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुहास बाबर यांच्याबाबत उत्सुकता होती, जिल्ह्याला एकही मंत्री पद मिळाले नाही. त्याचवेळी परजिल्ह्यातील पालकमंत्री मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले होते, त्यावेळीही जिल्ह्यातील एकही मंत्री नसल्याने सुरुवातीला चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले होते. त्याची पुनरावृत्ती होत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पद चंद्रकांतदादा यांच्याकडे आले.
येत्या काही कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि तालुकास्तरीय नेत्यांची मोट पुन्हा बांधावी लागणार आहे. जिल्हास्तरावरुन सर्व नेत्यांना घेवून जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र आमदार खाडे, गाडगीळ, पडळकर आणि देशमुख या चौघांना बालेकिल्ल्यातील संस्था टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागेल. परंतु जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न झाला होता, त्याचे उत्तर चंद्रकांदादांच्या रुपाने जिल्ह्याला मिळाले.

महायुतीची एकहाती सत्ता आल्याने आगामी निवडणुकीसाठी फिलगुड असल्याचे दिसून येते.
2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना सांगली जिल्ह्याची जबाबदारी चंद्रकांतदादांच्याकडे आली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना भाजपमधील आव्हाने दूर करावी लागतील.
दीड वर्षापूर्वी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इस्लामपूरचे निशिकांत पाटील यांची शहर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश ढंग यांची वर्णी लागली.
दोन्ही जिल्हाध्यक्षांनाही मोट बांधता आलेली नाही. निशिकांत पाटील व माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे-म्हैसाळकर हे काम करीत आहेत. मात्र जिल्हा नेतृत्व करण्यात यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे चंद्रकांतदादांना जुने आणि नव्यांचा मेळ घालून रणनिती आखावी लागेल.
महायुतीत एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.
शिंदे गटाचे एकमेव आमदार आहेत, मात्र त्यांची ताकद खानापूर मतदारसंघात आहे. अन्यत्र शिंदे गटाची ताकद नगण्य असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. अजितदादा राष्ट्रवादीकडे बडे नेते नाहीत. मात्र माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना विधानपरिषदेला संधी दिली आहे. त्यामुळे त्यांचा एक आमदार आहे. विधानसभेला अजितदादांनी दोन जागा लढविल्या. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले निशिकांत पाटील यांनी निवडणूक लढवली, जयंतरावांना त्यांनी चांगलीचे टक्कर दिली. परंतु स्वतःच्या चुकांमुळे विजयापर्यंत पोहोचता आले नाही.
भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव स्वीकारावा लागला. हे दोन्ही नेते अजितदादा गटात राहणार की भाजपमध्ये सक्रिय होणार हे पहावे लागणार आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील हे जिल्ह्यात नेतृत्व करताना महायुतीची मोट कशा पद्धतीने बांधणार याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
जिल्हा भाजपमध्ये एकमुखी नेतृत्वाचा अभाव
जिल्हा भाजपमध्ये सद्यस्थितीत एकमुखी नेतृत्वाचा अभाव आहे. या परिस्थितीत चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पुन्हा सांगलीचे पालकमंत्री आले आहे. येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. चंद्रकांतदादांची जिल्ह्यातील भाजप नेत्यांवर कमांड आहे. भाजपच्या बांधणीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादांच्या नेतृत्वामुळे महायुतीची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



