महापालिका क्षेत्रात काँग्रेस होणार खिळखिळी
sangli congress news : जयश्रीताई राष्ट्रवादी तर पृथ्वीराज पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षांनी तयारी सुरू केली असताना काँग्रेसमध्ये मात्र शांतता आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस बाहेर आली नाही. आता मनपाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दोघांचे प्रवेश झाल्यास मनपा क्षेत्रात काँग्रेस खिळखिळी होणार आहे.
sangli congress news : जयश्रीताई राष्ट्रवादी तर पृथ्वीराज पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात पार पडल्या. या निवडणुकीत दहा वर्षे भाजपच्या ताब्यात गेलेला काँग्रेसचा गड पुन्हा खा. विशाल पाटील यांनी खेचला. त्यामध्ये काँग्रेस व भाजपमधील काही बंडखोर नेत्यांनी साथ दिली. या विजयामुळे विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या मोठ्या आशा वाढल्या होत्या. पलूस-कडेगाव व जत विधानसभा मतदारसंघाबरोबर सांगली व मिरजेचा गड काँग्रेसला मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेसप्रेमींना होती. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिरजेची जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली आणि तिथेच काँग्रेसची पण जागा केली. तर दुसरीकडे सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाल्याने काँग्रेसचा पराभव झाला. हक्काची असणारी जत विधानसभेची जागा देखील भाजपने खेचली. त्यामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठी नामुष्की पत्करावी लागली होती.
विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत.
यामध्ये महापालिका ही जिल्ह्यातील महत्वाची संस्था आहे. या संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी भाजप व काँग्रेसमध्ये सामना होता, पण आता तशी परिस्थिती असल्याचे दिसून येत नाही. भाजपने विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. महापालिकात क्षेत्रात देखील भाजपचे दोन आमदार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीनंतर कोमात गेल्याचे चित्र आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांना मिळाली होती, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली.
हेही वाचा
महापालिकेच्या निवडणुकीसाठी विशाल पाटलांची पेरणी
यामध्ये भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी हॅट्ट्रिक साधली. तर आ. सुरेश खाडे चौथ्यांदा आमदार झाले अहेत.
आता महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व जयश्री पाटील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
काँग्रेसमधून निलंबित केलेल्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची ताकद मनपा क्षेत्रात मोठी आहे. मदनभाऊ गट महापालिका क्षेत्रात सक्रीय आहे. पण काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने व पक्षातून निलंबित केल्याने जयश्रीताई पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार यांची भेट देखील घेतली होती.
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करावा, अशी विनंती अजित पवार यांनी जयश्री पाटील यांना केली आहे. त्यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय हा मदनभाऊ पाटील गटाची बैठक घेऊन करणार असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात पंधरा दिवसात भाऊ गटाची बैठक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्र्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय अंतिम होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या महिन्यापासून त्यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर सलगी वाढवली आहे. प्रदेश पातळीवर देखील त्यांच्या चर्चा सुरू आहेत. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका बडा नेता त्यांच्या भाजप प्रवेशासाठी मध्यस्ती करत असल्याचे वृत्त आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज पाटील यांची भेट घेतली होती. स्नेहभोजन देखील झाले होते. यावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची विनंती आ. पडळकर यांनी पाटील यांना केली होती.
त्यानंतर पृथ्वीराज पाटील यांच्या एका खासगी कार्यक्रमाला भाजप शिराळ्याचे आमदार सत्यजीत देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी देखील पृथ्वीराज पाटील यांनी आता भाजपमध्ये यावे, अशी साद घातली होती. पृथ्वीराज पाटील यांनी भाजप नेत्यांबरोबर सलगी वाढविल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या दोघांची समजूत काढण्यात ते यशस्वी होणार का?
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस सोडली तर मनपा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. यांना मानणारा गट देखील काँग्रेसपासून बाजुला जाणार आहे. त्यामुळे येणार्या महिन्यात मोठ्या घडामोडी पहायला मिळणार आहेत. काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी प्रतिष्ठा देखील पणाला लागणार आहे. या दोघांची समजूत काढण्यात ते यशस्वी होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



