जनप्रवास । सांगली
SANGLI : शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी काँग्रेसने अडविली पालकमंत्र्यांची गाडी शिवसेनेच्या खासदार आंदोलनात: शासनाला घरचा आहेर : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग स्थगित न करता तो रद्दच करावा, या मागणीसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडवली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी शेतकर्यांनी पालकमंत्र्यांकडे केली, दरम्यान, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. तर परमेश्वराच्या नावावर कोणी नांगर फिरवत असेल तर गप्प बसणार नाही, असा घरचा आहेर देखील त्यांनी दिला.
SANGLI : शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी काँग्रेसने अडविली पालकमंत्र्यांची गाडी शिवसेनेच्या खासदार आंदोलनात: शासनाला घरचा आहेर
SANGLI : शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी काँग्रेसने अडविली पालकमंत्र्यांची गाडी शिवसेनेच्या खासदार आंदोलनात: शासनाला घरचा आहेर :नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावातून जातो. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार हेक्टर या महामार्गाने बाधीत होत आहे. 2013 च्या जमिन अधिग्रहण कायद्यानुसार रेडिरेकनरच्या चारपट मोबदला मिळू शकतो. पण सध्याच्या बाजारभावात खूप फरक आहे. शिवाय तासगाव, कवठेमहांकाळ व आटपाडी या तालुक्यात सिंचन योजना आलीकडेच पुर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकर्यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या आहेत. पण या महामार्गामुळे शेतकरी भूमीहिन होणार आहेत.
तसेच मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे.
या महामार्गासाठी कर्नाळ पासुन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणी वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही, आणी दुर्दैवाने महापुर आलाच तर सांगली शहर व परिसरातील गावांना मोठा फटका बसणार आहे.त्यामुळे या महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले.
जिल्हा नियोजन समितीसाठी येत असलेले पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी आंदोलकांनी आडवली.
यावेळी पोलीस आंदोलकांमध्ये वाद झाला. पण ना. खाडे यांनी गाडीतून उतरून आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. आंदोलकांनी शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती नव्हे तर रद्द करावा, अशी मागणी केली. आ. विश्वजीत कदम म्हणाले, नागपूर-गोवा महामार्ग प्रकल्प 85 हजार कोटींचा आहे. इतका मोठा प्रकल्प राज्यात करताना शेतकर्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र शेतकर्यांच्या भावाना विश्वासात घेतल्या गेल्या नाहीत. या महामार्गाने बाधीत होणार्या शेतकर्यांचे कुटुंब शेतीवर चालते. महामार्गात जमिनी गेल्या तर त्यांच्या कुटुंबियावर घाला घालण्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
खासदार विशाल पाटील म्हणाले, नागपूर-गोवा महामार्गाची गरज नाही.
तरी देखील हा महागार्ग केला जात आहे. जिल्ह्यातील शेती पिकाऊ आहे. ऊस, डाळींब, द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत. महामार्गात या जमिनी गेल्या तर शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली. तर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, नागपूर-गोवा महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या मार्गाला स्थगिती देऊ नये हा महामार्ग रद्दच करावा. जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, आ. अरूण लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, महामार्ग शेती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर, उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, प्रभाकर तोडकर, भूषण गुरव, प्रविण पाटील, उमेश एडके, विष्णू पाटील, यशवंत हरूगडे, संग्राम पाटील, सुनील पवार, घनश्याम नलावडे आदी सहभागी झाले होते.
परमेश्वराच्या नावावर शेतकर्यांवर नांगर नको: धैर्यशील माने
काँग्रेसच्या आंदोलनात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने सहभागी झाले होते. त्यांनी महायुती शासनाला घरचा आहेर दिला. शक्तीपीठ महामार्ग हा शक्ती वाढविणार आहे की शक्ती काढून घेणार आहे हेच कळत नाही. परमेश्वराच्या नावावर कोण नांगर फिरवायच काम करत असेल तर त्यांना देव देखील माफ करणार नाही. आम्ही शेतकर्यांसोबत आहोत.
शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहे. शक्तीपिठाच्या नावाखाली सरकारकडून नवा घाट घातला जात असल्याचा आरोप करत धैर्यशील माने यांनी केला. राम मंदिर बांधण्यात आले. परंतु या मंदिरासाठी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग करण्याची गरज आहे का? देवस्थानाकडे येण्यासाठी महामार्ग नव्याने करण्याची गरज नाही. मी आणि खासदार विशाल पाटील आम्ही दोघेही तरुण खासदार असून दोघेही या शक्तीपीठ महामार्गात विरोधात लोकसभेत आवाज उठवू, असा इशारा देखील खा. माने यांनी दिला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



