चार अल्पवयीन ताब्यात :
sangli crime news : भाईगिरीची क्रेझ डोक्यात गेलेल्या अल्पवयीन मुलांकडून सांगलीत खून सांगली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भरदिवसा पन्नास रुपयांच्या क्षुल्लक कारणावरून शाळकरी मुलांनी मोबाईल दुकानातील कार्मगारांची निर्घृण हत्या केली. शंभर रुपयांचे मोबाईल स्क्रीन गार्ड पन्नास रुपयात देण्याच्या वादातून खून केल्याचा खळबळजनक प्रकार सांगली बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर घडला.
sangli crime news : भाईगिरीची क्रेझ डोक्यात गेलेल्या अल्पवयीन मुलांकडून सांगलीत खून
विपुलपुरी गोपालपुरी गोस्वामी (वय 19, रा. बापट बाल शाळेनजीक, सांगली. मूळ रा. सिवाडा, राज्य – राजस्थान) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. शहर पोलिसांनी तातडीने चार तासाच्या आत संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मावस भाऊ स्वरुपपुरी गोपालपुरी गोस्वामी याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी स्वरुपकुमार आणि विपुलपुरी गोस्वामी हे दोघे बसस्थानकानजीक असणारे भैरवनाथ मोबाईल शॉपी नावाचे दुकान चालवित होते. रविवारी दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास चौघेजण त्यांच्या दुकानात आले. त्यापैकी एकाच्या मोबाईलला स्क्रॅचगार्ड बसवायचे होते. दुकानातील विपुलपुरी याने त्याकरिता 100 रुपये किंमत सांगितली असता संशयिताने पन्नास रुपयात स्क्रॅचगार्ड बसवून देण्याची मागणी केली.
यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. त्यातून चौघांनी विपुलपुरी याला लाथाबुक्कयांनी मारहाण केली. तसेच अन्य तिघांनी विपुलपुरी याला पकडले तर एका संशयिताने त्याच्याकडील कोयत्याने विपुलपुरीच्या डोक्यात, हात आणि कपाळावर सपासप वार केले. यामध्ये विपुलपुरी खाली कोसळताच दुसर्या संशयिताने पाईपमध्ये लपविलेल्या चाकूच्या सहाय्याने त्याला भोसकले. भाऊ विपुलपुरी याला वाचविण्यासाठी आलेल्या स्वरुपपुरी याला देखील संशयितांनी लाथाबुक्कयांनी मारहाण करुन कोयत्याने वार केले. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक गोळा झाल्याचे लक्षात येताच कोयत्याचा धाक दाखवित हल्लेखोर तेथून पसार झाले. दरम्यान, प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने विपुलपुरी गोस्वामी बेशुध्द पडला होता.
उपस्थितांनी तातडीने दोघा जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी विपुलपुरी याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गजबजलेल्या ठिकाणी भरदिवसा खून झाल्याचे कळताच परिसरात खळबळ उडाली. शहर पोलिसांना याची माहिती मिळताच काही वेळातच पोलीस निरिक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरिक्षक महादेव पोवार यांच्यासह पोलीस कर्मचार्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तसेच परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी करुन हल्लेखोरांच्या शोधार्थ पथक रवाना केला. अवघ्या चार तासानंतर पोलिसांनी बायपास रस्ता नवीन पुलाजवळ लपलेल्या हल्लेखोरांना ताब्यात घेतले. हल्लेखोरांकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि चाकू हस्तगत करण्यात आला आहे.
भाईगिरीची क्रेझ, घाटावर कोयता घेऊन काढले रिल्स…
संशयित अल्पवयीन मुलांनी सकाळी कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या माई घाट परिसरात हातात कोयता घेऊन रिल्स काढले. भाईगिरीची क्रेझ डोक्यात गेलेल्या मैसूरडेही न फुटलेल्या मुलांच्या डोक्यात हवा गेली होती. स्वतःजवळ हत्यारे घेऊन फिरण्याची सवय त्यांना लागली. रिल्स काढल्यानंतर स्टॅन्ड परिसरात त्यांनी नाष्टा केला. यानंतर एकाच्या मोबाईलला स्क्रीन गार्ड बसवण्यासाठी ते भैरवनाथ मोबाईल शॉपी मध्ये गेले. यावेळी या अल्पवयीन मुलांनी कमी पैशात स्क्रीनगार्ड देण्यासाठी दाब दाखवला. यातून वाद झाल्याने स्वतः जवळ असलेल्या कोयता आणि चाकूने विपुलपुरी याचा वार करून खून केल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.
पुन्हा अल्पवयीन गुन्हेगार…
मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत चालला आहे. अल्पवयीन गुन्ह्यात सहभागी असल्याने त्यांना शिक्षा देखील फारशी होत नाही. रविवारी देखील बसस्थानक परिसरात झालेल्या खून प्रकरणात चौघे अल्पवयीन असल्याचे समोर आहे. एवढ्या लहान वयात त्यांच्याकडे चाकू आणि कोयता ही हत्यारे कशी आली ? असा प्रश्न पोलिसांसह नागरिकांनाही पडला आहे. यापूर्वी संशयितांवर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.