rajkiyalive

SANGLI : दादा, जनतेने दिली संधी पण विकासासाठी प्रयत्न आवश्यक

जनप्रवास । सांगली

SANGLI : दादा, जनतेने दिली संधी पण विकासासाठी प्रयत्न आवश्यक : सांगली लोकसभा मतदारसंघात जनतेने भाजपचे संजयकाका पाटील यांची हॅट्ट्रिक रोखून दहा वर्षानंतर पुन्हा दादा घराण्यावर विश्वास टाकला. विशाल पाटील यांना खासदारकीची संधी बहाल करत विकासाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे नूतन खासदार विशाल पाटील यांना दुष्काळी तालुक्यातील सिंचना योजना, जत तालुक्यातील पाणी प्रश्न, कवलापूर विमानतळ, एमआयडीसी, ड्रायपोर्ट, महापूर, शहराला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग आदी प्रश्नांना वाचा फोडणे आवश्यक आहे. याबरोबर जनसंपर्क देखील महत्वाचा असणार आहे.

SANGLI : दादा, जनतेने दिली संधी पण विकासासाठी प्रयत्न आवश्यक

विमानतळ, दुष्काळ, महापूर, एमआयडी, राष्ट्रीय महामार्ग हवे

सांगली लोकसभा मतदारसंघ वसंतदादा घराण्याचा बालेकिल्ला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा भाजपचे संजयकाका पाटील यांनी पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत विशाल पाटील यांनी भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण वंचित बहुजन आघाडीच्या फॉर्म्युल्यामुळे विशाल पाटील यांचा पराभव झाला आणि संजयकाका पाटील दुसर्‍यांदा निवडून आले.

SANGLI : दादा, जनतेने दिली संधी पण विकासासाठी प्रयत्न आवश्यक : दादा घराण्यावर असलेली नाराजी जनतेने 2014 व 2019 मध्ये दाखवली. 2024 ची निवडणुकीत संजयकाका पाटील यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. मात्र विकासकामांचा अपेक्षाभंग, संपर्क कमी असल्याने जनतेने त्यांना नाकारले. काँग्रेसकडून उमेदवारी नाकारलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जनतेने साथ दिली. जनतेने विशाल पाटील यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. गेल्या दहा वर्षात प्रलंबित असलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

कवलापूर विमानतळाचा मुद्दा गेल्या तीन वर्षांपासून चांगलाच गाजला. 160 एकर जागा असलेल्या कवलापुरला विमानतळ मंजूर होत नाही. या संदर्भात दिल्ली दरबारी पाठपुरावा केला जात नव्हता. आता नूतन खासदार विशाल पाटील यांना यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. शेतकर्‍यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी ड्रायपोर्ट देखील आवश्यक आहे. 2019 च्या निवडणुकीत सांगलीला ड्रायपोर्ट मंजूर झाल्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र ड्रायपोर्टचा पोपट मेला होता. नागरिक जागृती मंचच्यावतीने माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागिवली होती. त्यामध्ये सांगलीला ड्रायपोर्ट मंजूर करता येत नसल्याचे सांगितले होते. नूतन खासदारांनी आता ड्रायपोर्टसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय महामार्गाशी सांगलीची कनेक्टव्हिटी आवश्यक आहे. नव्याने काही राष्ट्रीय महामार्ग मंजूर करणे आवश्यक आहे. तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. सांगली जिल्ह्यात शेतीला वरदान ठरणार्‍या सिंचन योजनेची कामे अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. जत तालुक्यातील चाळीस गावांचा पाणीप्रश्न गंभीर आहे. यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून या गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सांगली शहरात महत्वाचा प्रश्न आहे तो शेरीनाल्याचा. शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याने कृष्णा प्रदूषित झाली आहे. त्यामुळे सांडपाण्याचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

महापुराचा फटका कृष्णा नदी काठच्या गावांना बसतो. लाखो रूपयांचे नुकसान होतो. यासाठी नव्याने पूरसंरक्षण भिंत आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सांगली व कुपवाड शहराला पिण्यासाठी वारणा नदी किंवा चांदोली धरणातून पाणी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून योजना मंजूर करणे आवश्यक आहे. सांगलीत नव्याने एमआयडी मंजूर करून तरूणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एमआयडीसीचे अनेकवेळा प्रयत्न झाले, पण एमआयडीसी मंजूर झाली नाही. त्यामुळे सांगलीतील अनेक जण पुणे, मुंबईसाठी नोकरीला जात आहेत. सांगलीत एमआयडीसी झाल्यास स्थानिकांना रोजगार देखील मिळेल.

सांगलीतील महत्वाचे काही प्रश्न…
* कवलापूर विमानतळ मंजूर करणे
* नवी एमआयडी मंजूर करून तरूणांच्या हाताला काम देणे
* अपुर्‍या सिंचन योजनेसाठी शासनाकडून निधीचा पाठपुरावा
* जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसणे
* ड्रायपोर्ट, नवे राष्ट्रीय महामार्ग मंजूर सांगलीतून जाण्यासाठी प्रयत्न
* शहरासाठी वारणा उद्भव अथवा चांदोली धरणातून पाणी
* शेरीनाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी प्रकल्प

 

‘विश्वविशाल’ एकी आवश्यक; पाय हवेत जमिनीवरच

आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील यांनी ही निवडणूक लढवली, उमेदवारी मागणीपासून ते विजयी गुलालपर्यंत त्यांनी आ. कदम यांचे नेतृत्व स्वीकारले. त्याचा फायदा त्यांना झाला. पलूस-कडेगावमध्ये मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे भविष्यात ‘विश्वविशाल’ अशी एकी राहणे आवश्यक आहे. तर या निवडणुकीत विशाल पाटील यांनी शांतता व संयम राखला. आतून एक बाहेर एक असा प्रकार यावेळी झाला नाही. त्यामुळे खासदार विशाल पाटील यांनी आपला स्वभाव असाच ठेवायला हवा, पाय जमिनीवर राहिले तर पुढची निवडणूक देखील त्यांना सोपी जाईल व विकासाला इतरांचा हातभार लाभेल.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज