महाविकास आघाडीत मिरज व खानापूर-आटपाडीत ताणाताणी
जनप्रवास । सांगली
sangli election news : सहा विधानसभेचे जागा वाटप निश्चित : महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे. मिरज व खानापूर-आटपाडीचा वाद अद्याप मिटलेला नाही. मिरजेच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) यांच्यात तर खानापूर-आटपाडीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) यांच्यात ताणाताणी सुरू आहे. या दोन विधानसभा मतदारसंघातील जागा वाटपावर दोन दिवसात तोडगा निघण्याची शक्यता आहे.
sangli election news : सहा विधानसभेचे जागा वाटप निश्चित
राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून पक्ष नेत्यांच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) हे प्रमुख पक्ष महायुती करून निवडणूक लढणार आहेत. तर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) यांची महाविकास आघाडी आहे. जिल्ह्यात नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जागा वाटपासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या दिल्ली व मुंबई वार्या सुरू आहेत. अद्याप अधिकृत जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही.

सांगली जिल्ह्यातील सहा जागांचा निर्णय झाला आहे.
यामध्ये पलूस-कडेगाव, जत व सांगली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे कायम आहेत. पलूस-कडेगावमध्ये आ. विश्वजीत कदम तर जतमधून आ. विक्रमसिंह सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे. पण सांगलीचा निर्णय अद्याप झालेला नाही. या ठिकाणी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात चुरस आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे तासगाव-कवठेमहांकाळ, इस्लामपूर व शिराळा हे तीन मतदारसंघ आहेत. इस्लामपुरमधून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, शिराळ्यातून आ. मानसिंगराव नाईक व तासगाव-कवठेमहांकाळमधून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे.
मिरज व खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये ताणाताणी सुरू आहे.
मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षाने मागितला आहे. भाजपचे मोहन वनखंडे यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बाळासाहेब होनमारे तर शिवसेना (उबाठा) गटाकडून सिध्दार्थ जाधव इच्छूक आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केल्याने महाविकास आघाडीत ताणाताणी सुरू आहे.

तर खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षाने या मतदारसंघात दावा केला आहे. उबाठाकडे या मतदारसंघ तुल्यबळ उमेदवार नाही. महायुतीचे रोहित बाबर यांना तोड देण्यासाठी वैभव पाटील व राजेंद्रअण्णा देशमुख हे दोन उमेदवार आहेत. मात्र ते उबाठाकडून लढण्यास इच्छूक नाहीत. त्यांनी शरद पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पण शिवसेना (उबाठा) ला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही तर सर्वपक्षीय राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खानापूर-आटपाडी किंवा मिरज यापैकी एका जागेचा हट्ट त्यांच्याकडून सुरू आहे. या वादात दोन्ही मतदारसंघाचा निर्णय अद्याप झालेला नाही.
निश्चित झालेले जागा वाटप
* राष्ट्रवादी शरद पवार पक्ष- इस्लामपूर, शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ
* काँग्रेस- पलूस-कडेगाव, जत व सांगलीया मतदारसंघात या पक्षांमध्ये सुरू आहे ताणाताणी
* मिरज: काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा)
* खानापूर-आटपाडी: राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा)

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



