sangli crime news : घरगुती सिलेंडरच्या स्फोटाने सांगलीतील गावभाग हादरला : दहा ते बारा अपार्टमेंटच्या खिडक्यांना तडे. : सांगली : शहरातील गावभाग परिसर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमाराच्या घरगुती सिलिंडरच्या स्फोटाने हादरला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या दहा ते बारा अपार्टमेंटमधील खिडक्याच्या काचांचा चक्काचूर झाला तर दोन कारच्या काचानाही तडे गेले. अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिक, महिला, तरुण रस्त्यावर धावत सुटले होते. स्फोटाचा आवाज अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते.
sangli crime news : घरगुती सिलेंडरच्या स्फोटाने सांगलीतील गावभाग हादरला : दहा ते बारा अपार्टमेंटच्या खिडक्यांना तडे.
या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाचे जवान, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जीवीतहानी झालेली नाही. एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील प्लॅटमध्ये स्फोटाची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावभाग परिसरात बावडेकर वाडाजवळ स्वकुल अपार्टमेंट आहे. त्याच्याच पाठीमागील बाजूला असलेल्या अपार्टमेंटमध्ये रवींद्र गोडसे हे पत्नी व मुलासह राहतात. गोडसे यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. गेली 20 वर्षे ते हा व्यवसाय करतात. त्यामुळे घरात केटरिंगसाठी लागणारी भांडी, ताटे, गॅस सिलिंडर असे साहित्य होते.
रविवारी सकाळी गोडसे दाम्पत्य कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यांनी प्लॅट बंद केला होता. सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अचानक त्यांच्या प्लॅटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणादणू गेला. नेमके काय घडले, आवाज कोठून आला, हेच लोकांना कळले नाही. नागरिक, महिला, तरुण घरातून बाहेर पडून रस्त्यावर धावत सुटले. आसपासच्या दोन ते तीन गल्ल्या स्फोटाच्या आवाजाने हादरल्या होत्या.
गोडसे यांच्या प्लॅटचे मोठे नुकसान झाले. घरातील भांडीकुंडी अस्तव्यस्त पडली होती. प्लॅटचा बाहेरील दरवाजा, आतील दरवाजा मोडून पडला होता. दोन्ही बाजूच्या खिडक्याचे लोखंडी ग्रील उडून तीन ते चार फुट बाहेर गेले होते. प्लॅटच्या बाहेर दोन पाण्याच्या टाक्याही फुटल्या होत्या. जेवणाचे प्लॅस्टिक प्लेटा घरातून उडून आजूच्या बोळात पडल्या होत्या. आजूबाजूला काचाच खच पडला होता. आजूबाजूच्या दहा ते बारा अपार्टमेंटमधील खिडक्या काचा फुटल्या.
शेजारीच्या अपार्टमेंटमध्ये पार्क केलेल्या दोन चारचाकी वाहनाच्या काचाला तडे गेले. गोडसेच्या फ्लॅट शेजारीच राहणार्या वयोवृद्ध महिलेच्या घरातील काचाही फुटल्या होत्या. त्या बेडवरून दोन ते तीन फुट उंच उडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इतका स्फोटाचा आवाज मोठा होता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेतली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते.
केवळ नशीब बलवत्तर म्हणून…
राजेंद्र गोडसे यांचा केटरिंगचा व्यवसाय. घरात चार सिलिंडर. त्यापैकी दोन सिलिंडर भरलेले तर एक रिकामा. तर चौथा सिलिंडर अर्धा होता. चारपैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटापूर्वीच दोन तास गोडसे, त्यांची पत्नी व मुलगा घराला कुलुप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे या घटनेत जीवीतहानी झाली नाही. स्फोटाची तीव्रता पाहता केवळ नशीब बलवत्तर होते, म्हणून गोडसे कुटूंब या संकटातून वाचले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.